केरळ राज्याचे नवीन वर्ष ओणम या उत्सवाने सुरू होते. १० दिवस चालणाऱ्या या उत्सवातील १० वा दिवस तिरूवोणम सगळ्यात धुमधडाक्याने साजरा केला जातो. ओणम उत्सव मल्याळी भाषेत चिंगम (ऑगस्ट-सप्टेंबर) या महिन्यात दैत्यराज महाबली या प्रह्लादाच्या नातवाच्या न्यायीपणाची, पराक्रमाची आणि त्याच्याबद्दल असलेल्या प्रेमाची आठवण म्हणून साजरा केला जाणारा उत्सव आहे.
यावेळी पारंपारिक नाचगाणी, खेळ, नाटके वगैरे कार्यक्रमांचे आयोजन संपूर्ण केरळ राज्यात केले जाते. ओणम उत्सव केरळातील सगळ्यात मोठा आणि महत्त्वाचा उत्सव असल्याने त्यावेळी नवीन कपड्यांची खरेदी केली जाते तसेच या दिवसात केवळ या उत्सवासाठीचे खास पारंपारिक पद्धतीचे अनेक खाद्यपदार्थही तयार केले जातात. केरळ राज्यातील सर्वच जाती-धर्माचे लोक हा उत्सव मोठ्या आनंदात साजरा करतात.