Sade Teen Muhurat का खास आहेत साडेतीन मुहूर्त

मंगळवार, 25 ऑक्टोबर 2022 (00:01 IST)
एखादी वस्तू खरेदी करायची असो वा नवीन कार्यारंभ... मुहूर्त हा विषय निघतोच.. असे म्हणतात की कोणत्याही चांगल्या मुहूर्तात कार्यारंभ झाल्यास त्यात यश मिळतं. यासाठी मुहूर्त काढावा लागतो... तर काही दिवस असेही असतात जे संपूर्ण शुभ मानले जातात. या दिवशी कोणतेही कार्य सुरु करण्यासाठी मुहूर्त बघण्याची गरज नसते. अर्थात त्या दिवशी कोणतेही कार्य मुहूर्त न बघता करता येतात. होय, आम्ही सांगत आहोत साडेतीन मुहूर्तांबद्दल... हिंदू संस्कृतीत साडेतीन मुहुर्तास खूप महत्व आहे आणि या दिवशी लोक शुभ कार्याची सुरुवात करतात. सोने-चांदी, दागिने, घर, वाहन यांची खरेदी करतात. तसेच आपल्या महत्वाच्या कामाची सुरुवात देखील या शुभ मुहूर्तावर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण हे साडेतीन मुहूर्त पूर्णपणे शुद्ध असल्याची लोकांची धारणा असते. अशी मान्यता आहे की साडेतीन मुहूर्तापैकी कोणत्याही दिवशी कार्य प्रारंभ झाल्यास त्यात नक्कीच यश मिळतं.
 
हिंदू धर्मात मुहूर्ताला खूप महत्तव आहे. मुहूर्त म्हणजे उत्तम वेळ, शुभ वेळ ज्यात कोणतेही शुभ कार्य सुरु करता येतात. इतर वेळी कोणतेही कार्य सुरु करताना मुहूर्त पाहावा लागतो तर परंतु हिंदू धर्म शास्रात अशा काही निवडक तिथींचा समावेश केला ज्यात कोणत्याही कार्याला सुरुवात करताना मुहूर्त पाहण्याची गरज नसते. या मुहूर्ताला 'स्वयं सिद्ध मुहूर्त' असे म्हणतात. हिंदू धर्म शास्रात साडे तीन खास मुहूर्त असल्याचे सांगितले जाते.
 
गुढीपाडवा
अक्षयतृतीया
विजयादशमी
दिवाळी पाडवा
 
या दिवसात लोक नवीन वस्तूंची खरेदी, नवीन व्यवसायाचा प्रारंभ, सोने-चांदी यांची खरेदी करण्याला प्राधान्य देतात. 
 
सर्वात पहिला मुहूर्त येतो तो 
गुढीपाडवा
गुढीपाडवा हा मराठी नववर्षाचा प्रारंभी दिवस... गुढीपाडवा हा सण साडे तीन मुहूर्तापैकी एक मानला जातो. चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुढीपाडवा हा सण साजरा केला जातो. याच दिवशी मराठी नववर्षाची सुरुवात होते. यादिवशी लोक नवीन वस्तूंची खरेदी करतात. आपल्या नवीन व्यवसायाचा प्रारंभ करतात. या दिवशी गुढी उभारली जाते. तर साडे तीन मुहुर्तांपैंकी एक असल्यामुळे गुढीपाडवा या सणाला खूपच विशेष महत्व प्राप्त झालेले आहे.
 
अक्षय तृतीया
अक्षय तृतीया हा सण साडेतीन मुहुर्तापैकी एक महत्वाचा मुहूर्त असल्याचे मानले जाते. या दिवशी सुरु केलेले कार्य, किंवा खरेदी केलेल्याची कधी क्षय होत नसल्याचे म्हटले जाते. अक्षय म्हणजे ज्याचा कधीच क्षय किंवा नाश होत नाही असा दिवस. या दिवशी सुरु केलेल्या कार्याला प्रचंड यश मिळते, अशी लोकांची धारणा आहे. अक्षय तृतीया हा सण वैशाख शुक्ल तृतीया या तिथी येतो. या तिथीला क्षय नाही म्हणून यादिवशी दान- धर्म, खरेदी, नवीन कार्य आरंभ तसेच जप- तप इतर गोष्टी करण्यास प्राधान्य दिलं जातं. अक्षय तृतीयेच्या दिवशी लोक सोने खरेदी करण्यास अधिक प्राधान्य देतात.
 
विजयादशमी
दसरा हा सण देखील साडेतीन मुहूर्तापैंकी एक असल्याचे म्हटले जाते. अश्विन महिन्यातील दशमीच्या दिवशी हा सण साजरा केला जातो. दसरा साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. विजयादशमी हा पराक्रमाचा सण आहे. या सणात चातुर्वर्ण एकत्र आलेले दिसतात. या दिवशी सरस्वतीपूजन तसेच शस्त्रपूजन ही केले जाते. 
 
हा दिवस विजयाचा दिवस असल्याचे मानले जाते. म्हणून या दिवशी कोणतेही कार्य मुहूर्त न बघता करता येतात. सोने-चांदी, दागिने, घर, वाहन यांची खरेदी करतात. तसेच आपल्या महत्वाच्या कामाची सुरुवात देखील या शुभ मुहूर्तावर व्हावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. कारण हे साडेतीन मुहूर्त पूर्णपणे शुद्ध असल्याची लोकांची धारणा असते. 
 
बलिप्रतिपदा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा अर्थात दिवाळी पाडवा हा दिवस देखील साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त म्हणून मानला जातो. या बलिप्रतिपदा देखील म्हणतात. हा दिवस नवीन कार्याच्या शुभारंभासाठी महत्त्वाचा मानला जातो. सर्व व्यापारी वर्गाचे लोक या दिवशी वही खात्याचे पूजन करतात. यादिवशी सोने खरेदीला प्राधान्य दिले जाते.

Edited by: Rupali Barve

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती