पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा बिल अँड मिलिंडा गेट्स फाऊंडेशन च्या प्रतिष्ठित अशा ग्लोबल गोलकीपर्स पुरस्काराने सन्मान करण्यात आला. भारतात यशस्वीरित्या स्वच्छता अभियान राबवण्यात येत असल्यामुळे मोदींचा या पुरस्काराने गौरव करण्यात आला. फाऊंडेशनचे अध्यक्ष बिल गेट्स यांनी मोदींना हा पुरस्कार देऊन त्यांचा गौरव केला. दरम्यान, ज्या लोकांना हे अभियान जनआंदोलनात बदलले त्यांना हा पुरस्कार समर्पित करत असल्याची प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुरस्काराचा स्विकार करतेवेळी दिली.
देशातील गरीब आणि महिला वर्गाला या अभियानाचा सर्वाधिक फायदा मिळाला आहे. भारत या विश्वाला आपले कुटुंब मानतो. त्यामुळे या अभियानात भारताने दिलेल्या योगदानामुळे मला आनंद होत आहे, असे मोदींनी यावेळी म्हटले. वसुधैव कुटुंबकम् अशी शिकवण आम्हाला हजारो वर्षांपासून देण्यात आली आहे. आम्ही स्वच्छतेच्या दृष्टीने जे लक्ष्य ठेवले आहे त्याच्या आम्ही जवळ पोहोचत आहोत. या व्यतिरिक्तही भारत अन्य अभियान राबवत आहे. फिट इंडिया मुव्हमेंटद्वारे फिटनेस आणि प्रिव्हेंटिव्ह हेल्थकेअरला आम्ही प्रोत्साहन देण्याचं काम करत आहोत. जल जीवन अभियानाअंतर्गत पाणी वाचवण्यावर आणि त्याच्या पुनर्वापरावरही आम्ही काम करत आहोत, असे त्यांनी यावेळी स्पष्ट केले. महात्मा गांधी यांनी स्वच्छतेचे जे स्वप्न पाहिले होते, ते आज पूर्ण होताना दिसत आहे. जेव्हा एखादं गाव स्वच्छ असेल तेव्हाच ते आदर्श गावाच्या रूपात सर्वासमोर येऊ शकतं, असं गांधी म्हणत होते. आम्ही आदर्श देशच घडवण्याच्या दृष्टीने पुढे वाटचाल करत आहोत, असेही त्यांनी यावेळी म्हटले.