आधी परराष्ट्र मंत्री गायब, आता संरक्षण मंत्री गायब, चीनमध्ये चाललंय काय?
रविवार, 17 सप्टेंबर 2023 (10:12 IST)
चीनचे संरक्षण मंत्री ली शांगफू दोन आठवड्यांपासून सार्वजनिक ठिकाणी दिसले नाहीत.
चीनचे संरक्षण मंत्री सार्वजनिक ठिकाणी दिसत नसल्याबद्दल अमेरिकेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनं प्रश्नही उपस्थित केला आहे.
भ्रष्टाचाराच्या कोणत्यातरी प्रकरणात त्यांना बाजूला केल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याबाबत चीनकडून सध्या कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
जपानमधील अमेरिकेचे राजदूत रहम इमॅन्युएल यांनी ली शांगफू यांच्या अनुपस्थितीबद्दल काही अंदाजही वर्तवलेत.
इमॅन्युएल यांनी ट्वीट करत म्हटलंय की, "चीन सरकारच्या काळात बेरोजगारीचा दर वाढत आहे."
संरक्षण मंत्री ली यांच्या आधीही अनेक वरिष्ठ चिनी लष्करी अधिकाऱ्यांना नोकरीवरून काढून टाकण्यात आलं आहे.
चिनी आणि अमेरिकन सूत्रांचा हवाला देत अमेरिकन वृत्तपत्र 'वॉल स्ट्रीट जर्नल'नं शुक्रवारी (15 सप्टेंबर) एका वृत्तात लिहिलं की, ली यांना त्यांच्या पदावरून हटवण्यात आलं आहे.
काही महिन्यांपूर्वी चीनचे परराष्ट्र मंत्री चिंग गँग हेही अचानक गायब झाले होते. नंतर जुलै महिन्यात त्यांच्या जागी आणखी एका व्यक्तीची परराष्ट्र मंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.
चिंग गँगबाबत चीन सरकारनं कधीही कोणतीही टिप्पणी किंवा विधान प्रसिद्ध केलं नव्हतं.
गेल्या आठवड्यात चीनच्या परराष्ट्रमंत्र्यांच्या प्रवक्त्याला जनरल ली यांच्याबद्दल प्रश्न विचारण्यात आला होता. प्रवक्त्यानं सांगितलं होतं की, "या परिस्थितीबद्दल कोणतीही माहिती नाही."
जनरल ली यांना अखेरचं 29 ऑगस्ट 2023 रोजी पाहिलं गेलं होतं. त्या दिवशी ते बीजिंगमध्ये आफ्रिकन देशांसोबत आयोजित सिक्युरीटी फोरमला उपस्थित होते.
मात्र, चीनच्या संरक्षण मंत्र्यांनी सार्वजनिक ठिकाणी न येणं ही सर्वसाधारण घटना नाही. त्यामुळे या घटनेची सर्वत्र चर्चा सुरू झालीय.
जनरल ली यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात एरोस्पेस अभियंता म्हणून केली. त्यानंतर त्यांनी चीनच्या लष्कर आणि सुरक्षेशी संबंधित अनेक उच्च पदांवर काम केलं आहे.
माजी परराष्ट्रमंत्री चिंग यांच्याप्रमाणेच जनरल ली यांनाही राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांचे आवडते मानले जातात.
जनरल ली शांगफू हे गेल्या काही दिवसांत गायब झालेले दुसरे मोठे नेते आहेत.
ऑगस्ट महिन्यातच चिनी लष्करात भ्रष्टाचाराची चर्चा सुरू झाली होती. त्यानंतर चीननं आपल्या लष्कराच्या क्षेपणास्त्र दलातील दोन वरिष्ठ जनरल्सची बदली केली होती.
लष्करी न्यायालयाचे अध्यक्षही त्यांची नियुक्ती झाल्यानंतर काही महिन्यांतच बदलण्यात आले.
अमेरिकेचे जपानमधील राजदूत काय म्हणाले?
गेल्या आठवड्यात आणि शुक्रवारी( 15 सप्टेंबर), राजदूत इमॅन्युएल यांनी जनरल ली आणि इतर वरिष्ठ लष्करी अधिकाऱ्यांच्या अनुपस्थितीबद्दल ट्विट केलं.
जनरल ली यांनी व्हिएतनामलाही भेट दिली नसल्याचं त्यांनी सांगितलं. जनरलला घरातचं नजरकैदेत ठेवण्यात आलं असावं असा त्यांचा अंदाज आहे.
अमेरिकन राजदूत त्यांच्या खास शैलीतील ट्विटसाठी ओळखले जातात. ट्विट करून त्यांनी जनरल लीच्या अनुपस्थितीची तुलना अगाथा क्रिस्टीच्या 'मिस्ट्री अँड देन देअर वेर नन' आणि शेक्सपियरच्या हॅम्लेट नाटकातील 'समथिंग इज रॉटन इन द स्टेट ऑफ डेन्मार्क' या संवादाशी केली आहे.
वृत्तसंस्था रॉयटर्सनं दिलेल्या माहितीनुसार, व्हिएतनामी अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की, जनरल ली यांनी गेल्या आठवड्यात शेवटच्या क्षणी त्यांच्यासोबत झालेल्या बैठकीतून माघार घेतली होती. जनरल ली यांची प्रकृती ठीक नसल्याचं त्यांना सांगण्यात आलं.
चिनी अधिकार्याची अधिकृत बैठक चुकणं फार दुर्मिळ आहे. या अधिकाऱ्यांची नियमित वैद्यकीय तपासणी केली जाते.
जनरल ली आणि वाद
जनरल ली यांचा वादांशी जुना संबंध आहे. 2018 मध्ये ते चिनी लष्कराच्या लष्करी उपकरणांच्या विकासाचे प्रमुख होते. त्यानंतर अमेरिकेनं त्यांच्यावर रशियन लढाऊ विमानं आणि शस्त्रं खरेदी केल्याचा आरोप करत त्यांच्यावर निर्बंध लादले होते.
या निर्बंधांनंतर जनरल ली यांनी यावर्षी सिंगापूरमध्ये अमेरिकेचे संरक्षण मंत्री लॉयड ऑस्टिन यांना भेटण्यास नकार दिला.
चीनचे संरक्षणमंत्री बेपत्ता होण्यावरून चीन सरकारचा अपारदर्शी कारभार दिसून येतो, असं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. हे राष्ट्राध्यक्ष शी जिनपिंग यांच्या काही निर्णयांच्या कमकुवतपणाकडेही निर्देश करते.
आशिया सोसायटी पॉलिसी इन्स्टिट्यूटमधील चीन प्रकरणातील तज्ज्ञ नील थॉमस म्हणतात, “मोठ्या व्यक्तींच्या गायब होण्याच्या आणि भ्रष्टाचारात त्यांचा सहभाग असल्याच्या बातम्यांमुळं राष्ट्राध्यक्ष शी यांच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण होतं कारण त्यांच्या संमतीनंच या लोकांना उच्च पदांवर नियुक्त करण्यात आलं होतं.
परंतु नील थॉमस असंही म्हणतात की, राष्ट्राध्यक्ष शी यांच्या नेतृत्वाला आणि चीनच्या राजकीय स्थिरतेला कोणताही धोका नाही. कारण गायब झालेल्या लोकांपैकी कोणीही त्यांच्या अंतर्गत वर्तुळाचा भाग नव्हता.
विश्लेषक बिल बिशप म्हणतात की, चिनी सैन्यात भ्रष्टाचाराचा मोठा इतिहास आहे. राष्ट्राध्यक्ष शी हे देशाच्या सशस्त्र दलांचे सर्वोच्च नेते देखील आहेत. या समस्येला सामोरं जाण्याची जी पद्धत त्यांच्या आधीच्या नेत्यांनी स्वीकारली होती तीच पद्धत त्यांनी अवलंबली आहे.
बिशप यांनी नुकतंच लिहिलं आहे की, “शी जिनपिंग एका दशकाहून अधिक काळ सत्तेत राहिल्यानंतर, चिनी सैन्याच्या शीर्षस्थानी भ्रष्टाचाराच्या बातम्या येत आहेत. आणि यासाठी ते त्यांच्या आधीच्या नेत्यांना दोष देऊ शकत नाहीत.”
ते म्हणतात की, जनरल ली आणि त्यांच्या आधी परराष्ट्र मंत्री चिंग यांना राष्ट्राध्यक्ष शी यांनी बढती दिली होती. भविष्यात अशाच प्रकारच्या आणखी घटना घडू शकतात, असा त्यांचा अंदाज आहे.
कार्नेगी चायनामधील विश्लेषक इयान चोंग म्हणतात की, चीन आणि तैवानमधील संबंध तणावपूर्ण असताना उच्च अधिकाऱ्यांच्या गायब होण्याच्या घटना घडत आहेत.
चिनी युद्धनौका तैवानच्या आखातात तैनात आहेत आणि चीन लवकरच आणखी एक नौदल सराव करू शकतं.
संरक्षण आणि परराष्ट्र खातं हे कोणत्याही देशासाठी महत्त्वाचा विभाग आहेत. विश्लेषक चोंग म्हणतात की, अशा गंभीर वेळी या दोन विभागांमधील समस्या चिंतेचं कारण बनू शकतं.
दुसरीकडे, जपानमधील अमेरिकेचे राजदूत इमॅन्युएल यांचं ट्विट उच्च पदावर असलेल्या कोणत्याही अमेरिकन मुत्सद्दी अधिकाऱ्याच्या तुलनेत सामान्य म्हणता येणार नाही. विशेषतः जर ते अमेरिकेचा विश्वासू मित्र असलेल्या जपानमध्ये राजदूत आहेत , तर ते महत्त्वाचे व्यक्ती आहेत.