चहाचे कप, सायनाइड आणि सहा मृत्यू, बँकॉकमधील हॉटेल रुम नंबर 502 मधील मर्डर मिस्ट्री

शनिवार, 20 जुलै 2024 (18:39 IST)
बँकॉकच्या एका आलिशान हॉटेलच्या खोलीत चहामधून सायनाइड दिल्यामुळं सहा जणांचा मृत्यू झाला आहे. थायलंडमध्ये पोलीस अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
 
मृतांपैकीच एकानं चहाच्या कपात विष कालवलं असावं, असा पोलिसांना संशय आहे. विष देणारी व्यक्ती कर्जाच्या ओझ्यामुळं तणावात होती, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमधील ग्रँड हयात इरावन हॉटेलच्या कर्मचाऱ्याना मंगळवारी रात्री उशिरा सहा मृतदेह आढळले. पोलीस अधिकाऱ्यांच्या मते, त्यांचा मृत्यू 24 तासांपूर्वी झाला होता.
या सहा मृतांपैकी दोन जणांनी गुंतवणूक करण्यासाठी म्हणून त्यातीलच एकाला लाखो डॉलर्स उसणे दिले होते, असं पोलिसांनी सांगितलं.
 
कोण आहेत मृत?
मंगळवारी मृतदेह सापडल्यानंतर लोकांकडून वेगवेगळे अंदाज व्यक्त केले जात आहेत. अनेक बातम्यांमध्ये गोळीबारामुळे मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं. पण, पोलिसांनी या सर्व बातम्या फेटाळून लावल्या.
 
थायलंडचे पंतप्रधान श्रीथा थाविसीन यांनी मंगळवारी हॉटेलला भेट देऊन तत्काळ या घटनेचा तपास करण्याचे आदेश दिले होते. हे मृत्यू म्हणजे 'वैयक्तिक प्रकरण' आहे. त्याचा राष्ट्रीय सुरक्षेशी काहीही संबंध नाही, यावर त्यांनी जोर दिला होता.
 
पण, मंगळवारी ग्रँड हयात हॉटेलमध्ये नेमकं काय झालं असेल, याचं चित्र आता स्पष्ट होत आहे.
 
बुधवारी एका पत्रकार परिषदेत, बँकॉकचे एका वरिष्ठ पोलीस अधिकारी नोपासिन पूनसावत म्हणाले की, या सहा जणांनी वीकेंडला वेगवेगळ्या वेळी हॉटेलमध्ये चेक-इन केलं होतं. हॉटेलमध्ये वेगवेगळ्या मजल्यांवर त्यांच्या खोल्या होत्या.
हे सर्वजण सोमवारी हॉटेल सोडणार होते. मृतांमध्ये चार जण व्हिएतनामचे आणि दोन जण अमेरिकेचे नागरिक होते.
 
व्हिएतनामच्या नागरिकांत एनगुयेन फुआंग (46 वर्षे), होंग फाम थान्ह (49 वर्षे), थी एनगुयेन फुओंग लान ( 47 वर्षे), दिन्ह ट्रान फु (37 वर्षे) यांचा समावेश होता.
 
तर मृत अमेरिकन नागरिकांत शेरीन चोंग (56 वर्षे) आणि डेंग हुंग वेन (55 वर्षे) यांचा समावेश होता.
 
या मृत्यूंबद्दल अमेरिकेच्या परराष्ट्र विभागानं शोक व्यक्त केला. तसंच ते परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत, असंही म्हटलं.
 
तर थायलंडचे पंतप्रधान श्रीथा थाविसीन म्हणाले की, अमेरिकेची केंद्रीय तपास यंत्रणा (एफबीआय) तपासात थायलंडच्या अधिकाऱ्यांना सहकार्य करत आहेत.
 
सगळे एकाच खोलीत
पोलिसांच्या मते, सोमवारी दुपारी सर्व सहा जण हॉटेलच्या पाचव्या मजल्यावरील 502 क्रमांकाच्या खोलीत एकत्र जमले होते.
 
या सर्वांनी खाण्याचे पदार्थ आणि चहाची ऑर्डर दिली. दुपारी दोन वाजता खोलीत जेवण पोहोचवण्यात आलं. त्यावेळी खोलीत फक्त शेरीन चोंग या अमेरिकन नागरिक होत्या. त्यांनीच जेवण खोलीत घेतलं होतं.
 
पोलिसांच्या मते, एक वेटर पाहुण्यांसाठी चहा बनवत होता. पण, शेरीन चोंग यांनी त्याला नकार दिला. वेटरनं पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं की "शेरीन चोंग खूपच कमी बोलत होत्या आणि त्या तणावात असल्याचं स्पष्टपणे दिसत होतं."
 
जेवण आणि चहा दिल्यानंतर वेटर खोलीतून निघून गेला.
मग उर्वरित सगळे जवळपास दोन-सव्वा दोन वाजेच्या सुमारास खोलीत आले. या सहा जणांव्यतिरिक्त खोलीत इतर कोणीही गेलं नाही, असं मानलं जात आहे. खोलीचा दरवाजा आतून बंद होता, असं पोलिसांचं म्हणणं आहे.
 
खोलीत कोणी जबरदस्तीनं शिरल्याचे किंवा दरोडा पडल्याचे कोणतेही पुरावे मिळालेले नाहीत, असंही पोलीस म्हणाले. नंतर पोलिसांना तपासात आढळलं की, पाहुणे (हे सहा जण) ज्या कपांमधून चहा प्यायले होते, त्या कपांमध्ये सायनाइडचा अंश होता.
 
पोलिसांनी जे फोटो जाहीर केले आहेत, त्यामध्ये खोलीतील एका टेबलावर खाद्य पदार्थांच्या प्लेट दिसत आहेत. त्यापैकी काही तर उघडण्यात सुद्धा आल्या नाहीत.
सहा मृतांनी हॉटेलमध्ये जे बुकिंग केलं होतं त्यात एक सातवी व्यक्तीही सुद्धा होती. या सातव्या व्यक्तीची पोलिसांनी ओळख पटवली आहे. ती मृतांपैकी एकाची लहान बहीण आहे.
महिला मागील आठवड्यात थायलंडहून व्हिएतनामला गेली होती आणि तिचा या घटनेशी काहीही संबंध नाही, असं पोलिसांनी सांगितलं.
मृतांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, थी गुयेन फुओंग आणि होंग फाम थान हे दोघे पती-पत्नी होते. त्या दोघांची रस्ते बांधणीचा व्यवसाय होता. या दांपत्यानं शेरीन चोंग ला जपानमधील एका हॉस्पिटल बांधकामाच्या योजनेत गुंतवणूक करण्यासाठी पैसे दिले होते.
 
पोलिसांचा तपास
व्हिएतनाममधील डा नांग या शहरातील ट्रान या एका मेकअप आर्टिस्टला देखील या बांधकाम योजनेत गुंतवणूक करण्यासाठी फसवण्यात आलं होतं.
ट्रान ची आई तुई यांनी बीबीसीला सांगितलं की, ट्रान शुक्रवारी थायलंडला गेला होता आणि रविवारी त्यानं घरी फोन करून सांगितलं होतं की तो सोमवारी तिथेच राहणार आहे.
त्याचा कुटुंबाशी झालेला हा शेवटचा संपर्क होता. त्याच्या आईनं सोमवारी पुन्हा त्याला फोन केला, मात्र तिकडून काहीही प्रतिसाद मिळाला नाही.
ट्रानच्या एका विद्यार्थ्यानं बीबीसीला सांगितलं की, शेरीन चोंग थायलंडला जाताना ट्रानला आपला खासगी मेकअप आर्टिस्ट म्हणून घेऊन गेल्या होत्या.
ट्रान चे वडील फु यांनी व्हिएतनाममधील प्रसारमाध्यमांना सांगितलं की मागील आठवड्यात त्यांच्या मुलाला एका व्हिएतनामी महिलेनं थायलंडच्या दौऱ्यासाठी कामावर ठेवलं होतं.
 
पर्यटन वाढवण्याचा प्रयत्न
थायलंडनं 93 देशांच्या नागरिकांना व्हिसा फ्री प्रवेश देण्याची घोषणा केली आहे. त्यानंतर बँकॉकच्या हॉटेलमध्ये हे सहा मृतदेह सापडले. या व्हिसा फ्री प्रवेशाचा उद्देश देशातील पर्यटनला चालना देण्याचा आहे.
ग्रँड हयात हॉटेल बॅंकॉकमधील एक लोकप्रिय पर्यटनस्थळ आहे. गेल्या काही वर्षात या परिसरात अनेक हाय प्रोफाइल गुन्हे झाले आहेत.
गेल्यावर्षी ऑक्टोबरमध्ये सियाम पेरागोन मॉलमध्ये 14 वर्षांच्या एका मुलावर तीन जणांनी गोळ्या झाडल्या होत्या. हा मॉल हॉटेलपासून काही पावलांच्या अंतरावरच आहे.
हॉटेलच्या अगदी समोर एरावानचं बौद्ध मंदिरही आहे. 2015 मध्ये इथे झालेल्या बॉम्बस्फोटात 20 जणांचा मृत्यू झाला होता.
मंगळवारी थायलंडच्या पंतप्रधानांनी सांगितलं की, पर्यटकांच्या सुरक्षेसाठी चोख बंदोबस्त करण्यात आला आहे.
पर्यटन हेच थायलंडच्या उत्पन्नाचं प्रमुख साधन आहे. कोविडच्या संकटानंतर पुन्हा एकदा पर्यटन क्षेत्राला रुळावर आणण्याचा प्रयत्न इथं केला जात आहे.
 
थायलंड हे पर्यटकांच्या दृष्टीनं नेहमीच आवडीचं ठिकाण राहिलं आहे. मात्र आता थायलंड जास्त खर्च करण्याची ऐपत असणाऱ्या पर्यटकांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करतं आहे.
 
सायनाइड काय असतं?
सायनाइड हे अतिशय वेगाने परिणाम करणारं एक जीवघेणं विष असतं. ऑक्सिजनचा वापर करण्याच्या शरीराच्या क्षमतेवर या विषाचा परिणाम होतो.
द्रव स्वरुपात किंवा वायू रुपात हे विष असतं. याला रंग नसतो आणि जवळपास कोणताच वास नसतो. त्यामुळंच सायनाइडचं अस्तित्वं लक्षात येत नाही.
कागद निर्मिती, वस्त्रोद्योग आणि प्लास्टिक उद्योगात देखील रसायन म्हणून याचा वापर केला जातो.
नैसर्गिकरित्या सायनाइड काही वनस्पतींमध्ये आणि फळांमध्ये देखील आढळतं.
 
Published By- Priya Dixit
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती