इराणच्या प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची तेहरानमध्ये हत्या, 'बदला नक्की घेऊ' - सैन्याची प्रतिक्रिया
शनिवार, 28 नोव्हेंबर 2020 (11:37 IST)
इराणचे प्रमुख अणुशास्त्रज्ञ मोहसिन फखरीजादेह यांची हत्या करण्यात आल्याचं इराणच्या संरक्षण मंत्रालयाने सांगितलंय.
इराणची राजधानी तेहरानला लागून असणाऱ्या अबसार्ड शहरामध्ये त्यांच्यावर हल्ला करण्यात आल्याची माहिती मिळतेय.
या हल्ल्यानंतर फखरीजादेह यांना रुग्णालयात नेण्यात आलं, पण त्यांचा जीव वाचवता आला नाही.
फखरीजादेह यांच्या हत्येचा निषेध करत ही 'एखाद्या देशाचा पाठिंबा असलेली दहशतवादी घटना' असल्याचं म्हटलंय.
गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार इराणच्या गुप्त अण्वस्त्र कार्यक्रमामागे मोहसिन फखरीजादेह हेच होते.
त्यांना 'इराणी अणुबॉम्बचे जनक' म्हटलं जाई. पण आपला आण्विक कार्यक्रम हा शांततापूर्ण उद्देशांसाठी असल्याचं इराणने वेळोवेळी म्हटलं होतं.
वर्ष 2010 ते 2012 या काळात इराणच्या 4 अणुशास्त्रज्ञांची हत्या करण्यात आली आणि यामागे इस्त्रालयचा हात असल्याचं इराणने म्हटलं होतं.
आंतरराष्ट्रीय वृत्तसंस्था एएफपीने मोहसिन फखरीजादेह यांच्या हत्येचं वृत्त दिलं.
कशी करण्यात आली हत्या?
इराणच्या संरक्षण मंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलंय, "संरक्षण मंत्रालयाच्या संशोधन आणि नवीन उत्पादन विभागचे प्रमुख मोहसिन फखरीजादेह यांना घेऊन जाणाऱ्या कारला सशस्त्र दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं."
मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार फखरीजादेह यांचे अंगरक्षक आणि दहशतवादी यांच्यात झटापट झाली. यामध्ये ते गंभीर जखमी झाले. त्यांना स्थानिक रुग्णालयात नेण्यात आलं, पण दुर्दैवाने त्यांना वाचवण्याचे वैदयकीय पथकाचे प्रयत्न अयशस्वी ठरले.
इराणच्या फारस वृत्तसंस्थेनुसार, या हल्ल्यादरम्यान तिथे असणाऱ्यांना आधी एक स्फोट ऐकू आला आणि नंतर मशीनगनमधून गोळीबार करण्याचा आवाज आला.
या चकमकीदरम्यान तीन - चार दहशतवादीही मारले गेल्याचं तिथे हजर असणाऱ्यांनी म्हटलंय.
यामागे इस्त्रालयचा हात?
इराणचे परराष्ट्र मंत्री जवाद जरीफ यांनी ट्वीट केलंय, "दहशतवाद्यांनी आज इराणच्या एका प्रमुख वैज्ञानिकाची हत्या केलीय. या भेकड कारवाईमागे इस्त्रायलचा हात असल्याचे गंभीर संकेत मिळत असून हत्यारांनी युद्ध करण्याचा इरादा यातून दिसतो. आंतरराष्ट्रीय समुदाय, विशेषतः युरोपियन युनियनला इराणची विनंती आहे की त्यांनी आपली लाजिरवाणी दुटप्पी भूमिका सोडून या दहशतवादी घटनेचा निषेध करावा."
तर इराण आपल्या वैज्ञानिकाच्या हत्येचा बदला नक्की घेईल असं इराणी लष्कराच्या इस्लामिक रेव्होल्यूशनरी गार्ड कॉर्प्स (IRGC) ने म्हटलंय.
मोहसिन फखरीजादेह कोण होते?
मोहसिन फखरीजादे इराणचे सर्वात महत्त्वाचे अणु शास्त्रज्ञ होते आण् IRGCचे ज्येष्ठ अधिकारी होते. पाश्चिमात्य देशांतल्या संरक्षण तज्ज्ञांच्या मते ते इराणमधले अतिशय प्रभावशाली व्यक्ती होते आणि इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमामध्ये त्यांची महत्त्वाची भूमिका होती.
फखरीजादे यांनीच इराणमध्ये अण्वस्त्र कार्यक्रम सुरू केला होता, असा दावा 2018मध्ये इस्त्रायलने काही गुप्त पुराव्यांच्या आधारे दावा केला होता.
मोहसिन फखरीजादे हेच इराणच्या अण्वस्त्र कार्यक्रमाचे प्रमुख वैज्ञानिक असल्याचं सांगत 'हे नाव लक्षात ठेवा' असं त्यावेळी नेतन्याहू यांनी पत्रकारपरिषदेत म्हटलं होतं.
तर 2015मध्ये न्यूयॉर्क टाईम्सने फखरीजादेह यांची तुलना दुसऱ्या महायुद्धातला अणुबॉम्ब बनवणाऱ्या ओपनहायमर यांच्याशी केली होती.
इस्त्रायलने अजून फखरीजादेह यांच्या हत्येविषयी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.