वेग वेगळ्या प्रसंगासाठी होतो चौरंगाचा वापर

शुक्रवार, 18 जानेवारी 2019 (00:01 IST)
चौरंग म्हटल्यावर डोळय़ासमोर येते ते चार पायांचे चौकोनी आकाराचे ठेंगणे आसन. या चौरंगालाच चौकी असेही म्हटले जाते. पूर्वीच्या चित्रपटात किंवा साहित्यात आपण याचा उल्लेख वाचलेला आहे.
 
याचा वापर भोजनासाठी होत असे. पंगत बसली की यजमान आणि आलेला पाहुणा किंवा ब्राह्मण यांची ताटे चौरंगावर मांडली जायची व इतरांची खाली मांडली जात कारण त्या दिवशी पाहुण्याचा सन्मान करायचा म्हणून ही प्रथा.
 
मंगळागौरीच्या दिवशीची पूजा खूप फुले आणि पत्री यांनी सजवायची तर त्यासाठी चौरंगाशिवाय योग्य जागा कुठली असणार? त्यावर भरगच्च फुलं आणि पत्री वाहिली की बघणार्‍यालाही प्रसन्न वाटत असे.
 
सत्यनारायणाच्या पुजेला तर चौरंगाच्या चारही पायांना केळीचे खांब बांधून आत ठेवलेला पुजेचा कलश आंब्याच्या पानांमध्ये ठेवलेला नारळ हे सगळंच बघायला खूप छान वाटतं. हिरव्या रंगाचं जणू संमेलनच!
 
विवाहकार्यात विहिणीचा मान करायचा तो चौरंगावर बसवूनच. तिची ओटी भरली जायची, अगदी पूर्वी तिचे पायही धुतले जायचे.
 
लहान मुले, मोठी माणसे पूर्वी चौरंगावर बसून आंघोळ करीत असत. जुन्या चित्रात राणी, राजकन्या यांचे केस धुतले जातायत हे दाखवतांना त्या चौरंगावर बसलेल्याच दाखवल्या जायच्या.
 
हे चौरंग पूर्वी लाकडाचे बनवले जायचे ते नक्षीदार असत. त्याच्यावर चांदीच्या किंवा पितळेची फुले ठोकून बसवत. चौरंग केवळ लाकडाचेच नाहीत तर चांदी-सोन्याचेही बनवले जात असत. नंतर या चौरंगात पुजेच्या वस्तू ठेवता याव्यात म्हणून ड्रॉवर केले गेले. 
 
चौरंग पूर्णत: वापरातून गेला असे म्हणता येणार नाही. आजही तो तुरळक घरांमध्ये आढळतो. त्यावर सनमायका बसवला जातो किंवा त्याला पॉलिश केले जाते. पुजेसाठी चौरंग ओळखीच्यांकडून नाहीतर भाडे देऊन आणला जातो.
 
घरात जेवणाची टेबले आली आणि जेवणातून चौरंग हद्दपार झाला. तीच गोष्ट स्नानाबाबत म्हणता येईल. आता वेगळय़ा आकाराचे स्टील, प्लॅस्टिक, फायबरचे स्टूल मिळू लागल्याने चौरंगाचा उपयोग राहिला नाही. स्नानासाठी चौरंग वापरताना लाकूड खराब होईल का, त्याचा रंग जाईल का, वापरण्यायोग्य रहाणार नाही का हे बघावे लागत असल्याने त्याला पर्याय आले.
 
अलीकडे विवाह प्रसंगात विहिणीसुद्धा पाय धुवून घेत नाहीत ही एक चांगली गोष्ट आहे. विवाह साग्रसंगीत करण्याऐवजी मोजके विधी करून करण्याची प्रथा रुजू लागल्याने चौरंगाचा उपयोग र्मयादित झाला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती