पाकिस्तान : इम्रान खान सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव सभापतींनी फेटाळला, संसद बरखास्त

रविवार, 3 एप्रिल 2022 (15:14 IST)
पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्याविरोधातील अविश्वास प्रस्ताव सभापतींनी फेटाळला आहे. तसंच देशातील संसद बरखास्त करण्याची शिफारसही पंतप्रधान इम्रान खान यांनी यावेळी केली आहे.
 
विरोधकांकडून दाखल करण्यात आलेल्या अविश्वास प्रस्तावावर आज (रविवार, 3 एप्रिल) मतदान होणार होतं. पण मतदानापूर्वीच संसदेच्या सभापतींनी हा प्रस्ताव असंवैधानिक असल्याचं कारण देत फेटाळून लावला.
 
घटनेच्या कलम 5 नुसार अविश्वास प्रस्ताव अवैध असल्याचं सभापतींनी स्पष्ट केलं. यानंतर पंतप्रधान इम्रान खान जनतेला संबोधित करण्यासाठी राष्ट्रीय वाहिनीवर आले. त्यांनी राष्ट्रपतींना देशाची संसद बरखास्त करण्याची, तसंच पुन्हा एकदा निवडणुका घेण्याची शिफारस केली आहे.
 
यानंतर बोलताना पंतप्रधान इम्रान खान म्हणाले, "परकीय शक्तींच्या साथीने सरकार पाडण्याचा प्रयत्न अयशस्वी झाला आहे. आता जनतेनं ठरवावं की त्यांना कोण हवं आहे. संसद बरखास्त करण्यात यावी, निवडणुका आयोजित करण्यात याव्यात. लोकांनी निवडणुकांची तयारी करावी. देशाचं भविष्य काय असेल हे जनतेनं ठरवावं, परकीय शक्तींनी नाही".

यासाठी पाकिस्तान संसदेचं विशेष सत्र बोलावण्यात आलं आहे. या सत्राची सुरुवात आज पाकिस्तानी प्रमाणवेळेनुसार सकाळी साडेअकराच्या सुमारास झाली. यादरम्यान पाकिस्तानच्या संसदेत नेमकं काय होतं, याकडे सर्वांचं लक्ष होतं.
 
दरम्यान, या पार्श्वभूमीवर इस्लामाबादमध्ये कलम 144 लागू करण्यात आलं होतं.
 
अविश्वास प्रस्तावावरील मतदानावरच इमरान खान 'तहरिक-ए-इन्साफ' पक्षाच्या सरकारचं भवितव्य अवलंबून असल्याने यामध्ये काय होणार याकडे सर्वांचं लक्ष होतं.
अविश्वास प्रस्तावावर मतदानाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच 2 एप्रिल रोजी संध्याकाळी इम्रान खान यांनी दुसऱ्यांदा लोकांना संबोधून भाषण केलं. यावेळी त्यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.
 
विरोधकांनी परकीय शक्तींसोबत मिळून आपलं सरकार पाडण्याचं षड्यंत्र रचल्याचा आरोप इम्रान खान यांनी केला आहे.
 
"राष्ट्रीय सुरक्षा समिती आणि मंत्रिमंडळाने यासंदर्भातील कागदपत्रे पाहिली आहेत. इम्रान खान यांना हटवलं तर अमेरिकेसोबतचे संबंध चांगले होतील, अशा स्वरुपातील काही अधिकृत कागदपत्रे आहेत," असं खान म्हणाले.
 
तसंच त्यांनी शाहबाज शरीफ यांच्यावर निशाणा साधताना म्हटलं की त्यांचं या संपूर्ण प्रकरणात संगनमत आहे. शाहबाज हे अमेरिकेची गुलामी करण्यास सज्ज झाले आहेत."
 
अविश्वास प्रस्ताव उपसभापतींनी फेटाळला
पंतप्रधान इम्रान खान यांच्या सरकारविरोधातील अविश्वास प्रस्ताव मतदानापूर्वीच संसदेच्या उपसभापतींनी फेटाळला आहे. विरोधकांनी दाखल केलेला अविश्वास प्रस्ताव असंवैधानिक असल्याचं कारण त्यांनी दिलं आहे.
 
बीबीसी प्रतिनिधी हुमैरा कंवल यांनी याविषयी सांगितलं की संसदेत दाखल होणाऱ्या खासदारांची संख्या वाढू लागली आहे. पण अद्याप इम्रान खान याठिकाणी पोहोचले नाहीत.
 
इम्रान खान काय म्हणाले?
इम्रान खान यांनी यावेळी संसदेच्या सभापतींचं अभिनंदन केलं. त्यांनी हे षड्यंत्र उधळून लावल्याने त्यांचे मी आभार मानतो, असं खान म्हणाले.
 
या देशातील सरकारचा निर्णय देशातील जनतेने घ्यावा, परकीय शक्तींनी त्यात हस्तक्षेप करू नये, असं खान म्हणाले.
 
देशाची संसद बरखास्त करत असल्याची घोषणा इम्रान खान यांनी यावेळी केली. तसंच लोकांनी आता निवडणुकीला सामोरे जाण्याची तयारी करावी, असंही खान म्हणाले.
 
तरुणांनी रस्त्यावर उतरावं
इम्रान खान यांनी आपल्या भाषणादरम्यान तरुणांना विशेष आवाहन केलं. त्यांनी शांततापूर्ण आंदोलन करण्यासाठी देशातील रस्त्यांवर उतरावं, असं ते म्हणाले आहेत.
खान यांच्या मते, विरोधी पक्षाने देशासोबत गद्दारी केला आहे. त्यामुळे त्यांचा विरोध या आंदोलनांच्या माध्यमातून झाला पाहिजे.
 
लष्कराकडून कोणतीही अडचण नाही
लष्कराशी संबधित एका प्रश्नाचं उत्तर देताना इम्रान खान म्हणाले, "सध्याच्या स्थितीत पाकिस्तानला लष्कर आणि तहरिक-ए-इन्साफ पक्ष यांनीच एकत्र बांधून ठेवलं आहे. पाकिस्तानला एका मजबूत लष्कराची गरज आहे. लष्करावर केलेली टीका ही संपूर्ण पाकिस्तानवर टीका आहे. लष्कराचं नुकसान होईल, अशी कोणतीही गोष्ट आपल्याला करायची नाही.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती