भारतीय शास्त्रज्ञांनी अंटार्क्टिकात शोधून काढली वनस्पतीची नवी प्रजाती
सोमवार, 12 जुलै 2021 (20:44 IST)
सौतिक बिश्वास
अंटार्क्टिका खंडात भारतीय शास्त्रज्ञांनी वनस्पतीची नवी प्रजाती शोधून काढली आहे.
ध्रुवीय प्रदेशात काम करणाऱ्या जीवशास्त्रज्ञांनी बर्फाच्छादित अशा या प्रदेशात 2017 मध्ये हाती घेतलेल्या मोहिमेत या वनस्पतीची प्रजाती शोधून काढली होती. पाच वर्षांनंतर त्यांच्या शोधावर शिक्कामोर्तब झालं आहे.
वनस्पतीची ही प्रजाती नवी असून, त्याचा शोध लावण्याच्या कामाची शहानिशा होण्याची प्रक्रिया प्रदीर्घ अशी होती. याकरिता पाच वर्षांचा कालावधी लागला.
जर्नल ऑफ एशिया पॅसिफिक बायोडायर्व्हसिटी या आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या जर्नलमध्ये शोधाची दखल घेण्यात आली आहे.
पंजाबमधील सेंट्रल युनिव्हर्सिटीमधून भारतीय शास्त्रज्ञांचा चमू या मोहिमेवर गेला होता. त्यांनी या वनस्पतीच्या प्रजातीला 'ब्रुयम भारतीइनिस' असं नाव दिलं आहे. भारतावरूनच या वनस्पतीच्या प्रजातीला नाव देण्यात आले आहे.
भारताच्या अंटार्क्टिकामधील संशोधन केंद्राचं नावही 'भारती' असंच आहे.
प्राध्यापक फेलिक्स बास्ट हे जीवशास्त्रज्ञ अंटार्क्टिकाला सहा महिने गेलेल्या तुकडीचा भाग होते. भारतीय शास्त्रज्ञांची ही 36वी मोहीम होती.
या शास्त्रज्ञांच्या गटाने लार्समन हिल्स या ठिकाणी जानेवारी 2017मध्ये, गडद हिरव्या रंगाची वनस्पतीची प्रजाती शोधून काढली. जगातलं अतिदुर्गम समजल्या जाणाऱ्या भारती या संशोधन केंद्रापासून अगदी जवळच शास्त्रज्ञांना ही प्रजाती आढळली.
वनस्पतींना जगण्यासाठी नायट्रोजन, पोटॅशियम, फॉस्फरस, सूर्यप्रकाश आणि पाणी लागतं. अंटार्क्टिकात केवळ एक टक्का भूभाग बर्फाविना आहे.
अशा शीत वातावरणात, खडकाळ तसंच बर्फाच्छादित प्रदेशात ही मॉसरुपी वनस्पती कशी उगवली आणि टिकून राहिली हा खरा प्रश्न आहे असं प्राध्यापक बास्ट म्हणाले.
पेंग्विन जिथे मोठ्या प्रमाणावर असतात तिथे ही वनस्पती आढळते असं शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं. पेंग्विनच्या विष्ठेत नायट्रोजन असतं.
इथल्या वनस्पती पेंग्विनच्या विष्ठेत आढळणाऱ्या नायट्रोजनच्या बळावर जगतात. विष्ठेचं हवेत विघटन न होता खत म्हणून वनस्पतीला पूरक ठरतं असं प्राध्यापक बास्ट यांनी सांगितलं.
सूर्यप्रकाशाचं काय? संपूर्ण प्रदेश सहा महिने बर्फाच्छादित असताना, वातावरण उणे 76 असताना ही वनस्पती जिवंत कशी राहते याचं कोडं शास्त्रज्ञांनाही अद्याप उलगडलेलं नाही. त्या काळात तिथे जराही सूर्यप्रकाश उपलब्ध नसतो.
शास्त्रज्ञांच्या मते, बर्फाच्छादित काळात ही वनस्पती आकुंचन पावून स्वत:ला बी स्वरुपात स्वत:ला संरक्षित करत असेल. उन्हाळ्यात सूर्यप्रकाश मिळू लागला की वाढत असेल. बर्फ वितळून पाणी होतं ते या वनस्पतीला उपयुक्त ठरतं.
या वनस्पतीचे नमुने गोळा केल्यानंतर शास्त्रज्ञांनी पाच वर्ष अभ्यास केला. डीएनए अर्थात गुणसूत्रांचा अभ्यास केला. या वनस्पतीचे गुणधर्म अन्य वनस्पतींशी पडताळून पाहिले. अंटार्क्टिका या अतिशीत वातावरणाच्या खंडात शंभरहून अधिक मॉसरुपी वनस्पती आढळतात.
या मोहिमेदरम्यान शास्त्रज्ञांना हवामान बदलामुळे झालेले बदल चिंताजनक वाटले. हवामान बदलाचा परिणाम हिमनद्यावर होऊन त्या वितळताना दिसल्या.
अंटार्क्टिका हिरवंगार होत आहे. प्रचंड थंड वातावरणामुळे, बर्फाच्या दाट आवरणामुळे बहुतांश वनस्पती या भागात जिवंत राहू शकत नाहीत. मात्र हवामान बदलामुळे तापमान वाढू लागल्याने वनस्पती या भागात तग धरू लागल्या आहेत असं प्राध्यापक बास्ट यांनी सांगितलं.
अंटार्क्टिका हिरवंगार होणं ही धोक्याची सूचना असल्याचं प्राध्यापक राघवेंद्र प्रसाद तिवारी म्हणाले. ते देशातील आघाडीचे जीवशास्त्रज्ञ आहेत आणि सेंट्रल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहेत.
बर्फाच्या घनदाट आवरणाखाली काय आहे हे आपल्याला समजू शकत नाही. वातावरण तापल्याने बर्फाखाली दडलेले रोगप्रसार करणारे सूक्ष्मजीव बाहेर येऊ शकतात.
भारताने अंटार्क्टिकात संशोधन केंद्र सुरू केल्यानंतर, म्हणजेच चार दशकात पहिल्यांदाच वनस्पतीच्या नव्या प्रजातीचा इथे शोध लागला आहे.
पहिलं संशोधन केंद्र 1984 मध्ये सुरू करण्यात आलं आणि 1990 मध्ये बर्फाखाली दबलं गेल्याने ते बंदही झालं. मैत्री आणि भारती ही संशोधन केंद्र अनुक्रमे 1989 आणि 2012 मध्ये सुरू करण्यात आली. संपूर्ण वर्षभर या केंद्रांचं काम सुरू असतं.