टेक्‍सासला हॅरिकेन हार्वे चक्रिवादळाचा तडाखा

सोमवार, 28 ऑगस्ट 2017 (09:08 IST)
हरिकेन हार्वे या चक्रिवादळाचा टेक्‍सास राज्याला जोरदार तडाखा बसला असून यामध्ये किमान 2 जण ठार झाले आहेत. या परिसरामध्ये मुसळधार पाऊस आणि जोरदार वारे वाहत असून सार्वजनिक मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. रविवार सकाळपर्यंत टेक्‍सास प्रांतातील काही भागांमध्ये हरिकेन चक्रिवादळ घोंघावत होते. ह्युस्टन भागात मुसळधार पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली आहे.
 
चक्रिवादळाशी संबंधित दोन मृत्यूंपैकी एकाचा मृत्यू रॉकपोर्ट आणि दुसरा ह्युस्टनमध्ये झाला आहे. याशिवाय 14 जण जखमी झाले आहेत. आणखी काही जणांचा मृत्यू झाला असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. मियामी येथील “नॅशनल हरिकेन सेंटर’ने आगामी काही दिवसात आणखी मुसळधार पावसाची आणि पूरसदृश्‍य स्थिती निर्माण होण्याची शक्‍यता वर्तवली आहे. काही ठिकाणी इमारती कोसळल्या, ट्रेलर उलटले, वीजेचे खांब आणि झाडेही उन्मळून पडली आहेत. काही ठिकाणी जमीन खचण्याचीही घटण्या घडली आहे.
 
टेक्‍सास हा अमेरिकेतील तेल आणि नैसर्गिक वायूच्या उद्योगांचा प्रांत आहे. टेक्‍सास प्रांताला धडकणारे हार्वे हे 1961 पासूनचे सर्वात भीषण वादळ मानले जात आहे. या उद्योगाच्या प्रकल्पांना मात्र वादळामुळे कोणताही धोका निर्माण झालेला नाही. नागरिकांना आणखी दोन दिवस रस्त्यांवर न येण्याची सूचना महापौरांनी केली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती