इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पतीपासून विभक्त, घटस्फोटाचं 'हे' आहे कारण

शनिवार, 21 ऑक्टोबर 2023 (20:01 IST)
मार्क लोवेन आणि लॉरा गोझ्झी
 इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी आणि त्यांचे जोडीदार आंद्रिया जियामब्रुनो हे एकमेकांपासून विभक्त होणार आहेत. या दोघांनीही तशी घोषणा केलीय.
 
जियामब्रुनो यांनी महिला सहकाऱ्यांवर केलेल्या लैंगिक टिप्पणीनंतर मेलोनी यांनी काही तासांतच त्यांच्या सोशल मीडिया अकाऊंटवर या निर्णयाबाबत माहिती दिली.
 
मेलोनी यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर लिहिले आहे की, "माझे आंद्रिया जियामब्रुनो सोबतचे नाते इथेच संपले आहे. आम्ही जवळपास 10 वर्षे एकत्र राहिलो. आमचे मार्ग बऱ्याच काळापासून वेगळे होते. आता ते स्वीकारण्याची वेळ आली आहे."
 
या दोघांची भेट 2015 साली झाली असून या जोडप्याला सात वर्षांची मुलगी आहे.
 
जॉर्जिया मेलोनी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये आंद्रिया जियामब्रुनोचे आभार देखील मानले आहेत. त्या लिहितात, "आम्ही एकमेकांसोबत उत्तम सहजीवन अनुभवले. अडचणीच्या काळात साथ देत, मला माझ्या मुलीच्या रूपात एक सुंदर गोष्ट दिली."
 
त्या पुढे लिहितात, "माझ्या कुटुंबावर प्रहार करून मला कमकुवत करू पाहणाऱ्या सर्वांनी हे जाणून घेतलं पाहिजे की पाण्याचा एक थेंब दगड फोडण्याची अपेक्षा करत असेल तर तो पाण्याचा एक छोटासा थेंब आहे आणि दगड नेहमीच दगड राहील."
 
या आठवड्याच्या सुरुवातीला स्ट्रिसिया ला नोटिझिया या उपहासात्मक टीव्ही शो मध्ये, जियामब्रुनोने एका महिला सहकाऱ्यावर ऑफ-कॅमेरा टिपण्णी केली होती. त्या महिला सहकाऱ्याशी प्रेमाचे चाळे करताना त्याने म्हटलं होतं की, "तू खूप हुशार आहेस... मी तुला लवकर का भेटलो नाही?"
 
त्यानंतर गुरुवारी आणखीन एक ऑफ कॅमेरा टिपण्णी प्रसारित करण्यात आली. यात जियामब्रुनो दुसऱ्या एका महिला सहकाऱ्याला विचारतोय की, "ती सिंगल आहे का? की ओपन रिलेशनशिपमध्ये आहे?"
 
तो ज्या टीव्ही कंपनीसाठी काम करतो तेथील प्रत्येकाला तो काही ना काही म्हणताना दिसतोय. सोबतच काही ठिकाणी ग्रुप सेक्सचा अश्लील संदर्भही आला आहे.
 
जियामब्रुनो विचारतोय की, "तुम्ही आमच्या ग्रुपमध्ये सहभागी व्हाल का?"
यावर दुसरी व्यक्ती प्रत्युत्तरात विचारते की, "जर तुमचा आवाज स्ट्रिसिया शोने रेकॉर्ड केला असेल तर?"
 
त्यावर प्रतिसाद देताना जियामब्रुनोचा हसण्याचा आवाज येतो आणि तो म्हणतो की, "मी जे काही म्हणालोय, ते इतकं वाईट आहे का? आम्ही हसतोय, विनोद करतोय."
 
इटलीच्या पंतप्रधानांनी या ऑफ-एअर टिप्पण्यांबद्दल आपल्या सोशल मीडिया पोस्टमधून काहीही उत्तर दिलेलं नाही.
 
मात्र, जियामब्रुनो वादात सापडण्याची ही पहिलीच वेळ नाहीये. टीव्ही पत्रकार असलेल्या जियामब्रुनोने एका कार्यक्रमादरम्यान अत्याचार पीडितेलाच दोष दिला होता. शिवाय, या पीडितेवरच अनेक प्रश्न उपस्थित केले. तो म्हणाला होता की, "तुम्ही नाचत असाल तर तुम्हाला दारू पिण्याचा पूर्ण अधिकार आहे. पण जर महिलांना बलात्कार टाळायचा असेल तर त्यांनी दारू पिणे टाळावे."
 
त्यावेळी जॉर्जिया मेलोनी यांनी जियामब्रुनोची बाजू घेतली होती. त्या म्हणाल्या होत्या, त्याच्या म्हणण्याचा चुकीचा अर्थ लावण्यात आला आहे. एक पत्रकार त्याचे काम करत असताना जे काही बोलतो त्याबद्दल मला जबाबदार धरू नका."
 
पारंपारिक कॅथलिक कौटुंबिक मूल्यांवर दृढ विश्वास असलेल्या जॉर्जिया या त्यांची विधाने आणि उजव्या विचारसरणीमुळे सतत चर्चेत असतात. जॉर्जिया स्वत:ला मुसोलिनीचा वारस म्हणवून घेऊन एलजीबीटी समुदायाला विरोध केल्यामुळेही चर्चेत होत्या.
 
या प्रकरणानंतर सेंटर लेफ्ट डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार आणि एलजीबीटीक्यू अधिकारांचे समर्थक अलेसेंड्रो झान म्हणाले की, तिच्या विभक्त होण्याच्या निर्णयानंतर तिने इतर कुटुंबांना शांततेत जगू दिलं पाहिजे.
 
तर दुसऱ्या बाजूला जॉर्जिया यांचे डेप्युटी असलेल्या मॅटेओ साल्विनी यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स (पूर्वीचे ट्विटर) वर त्यांना पाठिंबा जाहीर केलाय.
 
इटलीचे परराष्ट्र मंत्री अँटोनियो ताजानी यांनी लिहिलंय की, "जॉर्जिया, मी तुला प्रेमाचं आलिंगन पाठवत आहे."
 
स्ट्रिसिया ला नोटिझियाचे निर्माते अँटोनियो रिक्की यांनी अंसा वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं की, "मेलोनी यांना एक दिवस कळेल की मी त्यांच्यावर किती उपकार केले आहेत."
 
मीडियासेट हा वृत्तसमूह माजी पंतप्रधान आणि मेलोनी यांचे सहयोगी दिवंगत सिल्व्हियो बर्लुस्कोनी यांच्या वारसांच्या मालकीचा आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती