न्यूयॉर्क शहरातील महापौरपदाच्या डेमोक्रॅट्सच्या प्राथमिक निवडणुकीत आघाडी घेतलेले जोहरान ममदानी शहराचे पहिले मुस्लिम महापौर होण्याच्या दिशेने वाटचाल करत आहेत. दरम्यान, राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी जोहरान ममदानीला अटक करण्याची धमकी दिली आहे.
ट्रम्प यांनी एका गोलमेज बैठकीत धमकी दिली होती की जर ममदानी यांनी अमेरिकेतील सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरात इमिग्रेशन अँड कस्टम्स एन्फोर्समेंट (ICE) ला काम करण्यापासून रोखले तर त्यांचे सरकार ममदानीला अटक करेल. एवढेच नाही तर राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मंगळवारी ममदानीवर हल्ला चढवला आणि त्यांना "कम्युनिस्ट" आणि "वेडा" म्हटले. ट्रम्पचा दावा आहे की ममदानीचे नागरिकत्व बेकायदेशीर आहे
राष्ट्रपतींनी ममदानीच्या नागरिकत्वावरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि असा दावा केला की "बरेच लोक म्हणत आहेत की तो येथे बेकायदेशीरपणे आहे." "जर तो निवडून आला तर आपल्याला त्याला अटक करावी लागेल. आपल्या देशात आपल्याला कम्युनिस्ट नको आहे, परंतु जर तो निवडून आला तर मी देशाच्या वतीने त्याच्यावर बारकाईने लक्ष ठेवणार आहे," ट्रम्प म्हणाले. न्यू यॉर्कला फ्लोरिडापेक्षा तिप्पट जास्त संघीय निधी मिळतो असा दावाही ट्रम्प यांनी केला
मंगळवारी ट्रम्पच्या धमकीनंतर, जोहरान ममदानी यांनी एक निवेदन प्रसिद्ध केले ज्यामध्ये म्हटले आहे की, "अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी मला अटक करण्याची, माझे नागरिकत्व रद्द करण्याची, मला डिटेंशन सेंटरमध्ये ठेवण्याची आणि मला हद्दपार करण्याची धमकी दिली आहे. मी कोणताही कायदा मोडला आहे म्हणून नाही, तर मी ICE ला माझ्या शहरात दहशत निर्माण करण्यापासून रोखेन म्हणून." ते पुढे म्हणाले, "हा केवळ लोकशाहीवर हल्ला नाही तर आवाज उठवण्यास घाबरत नसलेल्या प्रत्येक न्यू यॉर्करला धमकावण्याचा प्रयत्न आहे."