उरुग्वे आणि अर्जेंटिनाच्या सीमेवर असलेल्या रिओ ग्रांदे डो सुलच्या नागरी संरक्षण प्राधिकरणाने सांगितले की, 67 लोक अद्याप बेपत्ता आहेत. 32 हजारांहून अधिक लोक बेघर झाले आहेत. राज्यातील 497 शहरांपैकी दोन तृतीयांश शहरांना या वादळाचा फटका बसला आहे. पुरामुळे अनेक भागातील रस्ते आणि पूल उद्ध्वस्त झाले. भूस्खलनामुळे एका लहान जलविद्युत प्रकल्पातील धरणाचे अंशत: नुकसान झाले. बेंटो गोन्साल्विस शहरातील दुसरे धरणही कोसळण्याचा धोका आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
रिओ ग्रांदे डो सुलची राजधानी पोर्टो अलेग्रे येथील गुएबा सरोवरात पाणी वाढले, रस्त्यावर पूर आला. पोर्टो अलेग्रेच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाने सर्व उड्डाणे अनिश्चित काळासाठी स्थगित केली आहेत. राज्याच्या हवामान खात्यानुसार, पुढील छत्तीस तासांत रिओ ग्रांदे डो सुलच्या उत्तर आणि ईशान्येकडील भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मात्र, पावसाचे प्रमाण सध्या कमी होत आहे.