संत निवृत्तीनाथांचे अभंग 81 ते 90

सोमवार, 13 जून 2022 (15:39 IST)
अरूप बागडे निर्गुण सवंगडें । खेळे लाडेंकोडे नंदाघरीं ॥ १ ॥
तें रूप संपुर्ण यशोदा खेळवी । कृष्णातें आळवी वेळोवेळां ॥ २ ॥
सागरजीवन सत्रावीची खुण । मेघ ती वर्षण वोळलीसे ॥ ३ ॥
निवृत्तिचें धन गोकुळीं श्रीकृष्णां । गयनी सहिष्णु प्रेमें डुल्ले ॥ ४ ॥
 
मेघ अमृताचा जेथूनि पवाड । दुजियाची चाड नाहीं तेथें ॥ १ ॥
तें रूप अरूप सुंदर सावळे । भोगिती गोवळे सुखसिंधु ॥ २ ॥
विराट नाटकु वैराज जुनाटु । गोपवेषें नटु नंदाघरीं ॥ ३ ॥
निवृत्ति सत्वर सेवि सुखसार । प्रकृति आकार लोपें ब्रह्मीं ॥ ४ ॥
 
वैभव विलास नेणोनिया सायास । कल्पनेची आस नाहीं जेथें ॥ १ ॥
तें रूप दुर्लभ कृष्णमूर्तिठसा । वोतल्या दशदिशा नंदाघरीं ॥ २ ॥
योगियांचे ध्यान मनाचें उन्मन । भक्तांचे जीवन गाई चारी ॥ ३ ॥
निवृत्ति साकार ब्रह्मींचा प्रकार । ॐतत्सदाकार कृष्णलीला ॥ ४ ॥
 
ब्रह्मांड करी हरि ब्रह्म झडकरी । तें नंदयशोदेघरीं खेळतसे ॥ १ ॥
त्रैलोक्यदुर्लभ ब्रह्मांदिका सुलभ । रुक्मिणीवल्लभ कृष्ण सांवळा॥ २ ॥
हिरण्याक्ष वधूनि दाढेवरी मेदिनी । तो हा चक्रपाणी यशोदेचा ॥ ३ ॥
रामावतारु गाढा दशशिरा रगडा । रिठासुर दाढा तेणेंपाडें ॥ ४ ॥
चतुर्भुज श्रीपति सुकुमार साजती । शंख चक्रांकिती हरि माझा ॥ ५ ॥
निवृत्ति ध्यानशूर सर्वरूपें श्रीधर । जिंकिला भौमासुर रणयुद्धीं ॥ ६ ॥
 
आदीची अनादि मूळ पैं सर्वथा । परादि या कथा हारपती ॥ १ ॥
तें अव्यक्त रूप देवकीचें बाळ । वसुदेवकुळ कृष्णठसा ॥ २ ॥
मुरालीं ब्रह्मांडें अमितें पैं अंडें । ढिसाळ प्रचंडें जया माजी ॥ ३ ॥
निवृत्तीचें धन माजी तो श्रीकृष्ण । सांगितला प्रश्न गयनीराजें ॥ ४ ॥
 
बिंबीं बिंबीं येक बिंबलें सम्यक । आपण तिन्हीलोक एक्यारूपें ॥१॥
तो कृष्णरूप ठसा गोपाळां लाधला । सर्वत्र देखिला चतुर्भुज ॥२॥
निळिमा अंबरीं निजवर्ण तेज । गोपाळ सहज बिंबाकार ॥३॥
निवृत्ति परिपाठा नीळवर्ण खरा । नंदाचिया घरा कृष्ण आले ॥४॥
 
वैकुंठ दुभतें नंदाघरीं माये । तें पुण्य पान्हा ये यशोदेसी ॥१॥
तें रूप रूपस कांसवी प्रकाश । योगीजनमानस निवताती ॥२॥
सुंदर सुनीळ राजस गोपाळ । भक्तीसी दयाळ एक्या नामे ॥३॥
निवृत्ति गयनी मन ते चरणीं । अखंडता ध्यानीं तल्लीनता ॥४॥
 
गोकुळीं वैकुंठ वसे गोपाळांमाजी । सौरसें अभक्ता न दिसे काय करूं ॥१॥
पूर्वपुण्य चोखडें ब्रह्मांड कोडें । तो यशोदेकडे शोभे कैसा ॥२॥
वसुदेव आपण देवकीये समीप । वैकुंठीचें दीप लाडेंकोडें ॥३॥
उग्रसेन संप्रधार केला राज्यधर । यादव परिवार रामकृष्ण ॥४॥
द्वारकानाथ हरि सोळासहस्त्र नारी । बळिराम परिवार हरि माझा ॥५॥
निवृत्ति जीवन ध्यान एक रामकृष्ण । उच्चारणी कोटि यज्ञ होती नामें ॥६॥
 
सर्वस्वरूप नाम राम सर्व घनःश्याम । तो गोकुळीं आत्माराम दुध मागे ॥१॥
भाग्येंविण दुभतें दैव उभडतें । नंदाघरीं आवडते घरीं खेळे ॥२॥
मंजुळ वेणु वाजें लुब्धल्या धेनुवा । नंदाघरीं दुहावा पूर्ण वाहे ॥३॥
घरोघरीं दुभतें गौळियां परिपूर्ण । यशोदा ते आपण गोरस घुसळी ॥४॥
गोपाळ हरिखु नंदा यशोदे देख । गौळियां कौतुक करिती हरि ॥५॥
निवृत्ति गयनी देव उपदेशिला सर्व । गोरक्ष गुह्म भाव सांगति मज ॥६॥
 
हें व्यापूनि निराळा भोगी वैंकुंठ सोहळा । नंदाघरीं गोपाळा हरि माझा ॥१॥
न साहे सगुण अवघाचि निर्गुण । तो कृष्ण आपण गोपाळवेषें ॥२॥
गायी चारी हरि मोहरी खांद्यावरी । वेणु नाना परि वातु असे ॥३॥
निवृत्ति गयनी कृपा जपतो अमुप जाण । सांगीतली खूण गोरक्षानें ॥४॥

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती