Covid Treatment Molnupiravir: कोव्हिड-19 वरील पहिल्या गोळीला मान्यता

गुरूवार, 4 नोव्हेंबर 2021 (22:00 IST)
कोव्हिडवरील पहिल्या औषधाला युकेमध्ये मान्यता देण्यात आली आहे. कोरोनाची साथ संपण्याच्या दृष्टीने हे मोठे पाऊल आहे असं म्हटले जात आहे.
 
कोव्हिडची लक्षणांवरील उपचारासाठी देण्यात येणारी पहिले औषध म्हणून एका गोळीला युकेमध्ये मान्यता मिळाली आहे.
 
मोलनूपिराविर असं या गोळीचं नाव आहे. कोव्हिडचे निदान झाल्यावर दिवसातून दोन वेळा ही गोळी देण्यात यावी असे सूचवण्यात आले आहे.
या औषधाच्या चाचणीमध्ये असं लक्षात आलं आहे की ही गोळी हॉस्पिटलायजेशन किंवा मृत्यूचा धोका पन्नास टक्क्यांनी कमी करते. हे औषध सुरुवातीला फ्लूवरील उपचारासाठी निर्माण करण्यात आलं होतं.
 
हे औषध गेमचेंजर ठरू शकते असं आरोग्य सचिव साजिद जाविद यांनी म्हटलं आहे. ज्या रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती खालावली आहे तसेच जे अत्यंत अशक्त आहे त्यांच्यासाठी ही गोळी वरदान ठरू शकते असा विश्वास आरोग्य सचिवांनी व्यक्त केला आहे.
 
हा आपल्या देशासाठी ऐतिहासिक दिवस आहे. कोव्हिडवरील उपचारासाठी मौखिक औषधाला मान्यता देणारा युनायटेड किंगडम हा पहिला देश ठरल्याचं त्यांनी आपल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे.
 
पहिली तोंडावाटे घ्यायची गोळी
मोलनूपिराविर या गोळीची निर्मिती यूकेतल्या मेरेक, शार्प आणि डोहमे तसंच रिजबॅक बायोफार्मास्युटिकल्स या औषध कंपन्यांनी केलेली आहे.
 
कोव्हिडवर उपचार म्हणून निर्माण करण्यात आलेली ही पहिली अँटी-व्हायरल गोळी आहे जी इंजेक्शनच्या स्वरुपात न देता तोंडावाटे घेता येते.
यूकेने या गोळीचे 4 लाख 80 हजार डोस खरेदी करण्यासाठी मान्यता दिली आहे. नोव्हेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात या गोळ्यांचा पहिला साठा मिळेल.
 
सुरुवातीला लस घेतलेल्या आणि न घेतलेल्या दोन्ही प्रकारच्या ब्रिटीश नागरिकांना ही गोळी देण्यात येईल. यासाठी एक अभ्यास कार्यक्रम राबवण्यात येईल म्हणजे या गोळीचे परिणाम अधिक चांगल्या पद्धतीने अभ्यासता येतील. यावरून ठरेल की आणखी गोळ्या ऑर्डर करायच्या की नाही.
 
कोव्हिडची लक्षणं दिसायला लागल्यापासून पाच दिवसांच्या आत ही गोळी द्यावी लागेल म्हणजे ती सर्वाधिक परिणामकारक ठरेल.
 
ब्रिटनची सार्वजनिक आरोग्य व्यवस्था असलेल्या NHS व्दारे ही गोळी अल्पावधीत जास्तीत जास्त लोकांपर्यंत कशी पोहचवली जाईल हे अजून स्पष्ट नाही.
 
काही दवाखान्यांना ही गोळी पुरवली जाईल तर जेष्ठ नागरिक किंवा प्रकृती नाजूक असलेले पेशंट्स कोव्हिड पॉझिटव्ह असले तर त्यांच्या डॉक्टरने प्रिस्क्राईब केल्यानंतर त्यांना ही गोळी मिळू शकेल.
 
ही गोळी कशी काम करते?
ही गोळी त्या एन्झाईम्सला लक्ष्य बनवते जे व्हायरस आपलं पुरुत्पादन करण्यासाठी वापरतो. या गोळीमुळे त्या व्हायरसच्याच जेनेटिक कोडमध्ये गडबड होते आणि त्याला स्वतःच्या प्रतिकृती बनवता येत नाहीत. त्यामुळे शरीरातली व्हायरसची संख्या मर्यादित राहाते आणि रोगाची तीव्रता कमी होते.
 
मेरेकचं म्हणणं आहे की गोळी जशी काम करते त्यावरून ती कोरोना व्हायरसच्या इतर व्हेरिएंटवरही तितकीच परिमाणकारक ठरेल असं वाटतंय.
यूकेतली नियंत्रण संस्था MHRA ने म्हटलंय की ज्या लोकांमध्ये कोव्हिडची सौम्य ते मध्यम लक्षणं आहेत, आणि वय, लठ्ठपणा, डायबेटिस, हृदयविकार असे आजाराची तीव्रता वाढवू शकणारे रिस्क फॅक्टर आहेत त्या लोकांवर या गोळीने उपचार करण्यासाठी मान्यता दिली आहे.
 
या संस्थेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी जून राईन यांनी या गोळीचं वर्णन करताना म्हटलं की, "कोव्हिडविरोधातल्या लढ्यात आपल्याला आणखी एक शस्त्र मिळालेलं आहे."
 
"ही कोव्हिडवरची जगातली पहिली तोंडावाटे घ्यायची गोळी आहे. या गोळीची निर्मिती होणं महत्त्वाचं आहे कारण याचा अर्थ ती गोळी दवाखान्याबाहेर, कोव्हिड गंभीर स्टेजला पोहचण्याआधीच देता येऊ शकते," असंही त्या म्हणाल्या.
 
इंग्लंडचे उपमुख्य वैद्यकीय अधिकारी प्रा. जॉनथन वॅन-टॅम यांनी 3 नोव्हेंबरला इशारा दिला होता काही येते 'काही महिने कठीण असणार आहेत.'
 
ते म्हणाले की 'जरी कोव्हिड रूग्णांची संख्या सध्या स्थिरावली असली तरी मृत्यू वाढत आहेत आणि असं दिसतंय की वयस्कर नागरिकांमध्ये संसर्ग पसरतोय.'
 
यूकेत 3 नोव्हेंबरला 41, 229 केसेस नोंदवल्या गेल्या तर 217 मृत्यू झाले.
 
वैद्यकीय चाचण्या
मोलनूपिराविर या गोळीच्या प्राथमिक चाचण्या 775 लोकांवर झाल्या आहेत. त्याचे निष्कर्ष खालीलप्रमाणे -
 
हे औषध दिलेल्यांपैकी 7.3 टक्के लोकांना दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं.
 
त्याच्या तुलनेत प्लासिबो किंवा डमी गोळी दिलेल्या लोकांपैकी 14.1 टक्के लोकांना दवाखान्यात अॅडमिट करावं लागलं.
मोलनूपिराविर दिलेल्या गटात कोणाचाही मृत्यू झाला नाही. पण प्लासिबो दिलेल्यांपैकी 8 पेशंट्सचा जीव कोव्हिडमुळे गेला.
 
हे निष्कर्ष एका परिपत्रकात प्रसिद्ध केले आहेत आणि अजून तज्ज्ञांनी त्यावर आपलं मत मांडलेलं नाही.
 
या गोळीला मान्यता देताना MHRA ने 'हे औषध शक्य तितक्या लवकर वापरात आणावं' अशी शिफारस केली. ज्या व्यक्तीची कोव्हिडची टेस्ट पॉझिटिव्ह आली असेल त्या व्यक्तीला लक्षणं दिसायला लागल्यापासून 5 दिवसांच्या आत ही गोळी द्यावी.
 
किंग्स कॉलेजच्या प्रा. पेनी वॉर्ड या चाचण्यांमध्ये सहभागी नव्हत्या. त्या म्हणतात, "जर वैद्यकीय चाचणीत जे निष्कर्ष समोर आले आहेत, तसंच जर यूकेच्या सर्वसाधारण लोकांमध्ये दिसले तर हॉस्पिटलमध्ये अॅडमिट करावं लागणाऱ्या लोकांची संख्या निम्म्यावर येईल. मृत्यूंमध्येही लक्षणीय घट होईल.
"पण असं दिसतंय की या गोळ्या जे हाय रिस्क गटात मोडतात अशा पेशंटसाठी राखून ठेवल्या जातील," वार्ड म्हणतात.
 
यूके सरकारने या गोळ्यांच्या पहिल्या कंत्राटासाठी किती पैसे मोजावे लागले ते जाहीर केलेलं नाही. पण अमेरिकेच्या अधिकाऱ्यांनी या गोळीचे 17 लाख डोस मागवले आहेत, ज्याला त्यांनी 1.2 अब्ज डॉलर्स मोजले आहेत. म्हणजे एका गोळीला साधारण 700 डॉलर इतका खर्च आहे.
 
ऑस्ट्रेलिया, सिंगापूर आणि दक्षिण कोरिया यांनीही या गोळ्या खरेदी केल्या आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती