बेंजामीन नेतान्याहू यांच्या पत्नीला 15 हजार डॉलरचा दंड

सोमवार, 17 जून 2019 (11:16 IST)
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामीन नेतान्याहू यांच्या पत्नी सारा नेतान्याहू यांना जेरूसलेम येथील न्यायालयाने सरकारी निधीचा गैरवापर केल्याच्या आरोपावरून 15 हजार डॉलरचा दंड ठोठावला आहे. पंतप्रधानांच्य कुटुंबीयांचा सहभाग असलेल्या या हायप्रोफाईल भ्रष्टाचाराच्या प्रकरणाचा खटला देशभर गाजला होता. सारा नेतान्याहू यांनी कबुली दिल्यानंतर न्यायालयाने त्यांना हा दंड ठोठावला आहे.
 
सारा नेतान्याहू यांनी 1 लाख डॉलरच्या सरकारी निधीचा विनियोग मेजवानीवर खर्च केला असल्याचा त्यांच्यावर आरोप होता. हॉटेलांवर वारेमाप खर्च आणि अधिकृत निवासस्थानी 2010 ते 2013 या काळात पूर्णवेळ शेफची नियुक्‍ती केल्याने गेल्या वर्षी सारा यांच्यावर भ्रष्टाचार आणि विश्‍वासघाताचा आरोप ठेवण्यात आला होता.
 
तडजोडीनुसार सारा यांनी 2,800 डॉलरचा दंड भरण्याची तयारी दाखवली. तर उर्वरित 12,500 डॉलर सरकारी तिजोरीमध्ये जमा करण्यास मान्यता दिली. या तडजोडीनुसार त्यांच्याविरोधातील 50 हजार डॉलरच्या थकबाकीला माफ करण्यात आले आहे. या खटल्यामुळे नेतान्याहू यांच्या कुटुंबाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभे रहायला लागले होते. त्यामुळे त्यांच्या विरोधातही भ्रष्टाचाराचा खटला प्रलंबित आहे.
 
अब्जाधीश मित्रांच्या वर्तमानपत्राच्या फायद्यसाठी जाहिरातीबाबतचा कायदा करण्याच्या बोलीवर उंची भेटी स्वीकारण्याचा आरोप नेतान्याहू यांच्यावर ठेवण्यात आला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती