श्रीलंकेत आणीबाणी जाहीर केल्यानंतर आता शनिवारी देशभरात 36 तासांचा कर्फ्यू लागू करण्यात आला आहे. संचारबंदी शनिवारी संध्याकाळपासून लागू होईल आणि सोमवारी सकाळी उठवली जाईल. कर्फ्यू लागू करण्यामागे सार्वजनिक सुव्यवस्थेच्या सुरक्षेचे कारण सरकारने दिले आहे. सध्या श्रीलंकेच्या विविध भागांत मोठ्या प्रमाणावर निदर्शने होत आहेत. जाळपोळीच्या अनेक घटनाही समोर आल्या आहेत.
श्रीलंका सध्या ऐतिहासिक आर्थिक संकटाचा सामना करत आहे आणि इंधन, स्वयंपाकाचा गॅस आणि इतर आवश्यक वस्तूंसाठी लोकांच्या लांबच लांब रांगा दिसत आहेत. पक्षाचे सरचिटणीस आणि मंत्री दयासिरी जयसेकरा म्हणाले की, केंद्रीय समितीने शुक्रवारी संसदेत प्रतिनिधित्व केलेल्या सर्व पक्षांना सामील करून सरकार स्थापन करण्याची विनंती करण्याचा निर्णय घेतला.
श्रीलंकेचे राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांनी शुक्रवारी उशिरा एक विशेष राजपत्र अधिसूचना जारी करून श्रीलंकेत 1 एप्रिलपासून तात्काळ लागू होणारी सार्वजनिक आणीबाणी जाहीर केली. राजपत्रातील अधिसूचनेत राष्ट्रपती म्हणाले, "माझ्या मते, श्रीलंकेत सार्वजनिक आणीबाणी लादणे सार्वजनिक सुरक्षा व्यवस्था तसेच समुदायांना आवश्यक वस्तू आणि सेवांचा पुरवठा राखण्याच्या हितासाठी आहे."
राजपक्षे यांच्या निवासस्थानासमोर निदर्शने केल्याबद्दल अटक केलेल्या निदर्शकांच्या गटाला न्यायालयाने जामीन देण्याचे आदेश दिल्यानंतर आणीबाणी घोषित करण्यात आली. आंदोलकांचे म्हणणे होते की ते कोणत्याही राजकीय गटापासून प्रेरित नसून जनतेला भेडसावणाऱ्या दु:खांवर सरकारी पातळीवर उपाय शोधणे हेच त्यांचे उद्दिष्ट आहे.