महागाई आणि आर्थिक संकटाने त्रस्त असलेल्या श्रीलंकेतील लोकांसाठी फणस हे फळ मोठा आधार ठरत आहे. तीन मुलांचे वडील आणि मजूर असलेले करुप्पइया सांगतात की, फणसामुळे त्यांच्यासारखे लाखो लोक आज जगत आहेत. ते म्हणाले, “फणसाने आमच्यासारख्या लाखो लोकांना जगवलं आहे. आम्हाला उपासमारीपासून वाचवलं आहे.”
आधी फार महत्त्व न दिलं जाणाऱ्या या फळाने तिकडच्या लोकांना आता मोठा आधारा दिला आहे. श्रीलंकेच्या बाजारात एक किलो फणस जवळपास 20 रुपयांनी (श्रीलंकेतील रुपये) मिळत आहे.
40 वर्षीय करुप्पइया कुमार सांगतात, “या आर्थिक संकटाच्याआधी, पोळी किंवा तांदूळ कोणीही खरेदी करू शकत होतं. पण खाद्यपदार्थ महागल्याने आता कित्येक लोक दररोज फणस खाऊन आपलं पोट भरत आहेत.”
उत्पन्नातील 70 टक्के खर्च अन्नावर
श्रीलंकेतील सध्या जवळपास एक तृतीयांश लोकांना अन्नाच्या संकटाचा सामना करावा लागत आहे. देशातील अर्धी लोकसंख्या या संकटाला तोंड देत आहे. तसंच त्यांना नाईलाजास्तव आपल्या उत्पन्नापैकी 70 टक्क्यांहून अधिक खर्च अन्नावर करावा लागत आहे.
तीन मुलांची आई, 42 वर्षीय नदिका परेरा सांगतात, “आम्ही आमचं तीन वेळेचं जेवण कमी करून ते दोन वेळेचं केलं आहे. गेल्यावर्षीपर्यंत 12 किलोच्या सिलेंडर गॅसची किंमत 5 डॉलर होती.”
धुरामुळे डोळ्यातील अश्रू पुसत असतानाच त्या सांगतात, आता सिलेंडरचे दर दुप्पट झाले आहेत. यामुळे जेवण बनवण्यासाठी पारंपरिक पद्धत हाच एक एकमेव पर्याय आमच्याजवळ आहे.
2022 मध्ये इतिहासातील सर्वात भयंकर आर्थिक संकटाचा सामना केल्यानंतर श्रीलंकेतील लोकांचं उत्पन्न कमी झालं आहे. खाद्यपदार्थांच्या किमतीही वाढल्या आहेत.
गेल्यवर्षी 9 जुलै रोजी, अनेक महिन्यांपासून सातत्याने जाणारी वीज आणि इंधनाच्या टंचाईमुळे हैराण असलेल्या लोकांनी तत्कालीन राष्ट्रपती गोटाबाया राजपक्षे यांच्या सरकारी निवासस्थानाचा ताबा घेतला होता. त्यावेळी त्यांना आपलं घर सोडून पळून जावं लागलं होतं.
यानंतर सरकार आयएमएफकडून बेलाऊट पॅकेज घेण्यात यशस्वी झाली. पण तरीही यानंतर आता इकडे गरीबीचा दर दुपटीने वाढला आहे.
नदिका आपल्या पती आणि लहान मुलांसोबत राजधानी कोलंबो येथे टू बीएचके घरात राहतात. त्या राष्ट्रीय कॅरम चॅम्पियनशीपच्या माजी उपविजेत्या आहेत आणि आता त्यांना पैशांची अडचण आहे.
कॅरम आशियातील एक लोकप्रिय खेळ आहे. परंतु आताच्या परिस्थितीत रेफरी म्हणून त्यांची कमाई बंद आहे. त्यांचे पती आता पैशांसाठी भाड्याची टॅक्सी चालवतात.
नदिका सांगतात, “किंमती सहा पटीने वाढल्याने आम्ही मांस किंवा अंडी खरेदी करू शकत नाही. मुलंही अनेकदा शाळेत जाऊ शकत नाहीत. कारण महागाई असल्याने त्यांना आम्ही बसने पाठवू शकत नाही.”
गॅस आणि वीज स्वस्त झाली पाहिजे यासाठी त्या प्रार्थना करतात.
श्रीलंकेत महागाई दर आता बराच कमी झाला आहे. देशात महागाई दर फेब्रुवारीत 54 टक्के होता. जूनमध्ये हा दर घसरला आणि 12 टक्के झाला. तरीही वाढलेल्या किंमती नियंत्रणात आणण्यासाठी सरकारला संघर्ष करावा लागत आहे.
ग्रामीण भागातील लोकांना अडचणी
रबर आणि चहाच्या बागांनी भरलेल्या डोंगरांमध्ये वसलेलं रत्नपुरा शहर कोलंबोपासून 160 किलोमीटर दूर अंतरावर दक्षिणेत आहे.
आपल्या उपजिविकेसाठी करुप्पइया कुमार नारळाच्या झाडांवर चढतात. एका झाडावर चढण्यासाठी त्यांना 200 श्रीलंकन रुपये मिळतात. ते सांगतात, “महागाई खूप जास्त आहे. मला मुलांच्या शिक्षणाचाही विचार करावा लागतो. अशापरिस्थितीत जेवणासाठी माझ्याकडे खूप कमी पैसे राहतात.”
करुप्पइया यांच्या पत्नी रबरच्या टॅपिंगचं काम करतात. यासाठी त्यांना रबराच्या झाडावर नळीसारखं कट करून रबराचं दूध काढण्याचा उपाय करावा लागतो. पण पावसामुळे त्यांचं हे काम बंद आहे.
आपल्या कामासाठी त्यांना जोखीम पत्कारावी लागते. याविषयी ते सांगतात, “पाऊस सुरू असला तरी त्यांना आपल्या कुटुंबाची जबाबदारी असल्याने घरी बसून राहणं आणि झाडावर न चढणं हे मी करू शकत नाही.”
रत्नपुराजवळच पलेंड नावाचा ग्रामीण भाग आहे. याठिकाणी जवळपास 150 कुटुंब राहतात. यात बहुतांश शेतकरी आणि मजूर राहतात.
या भागातील सरकारी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक आणि काही शिक्षक विद्यार्थ्यांचं वजन करत होते. मुख्याध्यापक झहीर सांगतात, “या शाळेत बहुतांश असे विद्यार्थी येतात ज्याचं घर गेल्या वर्षी दारिद्र्य रेषेच्या खाली गेलं. यासाठी आम्ही त्यांना अन्न देण्यास सुरुवात केली. यात दर आठवड्याला दोन अंड्यांचा समावेश होता. परंतु अंड्यांचे दर वाढल्याने आम्ही दोन ऐवजी आता एकच अंड देतो.”
शाळेत येणारी बहुतांश मुलं कमी वजनाची किंवा कुपोषित आहेत असंही ते सांगतात. गेल्या वर्षभरापासून अधिक काळ राहिलेल्या आर्थिक संकटामुळे देशाचं आर्थिक आरोग्य खालावलं आहे.
श्रीलंकेतील एकूण 2.2 कोटी लोकसंख्येला नि:शुल्क आरोग्य सुविधा दिली जाते. श्रीलंका त्यांना आवश्यक असलेली जवळपास 85 टक्के औषधं आयात करतं. यामुळे श्रीलंकेत आर्थिक संकट आल्यानंतर देशात औषधांचा तुटवडा भासायला लागला.
आजारी लोक हैराण
कँडीचे 75 वर्षीय राजकीय शास्त्रज्ञ प्राध्यापक मोआ डि. जोयसा यांच्यावर या परिस्थितीचा थेट परिणाम झाला. त्यांना फुफ्फुसांचा आजार फायब्रोसीस होता. या उपचारासाठी भारातून औषधं खरेदी करण्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागला. यातच9 महिन्यांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला.
जोयसा यांच्या पत्नी मालिनी सांगतात, “अशा परिस्थितीमुळे ते हताश होते. तरीही ते पुस्तक लिहित होते. त्यांच्या परिस्थितीत सुधारणा होत नसल्याने त्यांना असं वाटलं की त्यांचा मृत्यू होणार आहे.”
त्या पुढे सांगतात, “परंतु परिस्थिती सामान्य झाली असती तर त्यांचे शेवटी काही महिने कमी तणावपूर्ण होऊ शकत होते. त्यांच्या मृत्यूनंतरही मोठं कर्ज फेडण्यासाठी आम्हाला खूप त्रास झाला.”
कोलंबोतील एकमेव कँसर स्पेशालिस्ट हॉस्पिटलमध्येही रुग्णांना त्रास होत असल्याचं दिसून आलं. या हॉस्पिटलमध्ये दाखल असलेल्या 48 वर्षीय स्तन कँसरच्या रुग्ण रमानी अशोका आणि त्यांचे पती पुढील महिन्यात होणाऱ्या दुसऱ्या किमोथेरपीच्या फेरीबाबत चिंतेत आहेत.
रमानी अशोका सांगतात, “आतापर्यंत औषध हॉस्पिटलकडून मोफत मिळत होतं. पण आता इथपर्यंत प्रवास करणंही महाग आहे. आता आम्हाला आमचं औषध मेडिकलमधून खरेदी करावं लागेल. कारण या औषधाचा साठा नाहीय.”
श्रीलंकेचे आरोग्य मंत्री रामबुवेला यांचं म्हणणं आहे की, महाग औषधं आणि त्याच्या तुडवड्याबाबत त्यांना कल्पना आहे. पण या समस्येवर तात्काळ तोडगा निघू शकत नाही.