मलावीचे उपाध्यक्ष सॉलोस क्लाऊस चिलिमा आणि इतर नऊ जणांचा विमान अपघातात मृत्यू झाला आहे. मलावीच्या अध्यक्षांनी ही माहिती दिली. उपराष्ट्रपती सॉलोस क्लॉस चिलिमा आणि इतर नऊ जणांना घेऊन जाणारे विमान बेपत्ता झाल्याची बातमी समोर आली असून विमान रडारातून गायब झाले. विमान वाहतूक अधिकाऱ्यांनी विमानाशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांना शोधण्यात अपयश आले .आता विमानाचा अपघात होऊन त्यात उप राष्ट्रपती आणि इतर 9 जणांचा मृत्यू झाल्याची बातमी समोर आली आहे.
मलावीच्या अध्यक्षीय कार्यालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, उपराष्ट्रपती चिलिमा हे संरक्षण दलाच्या विमानात होते. राजधानी लिलोंगवे येथून स्थानिक वेळेनुसार सकाळी 9.17 वाजता विमानाने उड्डाण केले. यानंतर विमान अचानक रडारवरून गायब झाले. यानंतर राष्ट्रपती लाझारस चकवेरा यांनी सुरक्षा दलांना विमान शोधण्यासाठी तातडीने शोध आणि बचाव मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले.
मलावीचे अध्यक्ष चकवेरा बहामास दौऱ्यावर जाणार असल्याचे वृत्त आहे. पण, विमान बेपत्ता झाल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी आपला दौरा रद्द केला. शोध मोहिमेनंतर विमानाला भीषण अपघात झाल्याचे आढळून आले. या अपघातात उपराष्ट्रपती चिलिमा आणि विमानातील इतर नऊ जणांचाही मृत्यू झाला.