हुवाई ही जगातील 500 सर्वात मोठ्या कंपन्यांपैकी एक आहे. या कंपनीने तेहरानमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीय कर्मचाऱ्यांना तत्काळ कामावरून कमी करण्याचा आदेश काढला आहे. भारत आणि चीनदरम्यान पेटलेल्या सीमावादामुळेच या कर्मचाऱ्यांना नोकरीवर पाणी सोडावे लागले, असे इंटरनॅशनल बिझिनेस टाईम्स या वृत्तपत्राने म्हटले आहे. मात्र हुवाईने या संबंधात काहीही वक्तव्य केलेले नाही.
तेहरानमध्ये हुवाई कंपनीत काम करणाऱ्या रोहित नावाच्या व्यक्तीने स्वातंत्र्यदिनी या संबंधात ट्वीट केले आहे. त्याने पंतप्रधान कार्यालय आणि परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांच्या नावे संदेश लिहिला असून त्यात या हकालपट्टीची माहिती दिली आहे. विक्रांत सिंह नावाच्या अन्य एका भारतीयानेही अशाच प्रकारे ट्वीट केले आहे. इराणमधील हुवाईसाठी काम करणाऱ्या सर्व भारतीयांना एक किंवा अर्ध्या दिवसांत जाण्यास तोंडी सांगितले आहे, अशी माहिती त्याने दिली आहे.