शनिवारी इस्रायलने लेबनॉनमधील अनेक ठिकाणांवर हल्ले केले. लेबनॉनमधून इस्रायलवर डागण्यात आलेल्या रॉकेट हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे. गेल्या युद्धबंदीनंतरचा हा सर्वात मोठा संघर्ष असल्याचे वर्णन केले जात आहे. शुक्रवारी लेबनॉनमधून इस्रायलवर रॉकेट डागण्यात आले होते. डिसेंबरनंतरचा हा दुसरा हल्ला होता, ज्यामुळे युद्धबंदीच्या भविष्याबद्दल चिंता निर्माण झाली आहे. प्रत्युत्तर म्हणून, इस्रायलने लेबनॉनमधील डझनभर ठिकाणांवर हल्ले केले आहेत.
7 ऑक्टोबर 2023 रोजी हमासने इस्रायलवर हल्ला केल्यानंतर हिजबुल्लाहने इस्रायलवर रॉकेट आणि ड्रोन हल्ले सुरू केले. सप्टेंबर 2024 मध्ये इस्रायलने लेबनॉनवर मोठ्या प्रमाणात हवाई हल्ले सुरू केले तेव्हा हा संघर्ष पूर्ण युद्धात रूपांतरित झाला. इस्रायलने केलेल्या या हल्ल्यांमध्ये हिजबुल्लाहचे अनेक वरिष्ठ नेते मारले गेले. या संघर्षामुळे आतापर्यंत 4,000हून अधिक लेबनीज नागरिक मारले गेले आहेत, तर 60,000 हून अधिक इस्रायली लोकांना त्यांचे घर सोडण्यास भाग पाडले गेले आहे.