संत निवृत्तीनाथांचे अभंग 141 ते 150
बुधवार, 15 जून 2022 (15:26 IST)
उफराटी माळ उफराटें ध्यान । मनाचें उन्मन मूर्ति माझी ॥ १ ॥
तें रूप आवडे भोगिता साबडें । यशोदेसि कोंडें बुझावितु ॥ २ ॥
नहोनि परिमाण हरपलें ध्यान । आपणचि रामकृष्ण जाला ॥ ३ ॥
निवृत्तिची जपमाळा हे गोमटी । मन तें वैकुंठी ठेवियेलें ॥ ४ ॥
श्यामाचि श्यामशेज वरी । तेज विराजे सहजें केशिराज क्षीरार्णवीं ॥ १ ॥
शेषशयन अरुवारी गोविंद क्षीरसागरीं । तो नंदयशोदेघरीं क्रीडतुसे ॥ २ ॥
अनंत नामीं क्षीर क्षरलासे साचार । गोपिकासमोर हरीराजा ॥ ३ ॥
नाहीं योगिया दृष्टि मनोमयीं करि सृष्टि । पाहातां ज्ञानदृष्टी विज्ञान हरि ॥ ४ ॥
शांति नेणें क्शमे पारु विश्रांतिसी अरुवारु । तो कैसा पा उदारु गोपाळांसी ॥ ५ ॥
विचाराचें देटुगें आकार निराकार सांगे । तो गोसावी निगे गोकुळीं रया ॥ ६ ॥
निवृत्तीचें परब्रह्म नामकृष्ण विजय ब्रह्म । चिंतितां चिंताश्रम नासोनि जाय ॥ ७ ॥
विस्तार विश्वाचा विवेकें पैं साचा । बोलताचि वाचा हारपती ॥ १ ॥
तें रूप श्रीधर कृष्णाचा आकार । सर्व निराकार एकरूपें ॥ २ ॥
नसतेनि जीव असतेनि शिव । तदाकार माव मावळली ॥ ३ ॥
निवृत्ति स्वरूप कृष्णरूप आप । विश्वीं विश्वदीप आपेंआप ॥ ४ ॥
तारक प्रसिद्ध तीर्थ तें अगाध । नामाचा उद्बोध नंदाघरी ॥ १ ॥
प्रकाश पूर्णता आदिमध्यें सत्ता । नातळे तो द्वैताद्वैतपणें ॥ २ ॥
निवृत्ति साधन कृष्णरूपें सुख । विश्वीं विश्वरूप हरि माझा ॥ ३ ॥
आगम निगमा बोलतां वैखरी । तो यशोदेच्या करीं धरूनी चाले ॥ १ ॥
न संपडे शिवा बैंसताची ध्यानीं । जालिया उन्मनी दृश्य नव्हे ॥ २ ॥
कमळासनीं ब्रह्मा ध्यानस्थ बैसला । पाहतां पाहतां मुळा न संपडे ॥ ३ ॥
निवृत्ति गयनी सांगतुसे खुणा । तो देवकीचा तान्हा बाळ झाला ॥ ४ ॥
अष्टांग सांधनें साधिती पवन । ज्यासि योगीजन शिणताती ॥ १ ॥
तो हा कृष्ण गोपीगोपाळांमाझारी । क्रीडा नानापरी करी आत्मा ॥ २ ॥
अठरा साहिजणें बोलती परवडी । तो माखणासि जोडी स्वयें कर ॥ ३ ॥
निवृत्तीचें ध्येय कृष्ण हाचि होय । गयनिनाथें सोय दाखविली ॥ ४ ॥
अंधारिये रातीं उगवे हा गभस्ति । मालवे ना दीप्ति गुरुकृपा ॥ १ ॥
तो हा कृष्ण हरि गोकुळामाझारी । हाचि चराचरीं प्रकाशला ॥ २ ॥
आदि मध्य अंत तिन्ही जाली शून्य । तो कृष्णनिधान गोपवेषे ॥ ३ ॥
निवृत्तिनिकट कृष्णनामपाठ । आवडी वैकुंठ वसिन्नले ॥ ४ ॥
दुभिले द्विजकुळी आलें पैं गोकुळी । नंद यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ १ ॥
खेळे लाडेकोडें गौळणी चहूंकडे । नंदाचें केवढे भाग्य जाणा ॥ २ ॥
ज्या रूपें वेधलें ब्रह्मांड निर्मळे । तेंचि हें आकारले कृष्णरूपें ॥ ३ ॥
निवृत्ति दिवटा कृष्णाचिया वाटा । नामेचि वैकुंठा पावन होती ॥ ४ ॥
विश्वीं विश्वपती असे पैं लक्ष्मीनाथ । आपणचि समर्थ सर्वांरूपी ॥ १ ॥
तें रूप गोकुळीं नंदाचिये कुळीं । यशोदे जवळी बाळकृष्ण ॥ २ ॥
सर्वघटी नांदे एकरूपसत्ता । आपणचि तत्त्वतां सर्वांरूपी ॥ ३ ॥
निवृत्तीचें पार कृष्णचि पै सार । गोकुळीं अवतार नंदाघरीं ॥ ४ ॥
जेथें नाहीं वेदु नाहीं पै शाखा । द्वैताचा हा लेखा हरपला ॥ १ ॥
तें रूप वोळलें नंदायशोदे सार । वसुदेवबिढार भाग्ययोगें ॥ २ ॥
नमाये पुरत ब्रह्मांडाउभवणी । त्यालागीं गौळणी खेळविती ॥ ३ ॥
निवृत्ति ब्रह्मसार सेवितुसे सोपें । नामें पुण्यपापें हरपती ॥ ४ ॥