भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी युद्धबंदीची घोषणा केली. यानंतर चीन पाकिस्तानच्या समर्थनार्थ पुढे आला आहे. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी शनिवारी पाकिस्तानचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री इशाक दार यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली. चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी म्हणाले की, त्यांचा देश पाकिस्तानचे सार्वभौमत्व, प्रादेशिक अखंडता आणि राष्ट्रीय स्वातंत्र्य राखण्यासाठी त्याच्या पाठीशी उभा राहील.
पाकिस्तानच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, चर्चेदरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्र मंत्री इशाक दार यांनी चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांना उदयोन्मुख प्रादेशिक परिस्थितीची माहिती दिली. आव्हानात्मक परिस्थितीत पाकिस्तानच्या संयम आणि जबाबदार वृत्तीचे वांग यी यांनी कौतुक केले. परराष्ट्र कार्यालयाने म्हटले आहे की, पाकिस्तानचा धोरणात्मक सहकारी भागीदार आणि कट्टर मित्र म्हणून चीन पाकिस्तानच्या सार्वभौमत्वाचे, प्रादेशिक अखंडतेचे आणि राष्ट्रीय स्वातंत्र्याचे रक्षण करण्यासाठी खंबीरपणे उभा राहील, याची त्यांनी पुष्टी केली.
याशिवाय, इशाक दार यांनी यूएईचे उपपंतप्रधान आणि परराष्ट्र मंत्री शेख अब्दुल्ला बिन झायेद यांच्याशीही चर्चा केली. त्यांनी पाकिस्तान आणि भारत यांच्यातील युद्धबंदी कराराचे स्वागत केले. यासोबतच, डार यांनी तुर्कीचे परराष्ट्र मंत्री हकान फिदान यांच्याशीही चर्चा केली आणि त्यांना या प्रदेशातील सध्याच्या परिस्थितीची माहिती दिली.