उत्तर कोरियाकडू क्षेपणास्त्राची चाचणी

सोमवार, 13 फेब्रुवारी 2017 (12:02 IST)
उत्तर कोरियाने आंतरखंडीय क्षेपणास्त्राची चाचणी केली असून त्यामुळे या प्रदेशात पुन्हा अशांततेचे सावट पसरले आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे काय प्रतिसाद देतात याची चाचपणी करण्याचा यात हेतू असावा, असे दक्षिण कोरियाच्या संरक्षण मंत्रालयाने म्हटले आहे.
 
रविवारी सकाळी ७.५५ वाजता बांगयोन हवाई तळावरून हे क्षेपणास्त्र डागण्यात आले. हे ठिकाण उत्तर प्यॉनगन राज्यात आहे. क्षेपणास्त्र उडवल्यानंतर ते जपानच्या सागराकडे म्हणजे पूर्व सागराकडे गेले. पाचशे किलोमीटर अंतर गेल्यानंतर क्षेपणास्त्र सागरात कोसळले, असे संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्याने सांगितले.
 
उत्तर कोरियाने जगाचे लक्ष वेधण्यासाठी ही चाचणी केली असून त्यात आण्विक व क्षेपणास्त्र क्षमता जगाला दाखवण्याचा उद्देश होता. अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांची यावर काय प्रतिक्रिया येते हे तपासण्याचाही यात हेतू होता. गेल्या ऑक्टोबरमध्ये उत्तर कोरियाने मुसुदान क्षेपणास्त्रांची चाचणी केली होती. सेऊल येथे अमेरिकी संरक्षणमंत्री जेम्स मॅटीस यांनी भेट दिली असता त्यांनी उत्तर कोरियाला अण्वस्त्र हल्ला केल्यास परिणाम भोगावे लागतील, असा इशारा दिला होता. अमेरिका व मित्र देशांवर हल्ल्यास चोख प्रत्युत्तर दिले जाईल, असे ते म्हणाले होते.
 
उत्तर कोरियाने २०१६ मध्ये दोन अणुचाचण्या केल्या होत्या. अमेरिकेला या देशाने आपल्या टप्प्यात ठेवण्याचे प्रयत्न चालवले आहेत. जानेवारीत उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी आंतरखंडीय क्षेपणास्त्र निर्मितीच्या अंतिम टप्प्यात असल्याचे सांगितले होते. ट्रम्प यांनी त्यावर असे ट्वीट केले होते की, उत्तर कोरिया आंतरखंडीय क्षेपणास्त्र बनवणे शक्य नाही. जपानच्या सुरक्षेस अमेरिका बांधील आहे, असे अमेरिकी अध्यक्ष ट्रम्प यांनी जपानचे पंतप्रधान शिन्झो अ‍ॅबे यांना सांगितले असताना उत्तर कोरियाने आताची चाचणी केली आहे. 

वेबदुनिया वर वाचा