शाहबाज शरीफ यांची पाकिस्तानचे पंतप्रधान म्हणून निवड

सोमवार, 11 एप्रिल 2022 (18:47 IST)
पाकिस्तानच्या नॅशनल अॅसेंब्लीने शाहबाज शरीफ यांची पंतप्रधान म्हणून निवड केली आहे. पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत (संसद) अविश्वास प्रस्ताव मंजूर झाला आणि दुसऱ्या क्षणी इम्रान खान यांचं सरकार कोसळलं. सत्तास्थापनेच्या साडेतीन वर्षानंतर इम्रान सत्तेच्या खुर्चीवरून उतरले.
 
शनिवारी, 9 एप्रिलच्या रात्री पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत अविश्वास प्रस्तावावर मतदान पार पडलं. यात 174 सदस्यांना प्रस्तावाच्या बाजूनं म्हणजेच इम्रान खान सरकारविरोधात मतदान केलं. परिणामी इम्रान खान यांचं सरकार कोसळलं.
 
इम्रान खान यांनी दावा केलाय की, त्यांना सत्तेतून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेच्या सर्वोच्च नेतृत्वानं कट रचला होता. तसंच, नव्या सरकारचा स्वीकार करण्यासही इम्रान खान यांनी नकार दिलाय.
 
पाकिस्तानच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या पंतप्रधानाविरोधात अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाला.
नवीन पंतप्रधान पाकिस्तानातील पुढच्या निवडणुका होईपर्यंत म्हणजेच ऑक्टोबर 2023 पर्यंत कार्यभार सांभाळतील.
 
नव्या पंतप्रधानपदाची निवडणूक
पीएमएल-एनचे नेते शाहबाज शरीफ हे पाकिस्तानचे नवे पंतप्रधान असतील, हे आता जवळपास निश्चित झालंय.
 
शाहबाज शरीफ हे सध्या पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीतले विरोधी पक्षाचे नेते आहेत.
सोमवारी, 11 एप्रिलला पंतप्रधानपदाबाबत सभागृहात बैठक बोलावण्यात आली आहे. याच बैठकीत नव्या पंतप्रधानांच्या नावावर शिक्कामोर्तब केला जाईल.
 
नॅशनल असेंबलीचे कार्यकारी अध्यक्ष अयाज सादिक यांनी म्हटलं की, रविवारी, स्थानिक वेळेनुसार 11 वाजेपर्यंत पंतप्रधानपदासाठी इच्छूक उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल करावेत.
 
अविश्वास प्रस्ताव
पाकिस्तानच्या संसदेत अविश्वास प्रस्ताव यशस्वी झाल्यानंतर सभागृहाला संबोधित करताना पीएमएल-एनचे अद्यक्ष शाहबाज शरीफ यांनी म्हटलं की, पाकिस्तानात आम्ही राज्यघटना आणि कायदा व्यववस्था पुन्हा आणू इच्छित आहोत.
पीएमएल-एनचे अध्यक्ष शाहबाज शरीफ यांनी म्हटलं की, "आम्ही कुणाचाही बदला घेणार नाही. मात्र, कायदा आपलं काम करेल."
 
संसदेत अविश्वास प्रस्ताव मंजूर झाल्यानंतर पीपीपीचे अध्यक्ष बिलावल भुट्टो झरदारींनी म्हटलं की, "10 एप्रिलला ऐतिहासिक महत्व आहे. 10 एप्रिललाच सभागृहात 1973 साली राज्यघटना मंजूर झाली होती. जुन्या पाकिस्तानात तुमचं स्वागत आहे."
 
दुसरीकडे, पाकिस्तानचे अॅटर्नी जनरल खालिद जावेद खान यांनी राजीनामा दिला आहे.
 
मतदानाआधीच असेंबलीच्या अध्यक्षांनी दिला राजीनामा
पाकिस्तानच्या नॅशनल असेंबलीत (संसद) मतदान पार पडण्याआधीच असेंबलीच्या अध्यक्षांनी राजीनामा दिला. असद कैसर यांच्यानंतर आता पीएमएल-एन नेते अयाज सादिक हे नॅशनल असेंबलीच्या अधिवेशनाचे अध्यक्ष म्हणून काम पाहत आहेत.
 
असद कैसर यांनी म्हटलं की, "वास्तव आणि घटना पाहता, मी ठरवलंय की, जी कागदपत्रं माझ्यापर्यंत पोहोचली आहेत, ती माझ्या कार्यालयातच ठेवावी, असं मी विरोधी पक्षाच्या नेत्यांना आवाहन करतो. त्यांचा अहवाल तयार करून सुप्रीम कोर्टाकडे पाठवेन. या देशाच्या सार्वभौमत्वासाठी मला पुढे आलंच पाहिजे आणि मी निर्णय घेतलाय की, आता मी अध्यक्ष बनू शकत नाही."
 
साडेतीन वर्षांनंतर इम्रान खान पंतप्रधानपदावरून पायउतार
पाकिस्तान क्रिकेट टीमचं कर्णधारपद भूषवलेले इम्रान खान दोन दशकांपूर्वी राजकारणात आले आणि पीटीआय पक्षाची स्थापना केली. 2018 साली ते पाकिस्तानचे पंतप्रधान झाले. त्यांनी भ्रष्टाचाराविरोधात लढण्याचं आणि अर्थव्यवस्था सुधारण्याचे आश्वासन दिले होते.
 
मात्र, आर्थिक संकटात अडकलेल्या पाकिस्तानसमोरील अडचणी वाढतच गेल्या. गेल्या वर्षी मार्च महिन्यात इम्रान खान यांच्या पक्षातून अनेक नेते बाहेर पडले. त्यानंतर खऱ्या अर्थानं राजकीय संघर्ष सुरू झाला.
 
बीबीसीचे प्रतिनिधी सिकंदर किरमानी म्हणतात की, इम्रान खान यांनी पाकिस्तानच्या लष्कराचं विश्वास संपादन केलं होतं. मात्र, काही विश्लेषकांचं म्हणणं आहे की, लष्कर आणि इम्रान खान यांच्यातील अंतर वाढत चाललं होतं.
 
इम्रान खान हे सातत्यानं आरोप करत आहेत की, "पाकिस्तानातील विरोधी पक्ष हे परदेशी शक्तींसोबत काम करत आहेत. रशिया आणि चीनच्या प्रकरणात आपण अमेरिकेच्या बाजूनं उभं राहण्यास नकार दिला आणि त्यानंतरच सत्तेतून बाहेर काढण्यासाठई अमेरिकेच्या नेतृत्वानं कट रचला होता."
 
अमेरिकेनं म्हटलं की, "इम्रान खान यांच्या आरोपांमध्ये 'काहीच खरं' नाहीय. त्यांच्याकडे या दाव्यासाठी कुठलेच पुरावे नाहीत."

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती