Climate Change : जगातली 5 अशी शहरं, जी सध्या पाण्याखाली बुडालेली आहेत
सोमवार, 7 फेब्रुवारी 2022 (16:46 IST)
संपूर्ण जगामध्ये हवामान बदल होत आहे. त्याचा परिणाम म्हणजे कुठं अवकाळी पाऊस तर कुठं बर्फवृष्टी होत असते. काही ठिकाणी अत्यंत भीषण उकाड्याची परिस्थितीही निर्माण होते.
काही रिपोर्ट्समध्ये तर 2050 पर्यंत भारतातली मुंबई आणि कोलकातासारखी शहरं जलमय होतील, असा दावाही करण्यात आला आहे.
मात्र, सध्यादेखील जगात अशी अनेक शहरं आहेत, जिथं एकेकाळी लोकवस्ती होती मात्र सध्या ती पाण्यात बुडालेली आहे. त्यांचे अवशेष पाहण्यासाठी पर्यटक स्कुबा डायव्हींगची मदत घेत असतात.
बाया, इटली
एकेकाळी रोममधील नागरिकांच्या पार्टीचा अड्डा असलेलं इटलीतलं बाया शहर त्याठिकाणच्या निसर्गरम्य वातावरण, गरम पाण्याचे झरे, तलाव आणि असामान्य इमारतींसाठी ओळखलं जात होतं. रोमन सम्राट ज्युलियस सीझर आणि नीरो दोघांचेही याठिकाणी सुटी घालवण्यासाठीचे बंगले (विला) असायचे. तसंच ईसवीसन 138 मध्ये सम्राट हद्रियन यांचं निधनही याच शहरात झालं होतं.
दुर्दैवानं ज्या ज्वालामुखी हालचालींमुळं गरम पाण्याचे प्रसिद्ध झरे तयार झाले, त्यामुळंच हे शहर जलमय बनलं होतं.
हे शहर नेपल्सच्या जवळ असलेल्या एका सुपर व्हॉल्केनो म्हणजे एक महाकाय ज्वालामुखी, कॅम्पी फ्लेग्रेई (फेलग्रेयन फील्ड्स) च्यावर वर वसलेलं होतं.
काळाबरोबर ब्रॅडिसिझम (एक भौगोलिक घटना) झालं. त्यामुळं बायामधली जमीन हळू हळू चार ते सहा मीटर खाली सरकली आणि शहराचा बहुतांश भाग हा पाण्याखाली गेला.
2002 नंतर बायामधील पाण्याखाली गेलेल्या परिसराला स्थानिक प्रशासनान संवर्धित क्षेत्र घोषित केलं.
त्याचा अर्थ म्हणजे, आता केवळ परवाना असलेले स्कुबा डायव्हर्स हे एका स्थानिक गाईडबरोबर पाण्याच्या आत असलेल्या अवशेषांचा शोध घेऊ शकतात.
थोनिस हेराक्लिओन, इजिप्त
प्राचीन कथांमध्ये अनेकदा उल्लेख करण्यात आला आहे की, थोनिस हेराक्लिओन ही अशी जागा होती ज्याठिकाणी ग्रीक नायक हेराक्लीज (हर्क्युलिस) नं इजिप्तमध्ये पहिलं पाऊल ठेवलं होतं.
असंही म्हटलं जातं की, इतिहासातील सर्वात प्रसिद्ध संघर्षांपैकी एक असलेल्या ट्रोजन युद्धात सहभागी होण्यापूर्वी त्याठिकाणचे राजे पेरिस हेदेखील प्रेमिका हेलेनबरोबर या शहरात आले होते.
या शहराचं 'थोनिस' नाव हा मूळ इजिप्तमधील शब्द आहे. तर ग्रीक नायक हर्क्युलिसच्या सन्मानात याला हेराक्लिओनही म्हटलं जातं.
नाइल नदीच्या पश्मिम तोंडाला असलेल्या एका समृद्ध बंदर असायचं. 60 जहाजं आणि 700 पेक्षा जास्त जहाजं थांबण्यासाठीची थांबलेली नांगरं ही याचा पुरावा आहे की, भूमध्यसागराच्या पलिकडून या शहरामधून येणारा माल हा कालव्याच्या माध्यमातून नेला जात होता.
पाण्याच्या आत बुडालेल्या या शहरातून आतापर्यंत मिळालेल्या कलाकृतींपैकी एक कलाकृती म्हणजे सर्वात आकर्षक डिक्री ऑफ सास आहे. या दोन मीटर उंच काळ्या दगडापासून तयार केलेल्या फळीला स्टेले म्हणूनही ओळखलं जातं.
हे ईसवीसनपूर्व चौथ्या शतकाच्या सुरुवातीला चित्रलिपीच्या माध्यमातून कोरलं आहे. त्यातून त्या काळच्या इजिप्तमधील करप्रणालीचे महत्त्वाचे तपशील दर्शवले जातात.
याबरोबरच थोनिस-हेराक्लिओन एक शहर होतं, यालाही दुजोरा मिळतो.
डर्वेंट, इंग्लंड
डर्बीशायरच्या डर्वेंट गावाला लेडीबोवर जलाशय तयार करण्यासाठी जाणून-बुजून जलमग्न केलं होतं.
विसाव्या शतकाच्या मध्यात डर्बी, लिसेस्टर, नॉटिंघम आणि शेफिल्ड सारख्या शहरांचा विस्तार होत राहिला आणि याठिकाणच्या वाढत्या लोकसंख्येला पाण्याचा अधिक पुरवठा करण्याची गरज होती.
हा पुरवठा करण्यासाठी एक बांध आणि जलाशय तयार करण्याची आवश्यकता होती.
मूलत: हाऊडन आणि डर्वेंट नावाचे दोन जलाशय तयार करण्याची योजना होती आणि त्यावेळी हे गाव या योजनेबाहेर होतं.
मात्र, काही काळात हे स्पष्ट झालं की, दोन जलायशप पुरेसे ठरणार नाहीत त्यामुळं तिसऱ्याची आवश्यकता होती.
1935 मध्ये याचं काम सुरू झालं आणि 1945 येईपर्यंत डर्वेंट गाव पूर्णपणे पाण्यात बुडालं होतं.
भीषण गर्मीच्या काळात लेडिबोवर जलाशयाचा जलस्तर एवढा खाली जातो की, डर्वेंट गावाचे अवशेष दिसायला लागतात. तर लोक याठिकाणी असलेल्या ढिगाऱ्यावर पुन्हा फिरू शकतात.
व्हिला अॅपेक्यूएन, अर्जेंटिना
व्हिला अॅपेक्यूएनमधील तलावाच्या किनाऱ्यावर असलेलं रिसॉर्ट जवळपास 25 वर्षांपर्यंत पाण्याखाली राहिल्यानंतर 2009 मध्ये पुन्हा एकदा समोर आलं होतं.
ज्या लोकांना या मीठाच्या पाण्यात अंघोळ करायची इच्छा असायची, ते 1920 मध्ये तयार करण्यात आलेल्या लेक अॅपेक्यूएन नावाच्या या रिसॉर्टकडे आकर्षित झाले होते.
हे रिसॉर्ट ज्या सॉल्ट लेकच्या किनाऱ्यावर होतं, त्याठिकाणच्या पाण्यात अनेक आजारांवर उपचार होतील असे गुण असल्याचं सांगितलं जातं.
या तलावात आपोआप पाणी यायचं आणि आपोआप कमीही व्हायचं. पण 1980 नंतरपासून अनेक वर्षांपर्यंत जोरदार पाऊस झाला आणि पाण्याची पातळी वाढू लागली.
अतिरिक्त सुरक्षेसाठी एक धनुष्याकार भिंत तयार करण्यात आली होती.
नोव्हेंबर 1985 मध्ये एका वादळानंतर तलाव भरला आणि पाणी बाहेर येऊ लागलं त्यामुळं भिंत तुटली आणि शहर 10 मीटर खाऱ्या पाण्याखाली गेलं होतं.
पण, 2009 नंतर याठिकाणची पाणी पातळी घटत आहे आणि पुन्हा एकदा व्हिला अॅपेक्यूएन स्पष्टपणे दिसू लागलं आहे.
पोर्ट रॉयल, जमैका
सध्याच्या काळात पोर्ट रॉयल हे असं गाव आहे, ज्याठिकाणी एखाद्याला झोपेतही मासे पकडता आले असते. पण 17व्या शतकात याठिकाणी असलेल्या सागरी दरोडेखोरांच्या प्रचंड लोकसंख्येसाठी याला ओळखलं जातं.
नव्या जगातील व्यापाराचं मुख्य केंद्र पोर्ट रॉयलचा वेगानं विस्तार झाला.
1662 मध्ये याठिकाणी 740 रहिवासी राहत होते. पण 1692 येईपर्यंत ही संख्या वाढून 6500 ते 10,000 दरम्यान झाली असल्याचा अंदाज आहे.
याठिकाणी लोक विटा किंवा लाकडांच्या घरात राहत होते. ती घरं चार मजल्यांपर्यंत उंच असायची.
7 जून, 1692 या दिवशी जेव्हा दुपारच्या वेळी पोर्ट रॉयल भयंकर भूकंपानं हादरलं त्यानंतर काही वेळातच त्सुनामी आली.
एका अंदाजानुसार यामुळं शहराचा सुमारे दोन तृतीयांश भाग पाण्याखाली गेला. असं समजलं जातं की, त्यादिवशी सुमारे 2 हजार लोकांचा मृत्यू झाला होता आणि अनेकजण जखमी झाले होते.
याठिकाणी असलेले अवशेष आणि शेकडो बुडालेली जहाजं पाहण्यासाठी स्कुबा डायव्हींग करणं शक्य आहे. पण त्यासाठी स्थानिक अधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागते.