पाकिस्तान : बलुचिस्तानात वेगवेगळ्या हल्ल्यांत 39 जणांची हत्या, ओळखपत्रं पाहून हत्या केल्याचा अधिकाऱ्यांचा दावा

मंगळवार, 27 ऑगस्ट 2024 (11:32 IST)
पाकिस्तानातील बलुचिस्तान प्रांतात कट्टरतावाद्यांनी विविध भागांमध्ये केलेल्या हल्ल्यात 39 जणांचा मृत्यू झाला आहे. बलुचिस्तानातील जवळपास 10 जिल्ह्यांत हे हल्ले करण्यात आले आहेत.
मुसाखेल भागातील हल्ल्यात 22 जणांची हत्या करण्यात आली आहे. तर 11 जणांची कलात आणि 6 जणांची बोलान भागात हत्या करण्यात आली आहे.
बंदी घालण्यात आलेली कट्टरतावादी संघटना बलोच लिबरेशन आर्मीनं या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.
पाकिस्तानचे गृहमंत्री मोहसीन नकवी यांनी हल्ल्यानंतर एक निवेदन प्रसिद्ध केलं. त्यात प्रत्युत्तरात सुरक्षा दलांनी 12 कट्टरतावाद्यांना ठार केल्याची माहिती दिली.
बलुचिस्तानातील प्रसिद्ध राजकीय नेते नवाब अकबर बुग्ती यांच्या स्मृतीदिनाच्या दिवशीच हे हल्ले करण्यात आले आहेत.
बलुचिस्तानात बलोच लिबरेशन आर्मी (BLA) ही कट्टरतावादी संघटना सक्रिय आहे. आचापर्यंत मुसा खेल भागात झालेल्या हल्ल्यात सर्वाधिक हानी झाली आहे.
मुसाखेलमधील हल्ल्यात सर्वांना बळजबरीने वाहनांबाहेर काढलं आणि आणि त्यांची ओळखपत्रं पाहून ओळख पटल्यानंतर त्यांची हत्या केल्याचं पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी सांगितलं.
 
पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतात महामार्गावर रात्रीच्या वेळी ही घटना घडली. बलुचिस्तानात सध्या पाकिस्तानी सुरक्षा दलांचा धार्मिक कट्टरतावादी, वांशिक आणि फुटीरतावादी गटांशी सशस्त्र संघर्ष सुरू आहे.
 
अशाच काही सशस्त्र गटाच्या सदस्यांनी वाहनांमधील लोकांची ओखळपत्रं तपासली. त्यानंतर कथितरित्या पंजाबातील (पाकिस्तानातील पंजाब) लोकांना वेगळं करण्यात आलं आणि त्यांची हत्या करण्यात आली.
 
त्यानंतर त्यांची वाहनं पेटवून देण्यात आली, असा आरोप पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी केला आहे.
 
नजिबुल्लाह काकर या स्थानिक वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मते, कट्टरतावादी गटातील जवळपास 30 ते 40 सदस्यांचा या घटनेत सहभाग होता.
"या सशस्त्र हल्लेखोरांनी 22 वाहने थांबवली. पंजाबात जाणाऱ्या आणि तिथून येणाऱ्या वाहनांवर देखरेख केली जात होती. वाहने थांबवून पंजाबातील लोकांची ओळख पटवली आणि त्यांना गोळ्या घालण्यात आल्या," असं नजिबुल्लाह यांनी एएफपी या वृत्तसंस्थेला सांगितलं.
 
लष्करी जवान होते लक्ष्य
रॉयटर्स या वृत्त संस्थेनं दिलेल्या माहितीनुसार, सामान्य नागरिकांच्या वेशात प्रवास करणाऱ्या लष्करी जवानांना या गटांनी लक्ष्य केलं होतं, असं बलोच लिबरेशन आर्मी (BLA)नं सांगितलं.
 
हा हल्ला होण्यापूर्वीच बलोच लिबरेशन आर्मीनं बलोच नागरिकांना महामार्गापासून दूर राहण्याचा इशारा दिला होता. "बलुचिस्तानवर कब्जा करू पाहणाऱ्या पाकिस्तानी लष्कराविरुद्ध आहे, हा संघर्ष आहे,"असं त्यांनी म्हटलं होतं.
"बलुचिस्तानातील सर्व महत्त्वाच्या महामार्गांवर आमचा ताबा आहे आणि आम्ही ते पूर्णपणे बंद केले आहेत," असंही BLA नं म्हटलं आहे.
 
या घटनेवर पाकिस्तानचे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांच्या कार्यालयानं एक निवेदन प्रसिद्ध केलं.
"या दहशतवादी हल्ल्याबद्दल तीव्र शोक व्यक्त करून त्याचा निषेध" असं त्यांनी निवेदनातून म्हटलं.
 
लष्कराच्या प्रवक्त्यांचे निवेदन
बलुचिस्तानमधील हल्ल्यांसंदर्भात पाकिस्तानी लष्कराच्या प्रवक्त्यांकडून निवदेन देण्यात आलं आहे. बलुचिस्तानातील हल्ल्यांना प्रत्युत्तर देताना सुरक्षा दलांनी 21 कट्टरतावाद्यांना ठार केलं आहे, असं त्यात म्हटलं आहे. कारवाईमध्ये सुरक्षा दलाच्या 14 जवानांचाही मृत्यू झाला आहे.
 
"कट्टरतावाद्यांनी 25/26 ऑगस्टच्या रात्री बलुचिस्तानमध्ये अनेक कारवाया करण्याचे प्रयत्न केले. शत्रूत्व बाळगणाऱ्या आणि पाकिस्तानच्या विरोधात असणाऱ्या शक्तींच्या जोरावर हे भ्याड दहशतवादी हल्ले करण्यात आले होते. हल्ल्यांचा उद्देश बलुचिस्तानातील शांततामय वातावरण बिघडवण्याचा आणि तेथील विकासाला खीळ घालण्याचा आहे. यासाठी मुख्यत: निष्पाप नागरिकांना लक्ष्य केलं जात आहे," असंही त्यात म्हटलं आहे.
मुसाखेल, कलात आणि लाबेला जिल्ह्यांमध्ये प्रामुख्यानं हे हल्ले केले जात आहेत. या हल्ल्यांमुळे असंख्य निष्पाप नागरिक शहीद झाले. मुसा खेल जिल्ह्यात दहशतवाद्यांनी रारा शाम भागात एक बस थांबवली. द्वेषाच्या भावना बाळगत निष्पाप नागरिकांना लक्ष्य केलं. हे नागरिक उदरनिर्वाह चालवण्यासाठी बलुचिस्तानात काम करत होते, असाही त्यात उल्लेख आहे.
सुरक्षा दलं आणि कायदा सुव्यवस्था राखणाऱ्या यंत्रणांनी तातडीनं या हल्ल्याला प्रत्युत्तर दिलं. दहशतवाद्यांचा डाव यशस्वीरित्या हाणून पाडल्याचंही त्यांनी म्हटलं.
 
'विदेशी ऊर्जा कंपन्याही लक्ष्य'
बलुचिस्तान हा पाकिस्तानातील सर्वांत मोठा प्रांत आहे. पाकिस्तानातील इतर कोणत्याही प्रांतापेक्षा बलुचिस्तानात सर्वाधिक नैसर्गिक साधनसंपत्ती आहे. मात्र, तरीही इतर प्रांतांच्या तुलनेत या प्रांताचा सर्वांत कमी विकास झाला आहे.
बलोच लिबरेशन आर्मी आणि इतर बलोच कट्टरतावादी संघटनांनी सध्या हल्ले वाढवले आहेत. किस्तानच्या इतर भागातून बलुचिस्तानात येऊन काम करणाऱ्या पंजाबी आणि सिंधी लोकांना ते लक्ष्य करतात.
त्याचबरोबर विदेशी ऊर्जा कंपन्यांनाही ते लक्ष्य करत आहेत. या कंपन्या बलुचिस्तानचं शोषण करत असल्याचा कट्टरतावाद्यांचा आरोप आहे.
कंपन्या या प्रांतामधील साधनसंपत्तीचा वापर करून त्यातून नफा कमवतात, मात्र त्या नफ्याचं सर्वांना वितरण करत नाही, असा आरोप बलोच संघटना करत आहेत.
याच वर्षी एप्रिल महिन्यातही बलुचिस्तानात अशी घटना घडली होती. त्यावेळी 9 प्रवाशांना बसमधून खाली उतरवून त्यांची ओळख पटवत त्यांना गोळ्या घातल्या होत्या.
गेल्या 24 तासांत बलोच लिबरेशन आर्मीनं विविध सरकारी उपक्रमांवर आणि ठिकाणांवर हल्ले चढवले आहेत. बलुचिस्तानातील पोलीस स्टेशन आणि सुरक्षा दलांच्या छावण्यांचाही समावेश आहे.
युके आणि अमेरिकेसह अनेक पाश्चात्य देशांनी बलोच लिबरेशन आर्मीला जागतिक दहशतवादी संघटना घोषित केलं आहे.
बीबीसीसाठी कलेक्टिव्ह न्यूजरूमचे प्रकाशन.
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती