कुवेतमध्ये इमारतीला लागलेल्या आगीत 40 मृत्युमुखी, मृतांमध्ये भारतीयांची संख्या अधिक

बुधवार, 12 जून 2024 (18:18 IST)
कुवेतच्या मंगाफ शहरातील एका रहिवासी इमारतीला लागलेल्या आगीमुळे किमान 40 लोकांचे प्राण गेल्याची माहिती मिळत आहे.
 
कुवेतच्या गृहमंत्र्यांनी ही माहिती दिली आहे. ही आग एका बहुमजली इमारतीला बुधवारी सकाळी लागली होती. त्यानंतर इमारतीच्या खिडक्यांमधून धुराचे लोट दिसू लागले.या इमारतीत बहुतांश लोक हे स्थलांतरित मजूर आहेत. या घटनेत 50 लोक जखमी झाल्याचं सांगण्यात येत आहे.
 
परराष्ट्र सचिव रणधीर जैस्वाल यांनी बीबीसीला सांगितलं, आतापर्यंत चाळीस जणांचे प्राण गेले असून त्यात बहुतांश भारतीय आहेत.
 
घटनेच्यावेळेस इमारतीत 160 मजूर होते. ते सर्व एकाच कंपनीत काम करतात.
 
भारतीय राजदुतांनीही या घटनास्थळाला भेट दिली. भारतीय दुतावासाने आगप्रभावित कुटुंबांच्या मदतीसाठी एक हेल्पलाईन नंबरही सुरू केला आहे. (+965-65505246)
 
भारताच्या राजदुतांनी रुग्णालयात जाऊन जखमींचीही भेट घेतली.
 
कुवेतचे गृहमंत्री फहद युसुऱ अल सबाह यांनी घटनास्थळाला भेट दिली आणि पत्रकारांशी चर्चा करताना, घरमालकांचा हावरटपणा यासाठी कारणीभूत आहे असं सांगितलं.
 
या इमारतीत क्षमतेपेक्षा जास्त लोक राहात होते असं कुवैती माध्यमांनी सांगितलं.
 
संपत्ती कायद्याचं उल्लंघन इथं झालं आहे का हे पाहिलं जाईल असं गृहमंत्र्यांनी सांगितलं आहे.
 
कुवेतमध्ये दोन-तृतियांश लोकसंख्या स्थलांतरित मजुरांचीच आहे. हा देश बाहेरुन आलेल्या मजुरांवर अवलंबून आहे. मानवाधिकार संघटनांनी कुवैतमधील स्थलांतरित लोकांच्या जीवनस्तराबद्दल अनेकदा काळजी व्यक्त केलेली आहे.
 
सौदी अरेबियाच्या उत्तरेकडे आणि इराकच्या दक्षिणेकडे असणाऱ्या या लहानशा देशाची लोकसंख्या आहे 45 लाखांच्या आसपास. यापैकी मूळ कुवेतींची लोकसंख्या फक्त तेरा ते साडेतेरा लाख आहे.
 
इजिप्त, फिलीपाईन्स, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंका आणि इतर देशांच्या तुलनेत कुवेतमध्ये भारतीयांची लोकसंख्या सर्वाधिक आहे.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती