पाकिस्तानच्या भ्रष्टाचार विरोधी न्यायालयाने माजी पंतप्रधान इम्रान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना भ्रष्टाचाराच्या एका प्रकरणात दोषी ठरवले आहे. माजी पंतप्रधान इम्रान खान यांना 14 वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर त्यांची पत्नी बुशरा बीबी हिला सात वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. इम्रान खानला 10 लाख आणि पत्नीला 5 लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
न्यायालयात झालेल्या सुनावणीदरम्यान अभियोक्ता जनरल सरदार मुझफ्फर अब्बासी यांच्या नेतृत्वाखाली नॅशनल अकाउंटेबिलिटी ब्युरो (एनएबी) ची टीम हजर होती. याशिवाय माजी पंतप्रधान इम्रान खान यांची पत्नी बुशरा बीबर, पीटीआयचे बॅरिस्टर गौहर खान, शोएब शाहीन, सलमान अक्रम राजा आणि इतर वकील तुरुंगात उपस्थित होते.
इस्लामाबादच्या लाचलुचपत प्रतिबंधक न्यायालयाचे न्यायाधीश नासिर जावेद राणा यांनी 18 डिसेंबर रोजीच या प्रकरणाची सुनावणी पूर्ण केली होती. त्यांनी यापूर्वीही या प्रकरणाचा निर्णय तीनवेळा पुढे ढकलला आहे. निकाल जाहीर होताच पोलिसांनी बुशरा बीबीला ताब्यात घेतले. निकालात माजी पंतप्रधान इम्रान खान यांना भ्रष्टाचार आणि सत्तेचा गैरवापर केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आले आहे. तर बुशरा बीबी बेकायदेशीर कामात गुंतल्याप्रकरणी दोषी आढळली. न्यायाधीशांनी अधिकाऱ्यांना अल-कादिर ट्रस्ट युनिव्हर्सिटी सरकारकडे सोपवण्याचे निर्देश दिले. या निर्णयानंतर अडियाला तुरुंगाची सुरक्षा वाढवण्यात आली आहे.
इम्रान खान म्हणाले की, या निर्णयामुळे न्यायपालिकेच्या प्रतिष्ठेला कलंक लागला आहे. या प्रकरणात ना मला फायदा झाला ना सरकारचे नुकसान झाले. मला कोणताही दिलासा नको आहे आणि मी सर्व प्रकरणांना सामोरे जाईन. एक हुकूमशहा हे सर्व करत असल्याचे ते म्हणाले.
या विद्यापीठासाठी असलेल्या निवासी संकुलाची जमीन इम्रान आणि त्याच्या पत्नीने बेकायदेशीरपणे हडप केल्याचा आरोप आहे. यासाठी या दोघांनी पाकिस्तानचे सर्वात श्रीमंत व्यक्तिमत्व मलिक रियाझ यांना धमकीही दिली होती. इम्रानची पत्नी बुशरा बीबी हिने पाच कॅरेटची हिऱ्याची अंगठी मागितल्याचेही समोर आले आहे. याशिवाय माजी पंतप्रधान, त्यांची पत्नी बुशरा बीबी आणि इतर पीटीआय नेत्यांवरही राष्ट्रीय तिजोरीला सुमारे 50 अब्ज पाकिस्तानी रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप आहे.