महागाई : जपानसाठी जगभरातली महागाई गुड न्यूज ठरतेय, कारण..

गुरूवार, 21 एप्रिल 2022 (15:12 IST)
एकीकडे जगभरात बहुतांश भागात महागाईची झळ बसून सर्वसामान्य नागरीक त्रस्त आहे. अन्नपदार्थ, इंधन, घरभाडं यांच्यासोबतच जवळपास प्रत्येक गोष्टी जगभरात गेल्या काही दिवसांत महागल्या आहेत.
 
युनायटेड नेशन्सच्या फुड अँड अॅग्रीकल्चर ऑर्गनायझेशन संस्थेकडून दरवर्षी फुड प्राईज इंडेक्स जाहीर केले जातात. महागाईचा निर्देशांक म्हणून या आकड्यांकडे पाहिलं जातं. हे आकडेसुद्धा आजवरच्या सर्वोच्च पातळीवर पोहोचल्याचं दिसून येतं.
 
सद्यस्थितीत जपानमध्ये महागाईत 0.9 टक्क्यांनी वाढ झालीय. याठिकाणी फेब्रुवारी महिन्यातील महागाई दर 7.9 टक्के इतका होता. तर अमेरिकेत हाच दर 6.2 इतका राहिला.
 
दक्षिण अमेरिकेचा विचार करायचा झाल्यास चिलीमध्ये यंदा महागाईचा दर 7.8 टक्के दिसून आला. मेक्सिकोमध्ये हा दर 7.2 तर कोलंबियात हाच दर 8.1 टक्के इतका होता.
 
एकूण काय, तर जगभरात महागाईने पातळी ओलांडली आहे. सर्वच देश आपल्या देशातील महागाई आटोक्यात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.
 
पण दुसरीकडे, जपान मात्र या परिस्थितीमुळे सुखावल्याचं दिसून येत आहे. जपानला देशातील महागाई आणखी वाढावी, असं वाटतं. त्यासाठी हा देश कित्येक वर्षांपासून प्रयत्नही करत असल्याचं दिसून येतं.
 
जपानच्या सेंट्रल बँकेच्या उद्दीष्टानुसार येथील महागाई दर सुमारे 2 टक्के आहे. त्यांच्या मते, ही पातळी पोषक अशीच आहे.
 
पण मुख्य प्रश्न हा की लोकांच्या खरेदी करण्याच्या क्षमतेवर मारा करणाऱ्या महागाईचं स्वागत जपानमध्ये का केलं जात असावं?
 
युनिव्हर्सिटी ऑफ कॅलिफोर्नियामधील जीपीएस स्कूल ऑफ ग्लोबल पॉलिसी अँड स्ट्रॅटेजी येथील प्राध्यापक उलरिक शेड सांगतात, "आर्थिक वाढीच्या नियमांनुसार, चलनवाढीची माफक स्वरुपातील वाढ ही अर्थव्यवस्थेच्या वाढीला चालना देते. हेच जपानच्या संथ विकासाला वेग देऊ शकते."
 
त्यांच्या मते, "चलन वाढीशिवाय अर्थव्यवस्थेचा विकास करणं अवघड आहे. पण हा बदल अतिशय टोकाचा होतो, तेव्हा यामध्ये असंतुलन दिसून येतं."
 
सध्या रशिया-युक्रेन युद्धाच्या पार्श्वभूमीवर जपानमधील इंधनाचे दर गगनाला भिडले आहेत. हा दर गेल्या 30 वर्षांतील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे.
 
चलनवाढीनंतर जपानमधील लोक इंधनाचा वापर जास्त करण्यास अनिच्छुक आहेत. तसंच त्यासाठी जास्त किंमत मोजण्याचीही त्यांची तयारी नाही, ही गोष्ट जपानला वेगळं बनवते.
 
याविषयी समजावून सांगताना, पोर्टलँड स्टेट युनिव्हर्सिटीच्या अर्थशास्त्र विभागप्रमुख हिरोयुकी ईटो सांगतात, "तुम्हाला पाहिजे असलेल्या वस्तूंच्या किमती घसरतील, असं तुम्हाला वाटत असतं, तेव्हा तुम्ही खरेदी पुढे ढकलून थांबता आणि प्रतीक्षा करता. याउलट, जर तुम्हाला वाटत असेल की आजच्या तुलनेत भविष्यात वस्तूंच्या किमती वाढणार आहेत, तेव्हा तुम्ही शक्य तितक्या लवकर त्यांची खरेदी करण्याचा निर्णय घेता."
 
त्यामुळे या कालावधीत ग्राहक खर्च पुढे ढकलण्याला प्राधान्य देतात. त्यामुळे कंपन्यांना त्यादृष्टीने संतुलन राखावं लागतं.
 
सर्व बाबींचा विचार करता, चलनवाढीदरम्यान कंपन्या किंमती वाढवण्याचा प्रयत्न क्वचितच करतात. त्यामुळे वेतन आणि महागाई दर वर्षानुवर्षे समान पातळीवर राहतं. अर्थव्यवस्थेचं चक्र चालू राहण्यास त्यामुळे मदत मिळू शकते.
 
मॅसॅच्युसेट्समध्ये विलियम कॉलेज ऑफ इकोनॉमिक्समधील प्राध्यापक केन कुटनर याविषयी सांगतात, "जपान गेल्या काही काळापासून शून्य किंवा नकारात्मक चलनवाढीशी झुंजत आहे. पण त्याचा अर्थ असा नाही की उच्च चलनवाढ ही चांगली गोष्ट आहे. ही वाढ नेमकी कशामुळे होत आहे, यावर सगळं काही अवलंबून आहे."
 
सध्या निर्माण झालेली महागाई ही बाह्य घटकांमुळे आहे. ती क्षणिक स्वरुपाचीही आहे. या स्थितीत जपानी उत्पादकांना केवळ मजूर आणि खर्चाचा सामना करावा लागत नाही, तर कच्च्या मालाचीही भाववाढ झाली आहे.
 
हिरोयुकी ईटो यांच्या मते, या महागाईचा जपानला फायदा होऊ शकतो. हा देशासाठी अंशतः स्वरुपात आदर्श बदल असेल, असं त्यांना वाटतं. पण ही सर्वस्वी चांगली गोष्टही नाही, याकडेसुद्धा त्यांनी लक्ष वेधलं हे विशेष.
 
ईटो सांगतात, "उत्पादनांच्या प्रचंड मागणीमुळे होणारी भाववाढ हीच अर्थव्यवस्थेला चालना मिळण्यासाठी चांगली गोष्ट असते. सध्याच्या दरवाढीला अनेक वेगळी कारणे आहेत. उदा. पुरवठा साखळीतील समस्या, कोरोना साथ, लॉकडाऊन आणि युक्रेन युद्ध इ."
 
याव्यतिरिक्त जपानमध्ये लोकसंख्येत वृद्धांचं प्रमाणही यावर परिणाम करतं. वयोवृद्ध नागरीक पेंशनवर अवलंबून असतात. पैसे वाचवण्यावर त्यांचा भर असतो. त्यांचा पैसा अर्थव्यवस्थेत खेळता राहणं महत्त्वाचं आहे. गेली अनेक वर्षे जपानची अर्थव्यवस्था संथ गतीने वाढत आहे. त्याला यामुळे चालना मिळाल्यास ते उपयोगी ठरू शकतं.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती