संत निवृत्तीनाथांचे अभंग 121 ते 130

सोमवार, 13 जून 2022 (16:28 IST)
निरशून्य बिंबी आकार पाहतां । आपण तत्त्वता हरि एकु ॥१॥
तें रूप साबडे कृष्णा माजींवडे । सोंवळें उघडें शौच सदा ॥२॥
तेथें वर्ण व्यक्ति कल्पना हरपती । मनाच्या खूंटती गती जेथें ॥३॥
निवृत्ति नितंब सोवळा स्वयंभ । प्रकाशलें बिंब चहूंकडे ॥४॥
 
पंचतत्त्व कळा सोविळी संपूर्ण । त्याचेही जीवन जनार्दन ॥१॥
तो सोंवळा संपूर्ण अमृताचा घन । त्यामाजि सज्जन हरि आम्हा ॥२॥
नित्यता सोंवळा स्वयंपाकी शौच । न दिसे आमुचें आम्हां तेथें ॥३॥
निवृत्ति सोंवळा स्वयंपाकी नित्य । नाम हें अच्युत जपतसे ॥४॥
 
हिरण्यगर्भ माया अंडाकार छाया । ब्रह्म असलया तेथें नेत ॥१॥
तें रूप वैकुंठ जीवशिवपीठ । मायेचा उद्धाट छायसंगें ॥२॥
माया ब्रह्म हरि माता पिता चारी । जीवशिव शरिरीं एक नांदे ॥३॥
निवृत्ति छाया जीवशिवमाया । वासना संदेहा लया गेली ॥४॥
 
अनंत सृष्टि घटा अनंत नाम मठा । परिमाण पैठा आत्माराम ॥१॥
तें रूप साजिरें चतुर्भुजवेष । वैकुंठीचे लेख नंदभाग्य ॥२॥
सिद्धीचें साधन चिंतामणि धन । कल्पवृक्ष घन वसते जेथें ॥३॥
निवृत्तिचें मूळ गोपाळ सकळ । साधक दयाळ हरि होय ॥४॥
 
नित्य निर्गुण सदा असणें गोविंदा । सगुणप्रबंधा माजि खेळे ॥१॥
तें रूप सगुण अवघेंचि निर्गूण । गुणि गुणागुण तयामाजि ॥२॥
अनंत तरंगता अनंत अनंता । सृष्टीचा पाळिता हरि एकु ॥३॥
निवृत्ति परिमाण अनंत नारायण । सर्वाहि चैतन्य आपरूपें ॥४॥
 
नामरूपा गोडी ब्रह्मांडा एवढी । द्वैताची परवडी हारपली ॥१॥
तें रूप सुंदर कॄष्णाचें सकुमार । सेविती निर्मळ भक्तराज ॥२॥
विराटे अनंत ज्या माजि विरतें । नव्हेचि पुरतें शेषादिकां ॥३॥
निवृत्ति लक्ष्मी गरूड चिंतिती । तयांचिये मति आकळ हरि ॥४॥
 
खुंटले साधन तुटलें बंधन । सर्वही चैतन्य एकरूप ॥१॥
नाहीं तेथें माया नाहीं तेथें छाया । निर्गुणाच्या आया ब्रह्मरूप ॥२॥
चैतन्य साजिरें चेतवी विचारें । आपरूपें धीरें विचरत ॥३॥
निवृत्ति म्हणे तें कृष्णरूप सर्व । रोहिणीची माव सकळ दृष्टि ॥४॥
 
निकट वेल्हाळ नेणों मायाजाळ । विव्हळ पाल्हाळ नेणों कांही ॥१॥
तें रूप श्रीधर मानवी अकार । सर्व निराकार सिद्धि वोळे ॥२॥
कुटूंब‍आचार कुळवाडी साचार । सर्व हा श्रीधर एका एक ॥३॥
निवृत्ति निगग्न गयनीच प्रतिज्ञा । नामें कोटि यज्ञा होतजात ॥४॥
 
रूप हें सावंळे भोगिताती डोळे । उद्धवा सोहळे अक्रूरासी ॥१॥
पदरज वंदी ध्यान हें गोविंदी । उद्धव मुकुंदीं तल्लीनता ॥२॥
विदुक्र सुखाचा नाम स्मरे वाचा । श्रीकृष्ण तयाचा अंगीकारी ॥३॥
निवृत्तीचें ध्यान ज्ञानदेव खूण । सोपान आपण नामपाठें ॥४॥
 
भरतें ना रितें आपण वसतें । सकळ जग होते तयामाजी ॥ १ ॥
तें रूप पैं ब्रह्म चोखाळ सर्वदा । नित्यता आनंदा नंदाघरीं ॥ २ ॥
आशापाश नाहीं घरीं पूर्णापूर्ण । सकळ जग होणे एक्यारूपें ॥ ३ ॥
निवृत्ति तटाक ब्रह्म रूप एक । जेथें ब्रह्मादिक ध्याती सदा ॥ ४ ॥

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती