एकादिवसात 6 वेळा हृदय बंद पडलं, डॉक्टरांच्या मदतीमुळे मिळालं नवं आयुष्य

शुक्रवार, 6 ऑक्टोबर 2023 (19:23 IST)
एका दिवसात सहा वेळा ह्रद बंद पडण्याचा अनुभव घेतलेल्या विद्यार्थ्याने आपल्या अनुभवांवरून हा निर्णय घेतला आहे की, तो त्याचा जीव वाचवणऱ्या डॉक्टरांच्या पावलावर पाऊल ठेवेल.
अतुल राव या 21 वर्षीय तरूणाला 27 जुलै रोजी त्यांच्या फुफ्फुसात रक्ताच्या गुठळ्या झाल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला.
 
त्यानंतर एका दिवसात त्याचे ह्रदय पाच वेळा बंद पडले. क्लॉट-बस्टिंग ड्रग्स दिल्यानंतर ते स्थिरावले.
 
लंडनमध्ये पूर्व वैद्यकीय पदवीचा अभ्यास करणारा अमेरिकन नागरिक अतुल म्हणाला, या अनुभवानंतर त्याला वैद्यकीय क्षेत्रातच करिअर करण्याची इच्छा निर्माण झाली आहे.
 
"हे घडण्यापूर्वी, वैद्यकशास्त्राचा अभ्यास करण्याचा माझा निर्णय योग्य आहे की मी एखादा व्यवसाय करावा याविषयी संभ्रमात होतो.
 
"पण ज्या क्षणी मी शुद्धीवर आलो, मला कळलं होतं. मला माझ्या वेळेचा सदुपयोग करायचा आहे. मला मिळालेल्या जीवनदानाचा उपयोग आयुष्यात इतरांना मदत करण्यासाठी करायचा आहे."
 
अतुल आणि त्याच्या पालकांनी त्यानंतर त्याचा जीव वाचवणाऱ्या रुग्णालयातील कर्मचाऱ्यांची भेट घेतली.
 
अतुलला सेंट थॉमस रूग्णालयामध्ये हलवण्याआधी सुरुवातीला ज्या हॅमरस्मिथ रूग्णालयात उपचार करण्यात आले होते त्यांनी तिथल्या बेडची जागा दाखवली, जिथे त्याचे हृदय अनेकदा बंद पडून सुरू झाले होते आणि नेमकं काय घडलं याबद्दल डॉक्टरांशी गप्पा मारल्या.
 
सिएटलमध्ये गणिताची प्राध्यापक असलेली त्याची आई श्रीविद्या म्हणाली: “अतुलच्या आजूबाजूला काम करणार्‍या प्रत्येकाची इच्छा होती की तो बरा व्हावा. हे साहाजिक आहे की ते जे काही करतात त्याबद्दल त्यांना प्रेम आणि काळजी वाटते. मला इथे आल्यावर आनंद झाला आणि माझा मुलगा मला परत दिल्याबद्दल मी तुमची खूप आभारी आणि कृतज्ञ आहे.
 
"मला आयुष्याचा एक वेगळा दृष्टिकोन मिळाला आहे आणि त्याला हे सर्व इतक्या लहान वयात बघायला मिळतंय. त्याचं आयुष्य बदललं आहे आणि या गोष्टीचा त्याच्यावर अतिशय खोलवर परिणाम झाला आहे."
 
अतुलने सांगितले की, ही घटना त्याच्या 21 व्या वाढदिवसाच्यावेळी घडली.
 
"21 वर्षांच्या बहुतेक मुलांना वाढदिवासानिमित्त मद्यपान करायला बाहेर जायचे असते. पण माझी परिस्थिती किती धोकादायक होती हे लक्षात घेता, माझ्यावर प्रेम करणारे लोक माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी माझ्या आजूबाजूला आहेत याबद्दल मी कृतज्ञ आहे."
 
एका सॉफ्टवेअर कंपनीत काम करणारे त्याचे वडील अजय यांना आठवलं की कसं 'लंडन अॅम्ब्युलन्स सर्व्हिस'चे वरिष्ठ पॅरामेडिक निक सिलेट यांनी त्यांच्या मुलाच्या मोबाईलद्वारे घटनास्थळावरून ही बातमी दिली.
 
कॉल दरम्यान घेतलेल्या अगदीच सुवाच्य अक्षरातील नोट्स त्यांनी सिलेट यांना दाखवल्या, त्यांचे हात थरथरत होते आणि त्यांच्या मुलाला वाचवण्यासाठी काही निर्णय घेतले जात आहेत हे ऐकल्यानंतर लंडनला जाण्याच्या प्रवासात त्यांच्या जीवाची झालेली घालमेल त्यांना आठवली.
 
'बाबा...'
"सुरुवातीला अतुल बेशुद्ध झाला होता. डॉक्टरांच्या फेऱ्या संपल्यानंतर मी सकाळी सेंट थॉमस हॉस्पिटलच्या अतिदक्षता (आयसीयू) विभागामध्ये फोन करायचो आणि एका सकाळी त्यांनी 'जरा थांबा' असे म्हटले.
 
"मग अतुल आला आणि मी त्याच्या तोडून 'बाबा' असं ऐकलं. मी आजपर्यंत ऐकलेल्या 'बाबा' अशा हाकांपैकी ती सर्वात गोड हाक होती आणि मला क्षणाचाही विलंब न लावता त्याच्यापाशी जायचे होते."
 
पॅरामेडिकने सांगितले की ती पुनर्भेट खूप भावनिक होती.
 
"मी शेवटच्या वेळी अतुलला पाहिले होते तेव्हा तो जगेल असे मला वाटले नव्हते.
 
"त्याला पुन्हा भेटणे आणि त्याच्या आई-वडिलांना वाईट बातम्या दिल्यानंतर त्यांच्याशी बोलणे हा माझ्या 18 वर्षांच्या नोकरीतील एक अतिशय खास क्षण होता."
 
इम्पीरियल कॉलेज हेल्थकेअर एनएचएस ट्रस्टच्या हॅमरस्मिथ हॉस्पिटलचे क्रिटिकल केअर सल्लागार डॉ. लुईट ठाकुरिया म्हणाले: “20 वर्षांच्या वयोगटातील व्यक्तींना हृदयविकाराचा झटका आल्याचे पाहायला मिळत नाही आणि एखाद्या व्यक्तीला एका दिवसात सहा वेळा हृदयविकाराचा झटका आल्यानंतरही तो पुन्हा धडधाकट होतो ही तर आणखीनच दुर्मिळ गोष्ट आहे.
 
"हा एक खरा सांघिक प्रयत्न होता आणि अनेक लोकांनी अतुलला येथे पोहोचवण्यास मदत केली. त्याचा भाग होणे आणि सकारात्मक प्रभाव पाडण्यास तुम्ही केलेली मदत ही आनंदाची बाब आहे."
 
'लंडन अॅम्ब्युलन्स सर्व्हिस'च्या म्हणण्यानुसार, अतुलच्या बाबतीत जे घडले यावरून एखाद्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका आल्यावर त्वरित काय करायला हवे, याची माहिती असणे गरजेचे आहे.
 
"आजवरच्या पुराव्यांवरून असं लक्षात येतं की, ह्रदयविकाराच्या झटक्यामध्ये प्रत्येक सेकंद महत्त्वाचा असतो आणि छातीवर लवकर दाब आणि डिफिब्रिलेशनमुळे एखाद्या व्यक्तीच्या जगण्याची शक्यता दुप्पट होऊ शकते," असं म्हटलं जातं.
 
अतुलला एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन (ECMO) वापरण्याची गरज पडली नसली तरी, रूग्णाला बरं होण्यासाठी वेळ मिळण्याच्या दृष्टीने हृदय आणि फुफ्फुसांचे कार्य सुरळीतपणे चालण्यासाठी पूर्णपणे त्याची जागा घेऊ शकेल अशा एका जीवन समर्थन प्रणालीची आवश्यकता आहे. इम्पीरियल हेल्थ चॅरिटीने आधीच अशाप्रकारची एक मशीन विकत घेतली आहे आणि आणखी दोन मशीन खरेदी करण्यासाठी निधी उभारण्याचं काम सुरू आहे.
 
'लंडन अॅम्ब्युलन्स सर्व्हिस'ने म्हटलं आहे की, अलीकडील अभ्यासातून असे दिसून आले आहे की काही रूग्ण एक्स्ट्राकॉर्पोरियल मेम्ब्रेन ऑक्सिजनेशन थेरपीसाठी योग्य होते. अशा पद्धतीने वाचणाऱ्यांची संख्या 43 टक्क्यांपर्यंत वाढू शकते.
 

























Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती