चीनची 38 लढाऊ विमानं हवाई हद्दीत घुसल्याचा तैवानचा दावा

शनिवार, 2 ऑक्टोबर 2021 (11:59 IST)
चीनने आपल्या देशाच्या हद्दीत आजवरचं सर्वात मोठं अतिक्रमण केलं आहे, असा दावा तैवानने केला आहे.
 
चीनच्या स्थापना दिवशीची म्हणजेच शुक्रवारी (1 ऑक्टोबर) ही घटना आहे. तब्बल 38 लढाऊ विमानं आपल्या देशाच्या हद्दीत उडत असल्याचं दोनवेळा पाहण्यात आलं, त्याचं आम्ही प्रत्युत्तर दिलं, असा दावा तैवानने केल्याची माहिती रॉयटर्स न्यूज संस्थेने दिली.
 
तैवान स्वतःला एक स्वतंत्र देश म्हणवून घेतो, पण चीन त्याला आपला भूभाग मानतो.
 
तैवान आणि चीनमध्ये अशा प्रकारच्या कुरबुरी वारंवार पाहायला मिळतात. गेल्या एका वर्षापासून कित्येक वेळा चीनबाबत अशा प्रकारच्या तक्रारी तैवानने अनेकवेळा केल्या आहेत.
 
विशेषतः तैवानच्या दक्षिण-पश्चिम भागात तैवान नियंत्रित प्रतास बेटाजवळ हा प्रकार नेहमीच घडताना दिसतो.
 
तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने याबाबत अधिक माहिती दिली. त्यांच्या मते, चीनची 18 J-16 विमाने, चार सुखोई-30 लढाऊ विमाने, आण्विक क्षमतेने सज्ज असलेले 2 H-6 बॉम्बर्स आणि एक अँटी सबमरीन लढाऊ विमान तैवानच्या हवाई हद्दीत घुसले होते. त्याचं तैवानच्या लढाऊ विमानांनी प्रत्युत्तर दिलं.
 
त्याशिवाय आणखी 13 लढाऊ विमाने त्यांच्या हद्दीत घुसले होते, त्यामध्ये 10 J-16S, 2 H-6S आणि एक पूर्व इशारा देणारं विमान यांचा समावेश होता, असं तैवानच्या संरक्षण मंत्रालयाने शुक्रवारी सांगितलं.
 
दरम्यान, तैवानने चीनी विमानांना इशारा देण्यासाठी आपली लढाऊ विमाने पाठवली होती. तसंच मिसाईल सिस्टीमही तैनात केली होती, असंही मंत्रालयाने सांगितलं.
 
चीनच्या लढाऊ विमानांनी सुरुवातीला प्रतास बेटाजवळ आणि त्यानंतर तैवान आणि फिलिपिन्स यांना विभागणाऱ्या बाशी खाडीवर उड्डाण घेतलं.
 
यासंदर्भात चीनकडून कोणत्याच प्रकारचं अधिकृत वक्तव्य अथवा स्पष्टीकरण अद्याप आलेलं नाही.
 
देशाचं सार्वभौमत्त्व टिकवून ठेवण्याच्या उद्देशाने अशा प्रकारची उड्डाणे करणं केली जातात, असं चीनने यापूर्वीच्या अनेक मोहिमांदरम्यान म्हटलेलं आहे, हे विशेष.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती