उत्तर कोरियात केळी 3000 रुपये किलो

शुक्रवार, 18 जून 2021 (13:18 IST)
उत्तर कोरिया अन्नधान्याच्या प्रचंड टंचाईचा सामना करत असल्याचं देशाचे सर्वेसर्वा किम जाँग-उन यांनी पहिल्यांदाच मान्य केलं आहे. पक्षाच्या ज्येष्ठ नेत्यांच्या बैठकीत त्यांनी म्हटलं की, नागरिकांसाठीच्या अन्नधान्याची स्थिती आता तणावपूर्ण होत आहे.
 
किम यांनी म्हटलं, गेल्या वर्षी पूर आल्यामुळे कृषी क्षेत्र पुरेशा प्रमाणात अन्नधान्याचं उत्पादन करू शकलं नाही. देशातील अन्नधान्याच्या किंमतीत प्रचंड वाढ होत असल्याच्या बातम्या येत आहेत. उत्तर कोरियाची वृत्तसंस्था एनके न्यूजच्या बातमीनुसार, देशात केळी 3 हजार रुपये प्रती किलो या दरानं विकली जात आहे.
 
कोरोनाच्या साथीमुळे उत्तर कोरियासमोरील हे संकट अधिक गडद झालं आहे. कारण उत्तर कोरियानं कोरोनाच्या काळात शेजारील देशांबरोबरची सीमा बंद केली होती. यामुळे चीनसोबचा व्यापार कमी प्रमाणात झाला. उत्तर कोरिया अन्नधान्य, खाद्यपदार्थ आणि इंधनासाठी चीनवर अवलंबून आहे.
 
याशिवाय देशातील आण्विक चाचण्यांमुळे लावण्यात आलेल्या आंतरराष्ट्रीय निर्बंधांचा सामनाही उत्तर कोरिया सध्या करत आहे.
 
किम जाँग-उन यांनी देशातल्या सत्ताधारी वर्कर्स पार्टीच्या सेंट्रल कमिटीच्या बैठकीत देशातल्या अन्नधान्याच्या टंचाईविषयी चर्चा केली. ही बैठक या आठवड्यात राजधानी प्याँगयांग येथे सुरू झाली आहे. उत्तर कोरियातलं कृषी उत्पादन कमी झालेलं असलं, तरी गेल्या वर्षाशी तुलना केल्यास देशातील औद्योगिक उत्पादन वाढल्याचं किम यांनी म्हटलंय.
 
या बैठकीत अमेरिका आणि दक्षिण कोरिया यांच्यातील संबंधांविषयी चर्चा होणार होती, पण याविषयीची अधिक माहिती अद्याप देण्यात आलेली नाहीये.
 
आपला देश अनेक अडचणींचा सामना करत आहे, असं किम यांनी एप्रिल महिन्यात मान्य केलं होतं. त्यावेळेस ही एक दुर्मीळ बाब असल्याचं बोललं गेलं.
 
आपल्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी पुन्हा एका The Arduous March (अवघड मार्ग) अवलंब करावा लागेल, असं त्यावेळेस त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितलं होतं.
 
या शब्दाचा उच्चार देशात नव्वदच्या दशकात करण्यात आला होता. यावेळी देशात मोठा दुष्काळ पडला होता. त्यावेळी सोव्हियत संघाचं विभाजन झाल्यानंतर उत्तर कोरियाला मिळणारी मदत बंद झाली होती.
 
त्या दुष्काळात नेमका किती जणांचा मृत्यू झाला, याची स्पष्ट अशी माहिती नसली तरी जवळपास 30 लाख जणांचा जीव गेला होता, असं मानलं जातं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती