रशियातील मॉस्को येथे शुक्रवारी संध्याकाळी एका कॉन्सर्ट हॉलवर झालेल्या हल्ल्यातील मृतांची संख्या 143 वर पोहोचली आहे. सुमारे 150 लोक जखमी झाले आहेत. निरपराध लोकांना लक्ष्य करत दहशतवाद्यांनी हॉल मध्ये बॉम्ब फोडला आणि गोळीबार केला. या घटनेनंतर रशियन सुरक्षा एजन्सी आणि पोलिसांनी संयुक्तपणे मॉस्कोमध्ये हाय अलर्ट जारी करून मोहीम सुरू केली. या घटनेत आतापर्यंत 11 संशयितांना अटक करण्यात आली आहे. यातील चार बंदूकधारी आहेत ज्यांचा थेट हल्ल्यात सहभाग होता. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, एका कारचा पाठलाग केल्यानंतर या लोकांना पोलिसांनी पकडले.
रशियन सुरक्षा एजन्सीनुसार, हल्लेखोरांचे युक्रेनमध्ये संपर्क होते आणि ते सीमेच्या दिशेने पळून जात होते. मात्र, रशिया-युक्रेन सीमेवर पोहोचण्यापूर्वीच त्याला ब्रायन्स्क प्रांतात पकडण्यात आले. रशियन एजन्सी फेडरल सिक्युरिटी सर्व्हिस (एफएसबी) ने सांगितले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्याचवेळी रशियाच्या या आरोपांवर युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांच्या सल्लागाराने या घटनेशी आपला काहीही संबंध नसल्याचे सांगितले.
या घटनेबाबत रशियन सुरक्षा परिषदेचे सचिव निकोलाई पात्रुशेव म्हणाले की, रशियावर आयएस-खोरासानचा हा हल्ला देशासाठी एक नवीन गंभीर धोका दर्शवतो. हा हल्ला कोणीही केला असेल त्याला सोडले जाणार नाही, असे ते म्हणाले. वृत्तानुसार, सुरक्षा दलाच्या गणवेशातील किमान तीन बंदूकधारी कॉन्सर्ट हॉलमध्ये घुसले आणि त्यांनी आतल्या लोकांवर गोळीबार सुरू केला त्यामुळे अनेकांचा मृत्यू झाला असून अनेक जण जखमी झाले आहेत. रशियन न्यूज एजन्सी टासने दिलेल्या वृत्तानुसार, हल्ल्यानंतर इमारतीचा स्फोट झाला आणि आग लागली.
मॉस्कोमधील हल्ल्याला प्रत्युत्तर देताना व्हाईट हाऊसचे राष्ट्रीय सुरक्षा अधिकारी जॉन किर्बी म्हणाले की, सध्या या गोळीबारात युक्रेन किंवा युक्रेनचा सहभाग असल्याचे कोणतेही संकेत नाहीत. आम्ही हल्ल्याचे निरीक्षण करत आहोत, परंतु मी यावेळी युक्रेनशी कोणत्याही संबंधाबद्दल कोणतीही माहिती देऊ शकत नाही.