संकष्ट चतुर्थी : चंद्राला व गणपतीला नैवेद्य दाखवावा

गुरूवार, 29 एप्रिल 2021 (08:07 IST)
प्रत्येक महिन्यात येणाऱ्या संकष्ट चतुर्थीला उपवास करून गणेशाची आराधना करण्याची परंपरा आदिकालापासून सुरू आहे. संकष्ट चतुर्थी हे व्रत कोणीही करू शकते. या व्रतात दिवसभर उपवास करावा. उपवासानंतर चंद्रोदय झाल्यावर चंद्राला व गणपतीला महानैवेद्य दाखवावा. त्यानंतरच भोजन करावे. गणपतीचे भक्त, उपासक, साधक हा दिवस विशेष भक्तिभावाने साजरा करतात. चंद्रदर्शन हा या व्रतातील महत्त्वाचा भाग आहे.
 
प्रत्येक महिन्याच्या शुद्ध पक्षात येणारी विनायकी चतुर्थी आणि वद्य पक्षात येणारी संकष्टी चतुर्थी हे गणपतीच्या व्रतोपवासाचे महत्त्वाचे दिवस मानले जातात. गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी संकष्ट चतुर्थीचे व्रत केले जाते. संकष्ट चतुर्थी व्रत प्रत्येक महिन्यांत दुसर्‍या पंधरवड्यात वद्य चतुर्थीच्या दिवशी "संकष्टी चतुर्थी" असते. हा श्रीगणपतीच्या उपासनेचा दिवस आहे. दिवसभर उपोषण करुन, रात्रौ चंद्रोदयाच्या वेळी श्रीगणपतीची पूजा करुन, चंद्रदर्शन घेऊन उपोषण सोडावयाचे. अशी या व्रताची थोड्क्यांत पाळ्णूक आहे. 
 
बुद्धिदाता, गणांचा अधिपती, सुखकर्ता, दुःखहर्ता, विघ्नहर्ता अशी कितीतरी बिरुदांनी प्रसिद्ध असलेल्या गणेश, गणपतीचे केवळ नाव उच्चारताच चैतन्य, उत्साह आणि सकारात्मकतेचा संचार मनात, शरीरात आणि वातावरणात होतो. घरोघरी गणपतीची उपासना, नामस्मरण, पूजन केले जाते. 
 
संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सकाळी लवकर उठून अंघोळ करून उत्तर किंवा पूर्व दिशेकडे मुख करून गणपतीची पूजा करावी. गणपतीला दूर्वा, लाल फुलं, रोली, फळं, पंचामृत अर्पित करावे. मोदक किंवा तिळाच्या लाडवाचा नैवेद्य दाखवला जातो. संकष्टी चतुर्थी व्रत कथा श्रवण करावी आणि गणपतीची आरती, स्तुती करावी. चंद्रोदय झाल्यावर चंद्राला अर्घ्य द्यावे नंतर व्रत सोडावे. संकष्टी चतुर्थीच्या दिवशी सूर्योदयापासून चंद्रोदयापर्यंत उपवास केला जातो. गणपती बाप्पाची विधी युक्त पूजा केली जाते तेव्हाच याचा संपूर्ण लाभ मिळतो. संकष्टी करणार्‍यांनी उपोषण सोड्ण्यापूर्वी नेहमी, पुढे दिलेले "संकष्टी चतुर्थी महात्म्य" अवश्य वाचावे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती