संत निवृत्तीनाथांचे अभंग 151 ते 160
बुधवार, 15 जून 2022 (15:34 IST)
हा पुरुष कीं नारी नव्हे तो रूपस । शेखी जगदीश जगद्रूप ॥ १ ॥
तें हें कृष्णरूप यशोदेकडीये । नंदाघरीं होये बाळरूप ॥ २ ॥
ज्यातें नेणें वेद नेणती त्या श्रुती । त्या गोपिका भोगिती कामरूपें ॥ ३ ॥
निवृत्तिचें ब्रह्म कृष्णनामें खेळे । असंख्य गोवळें ब्रह्मरूप ॥ ४ ॥
ध्यानाची धारणा उन्मनीचे बीज । लक्षितां सहज नये हातां ॥ १ ॥
तें हें कृष्णनाम सखे नंदघरी । गौळियां माझारी ब्रह्म खेळे ॥ २ ॥
न दिसे पाहतां शेषादिका गति । यशोदे श्रीपति बाळ झाला ॥ ३ ॥
गुंतलें मायाजाळीं अनंत रचनें । तो चतुरानना खुणें न संपडे ॥ ४ ॥
नकळे हा निर्धारू तो देवकी वो देवी । शेखीं तो अनुभवीं भुलविला ॥ ५ ॥
निवृत्ति रचना कृष्णनामें सार । नंदाचें बिढार ब्रह्म झालें ॥ ६ ॥
चतुरानन घन अनंत उपजती । देवो देवी किती तयामाजि ॥ १ ॥
तेंचि हें सांवळें अंकुरलें ब्रह्म । गोपसंगे सम वर्ते रया ॥ २ ॥
निगमा नाठवे वेदाचां द्योतुकु । तो चतुर्भुज देखु नंदाघरीं ॥ ३ ॥
निवृत्ती म्हणे शंखचक्रांकितमूर्ति । आपण श्रीपति क्रीडतसे ॥ ४ ॥
ज्या रूपाकारणें देव वोळंगणे । योगी गुरुखुणें सेविताती ॥ १ ॥
ते रूप गोकुळीं गोपाळांचे मेळीं । अखंड त्यामेळीं खेळतुसे ॥ २ ॥
ब्रह्मांड कडोविकडी ब्रह्मांड घडी । या योग परवडी हरपती ॥ ३ ॥
निवृत्तीचे धन ब्रह्म हें रोकडें । गौळणी त्यापुढें खेळविती ॥ ४ ॥
गगन ग्रास घोटीं ब्रह्मांड हें पोटीं । चैतन्याची सृष्टि आपण हरि ॥ १ ॥
देखिलागे माये सुंदर जगजेठी । नंदयशोदेदृष्टी ब्रह्म खेळे ॥ २ ॥
आकाश सौरस तत्त्व समरस । तो हा ह्रषिकेश गोपीसंगें ॥ ३ ॥
निवृत्ति साधन निरालंबीं ध्यान । तोचि हा श्रीकृष्ण ध्यान माझें ॥ ४ ॥
चिंतितां साधक मनासि ना कळे । तो गोपिकासी आकळे करितां ध्यान ॥ १ ॥
देखिलागे माये सगुणागुणनिधि । यशोदा गोविंदीं प्रेम पान्हा ॥ २ ॥
न माये सर्वाघटी आपणचि सृष्टी । तो यमुनेच्या तटीं गायी चारी ॥ ३ ॥
निवृत्ति साधन कृष्णाचे रूपडें । ब्रह्मांडा एवढें तदाकार ॥ ४ ॥
निज लक्षाचें लक्ष हरपलें भान । दिन मान शून्य जया माजी ॥ १ ॥
तें ब्रह्म गोजिरें गोपाळ संगती । संवगडे सांगाती भाग्यवंत ॥ २ ॥
वेणुवाद्यध्वनि यमुनाजळ स्थिर । ध्यानाचा प्रकार कृष्णरासी ॥ ३ ॥
निवृत्ति म्हणे तें स्वरूप सौख्य रूपडें । पाहाती चहूंकडे योगीजन ॥ ४ ॥
अनंतरूप देव अनंत आपण । अंतर्बाह्यखुण योगीयांसी ॥ १ ॥
तो हा हरिमाये गोकुळीं अवतार । गोपीसंगें श्रीधर खेळतुसे ॥ २ ॥
शास्त्रांसि नाकळे श्रुति ही बरळे । तें गोपवेषें खेळे गोपाळांमाजी ॥ ३ ॥
निवृत्तिचें सार गयनीविचार । ब्रह्मचराचरमाजि वसे ॥ ४ ॥
जेथें न रिघे ठाव लक्षितां लक्षणे । सूर्य तारांगण हरपती ॥ १ ॥
तें रूप रूपस कृष्णब्रह्मनाम । गौळिया सप्रेम वोळलेंसे ॥ २ ॥
जेथें लय लक्ष हरपोन सोये । द्वैत तें न साहे सोहंबुद्धि ॥ ३ ॥
निवृत्ति मान्यता सेवितु साकार । आपण आपार गोपवेषें ॥ ४ ॥
मी पणे सगळा वेदु हरपला । शास्त्रांचा खुंटला अनुवाद ॥ १ ॥
तें रूप सुंदर कृष्ण नाम सोपार । निरालंब गोचर गोकुळींचे ॥ २ ॥
सेविता योगियां सुलभ दुर्गम । गौळियां सुगम नाम घेतां ॥ ३ ॥
निवृत्ति निकट कृष्णनामसार । पापाचा संचार नाम छेदी ॥ ४ ॥