लष्कर-ए-तैयबा (एलईटी) चे माजी नेते अक्रम खान यांची गुरुवारी अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केली. पाकिस्तानातील बाजौरमध्ये अक्रम खान उर्फ अक्रम गाझी यांची अज्ञात हल्लेखोरांनी गोळ्या झाडून हत्या केल्याचे सांगितले जात आहे. दहशतवादी अक्रम गाझी याने 2018 ते 2020 या काळात लष्कर भरती कक्षाचे नेतृत्व केले.
या पूर्वी या दहशतवाद्यांची हत्या करण्यात आली. ऑक्टोबरमध्ये पठाणकोट हल्ल्याचा मास्टरमाईंड शाहिद लतीफची पाकिस्तानात गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती. लतीफ हा पाकिस्तानच्या गुजरांवाला शहरातील भारतातील मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्यांपैकी एक होता आणि 2016 मध्ये पठाणकोट एअरफोर्स स्टेशनमध्ये घुसलेल्या चार दहशतवाद्यांचा तो हस्तक होता.
सप्टेंबरच्या सुरुवातीला, अज्ञात बंदुकधारींनी पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोट येथील अल-कुदुस मशिदीमध्ये लष्कर-ए-तैयबाच्या प्रमुख दहशतवादी कमांडरची गोळ्या झाडून हत्या केली होती. रियाझ अहमद उर्फ अबू कासिम असे या दहशतवाद्याचे नाव आहे. रियाझ अहमद कोटली येथून नमाज अदा करण्यासाठी आला असता त्याच्या डोक्यात जवळून गोळी झाडण्यात आली.