गणपतीपुळे मंदिर इतिहास, गणपती आरती उत्सव पूर्ण माहिती
गणपतीपुळे मुख्यतः भगवान गणपतीच्या जुन्या मंदिरासाठी ओळखले जाते जे मुख्य आकर्षण आहे. महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टीवरील गणपतिपुळेमध्ये आकर्षक किनारे आहेत. समुद्रकिनारे आणि गणपती मंदिर व्यतिरिक्त गणपती पुळे मध्ये अनेक पर्यटन स्थळे आहेत. गणगुतीपुळे पासून सुमारे 2 कि.मी. मालगुंड हे प्रसिद्ध कवी केशवसुतचे यांचे जन्मस्थान असून गावामध्ये त्यांचे स्मारक आहे.
मुंबईपासून सुमारे ३५० कि.मी. अंतरावर असलेल्या कोकणातील रत्नागिरी जिह्यातील गणपतीपुळ्याचे गणेशस्थान पेशवेकालीन अती प्राचीन आहे. या लंबोदराच्या स्थानाचा इतिहास मुद्गल पुराणादी प्राचीन वाङमयात पश्चिमद्वार देवता या नावाने आहे. कोकणातील प्रत्येक देवस्थान आणि देवतांविषयी वेगवेगळ्या दंतकथा आहेत.
हिंदुस्थानच्या आठ दिशांत आठ द्वार देवता आहे. त्यापैकी गणपतीपुळ्यातील देवता ही पश्चिमद्वार देवता आहे. मोगलाईच्या काळात ( सुमारे इ.स. १६०० च्या पूर्वी ) आज ज्या ठिकाणी स्वयंभू गणेश मंदिर आहे, त्या ठिकाणी डोंगराच्या पायथ्याशी केवड्याचे बन होते. त्या ठिकाणी बाळंभटजी भिडे हे ब्राह्मण रहात होते. ते गावचे खोत होते. मोगलाईच्या काळात भिडेंवर संकट कोसळले. भिडे हे दृढनिश्चयी होते. "आलेले संकट निवारण झाले तरच अन्नग्रहण करीन", असा निश्चय करुन त्यांनी आराघ्य दैवत मंगलमूर्तीची उपासना करण्यासाठी या केवड्याच्या बनात तपस्या करण्यासाठी मुक्काम केला.
अन्नपाणी वर्ज करणाऱ्या भिडेंना एके दिवशी दृष्टांत झाला की, "मी या ठिकाणी भक्तांच्या कामना परिपूर्ण करण्यासाठी आगरगुळे (गणेशगुळे) येथून दोन गंडस्थळे व दंतयुक्त स्वरुप धारण करुन प्रकट झालो आहे. माझे निराकार स्वरुप डोंगर हे आहे. माझी सेवा, अनुष्ठान, पूजाअर्चा कर, तुझे संकट दूर होईल." असा दृष्टांत झाला. त्याच कालखंडात खोत भिडे यांची गाय सतत काही दिवस दूध देत नव्हती. म्हणून गुराख्याने बारीक लक्ष ठेवले. तेव्हा त्याला दिसले की सघ्याच्या मूर्तीच्या जागी डोंगरावरील एका शिळेवर गायीच्या स्तनातून सतत दूधाचा अभिषेक होत होता. हा प्रकार त्याने खोतांना सांगितला, त्यांनी तात्काळ सर्व परीसराची सफाई केली व त्यांना दृष्टांतातील गणेशाची मूर्ती आढळली. त्या ठिकाणी गवताचे छप्पर घालून त्यांनी छोटेसे मंदिर उभारले. सारी धार्मिक कृत्ये भिडे भटजींनी सुरु केली.
गणपतीपुळ्याला गणपतीपुळे हे नाव कसे पडले याचीही एक कथा आहे. पूर्वी या गावात फारशी वस्ती नव्हती. वस्ती झाली ती गावाच्या उत्तरेच्या बाजूला. गाव पश्चिम दिशेने उतरण असून बराचसा भाग पुळणवट आहे. हिंदुस्थानच्या पश्चिम भागाची मुख्य सीमा जो सिंधुसागर आहे, त्या लगतचे गाव असून सकल देवतांमध्ये आराध्यदैवत अशी श्री मंगलमुर्ती तिने आपल्या निवासस्थानाला योग्य ठिकाण असे पाहून या समुद्रकिनारी निवास केला आहे. समुद्रापुढे पुळणीचे (वाळूचे) भव्य मैदानात गणपतीचे महास्थान असल्यामुळे या गावाला गणपतीपुळे म्हटले जावू लागले.
श्रींच्या मंदिरातील विविध उत्सव
भाद्रपदी उत्सव
भाद्रपद शुद्ध १ ते भाद्रपद शुद्ध ५.
दररोज रात्री आरत्या, मंत्रपुष्प व कीर्तन असा कार्यक्रम असतो.
वामन द्वादशीचे दिवशी महाप्रसाद असतो.
माघ उत्सव
माघ शुद्ध १ ते माघ शुद्ध ५.
दररोज रात्री आरत्या, मंत्रपुष्प व कीर्तन असा कार्यक्रम असतो.
माघ शुद्ध ६ रात्रौ सांस्कृतिक कार्यक्रम.
माघ शुद्ध ७ दुपारी महाप्रसाद व रात्रौ सांस्कृतिक कार्यक्रम.
दसरा
विजया दशमीचे दिवशी सकाळी श्री भिडे खोत यांच्या समाधीची पूजा करुन भक्तजनांना २१०० बूंदी लाडूचा प्रसाद वाटला जातो. सर्व नगारे, सुर, सनई याची पूजा केली जाते. सायंकाळी सीमोल्लंघनासाठी पालखी बाहेर पाते. प्रदक्षिणा मार्गावर क्षमीच्या वृक्षाखाली पालखी थांबते. त्या ठिकाणी पूजा होवून सोने म्हणून क्षमीच्या झाडाची पाने लुटली जातात. मंदिरात येवून ती पाने गणपतीला अर्पण केली जातात व पालखी सोहळा पूर्ण होतो.
दीपोत्सव
कोजागिरी पौर्णिमा ते त्रिपूरी पौर्णिमा.
अश्विन शुद्ध १५ ते कार्तिक शुद्ध १५. दररोज सायंकाळी आरतीच्या वेळी पणत्या लावून दिपोत्सव साजरा केला जातो.
वसंतपूजा
चैत्र शुद्ध १ ते वैशाख शुद्ध 3 ( गुढीपाडवा ते अक्षय्यतृतीया).
श्रींची पालखी मिरवणूक
प्रत्येक संकष्टीला एका अशी वर्षातून बारावेळा, तसेच गुढीपाडवा, दसरा, दीपावली (पहीला दिवस), गणेश चतुर्थी (भाद्रपद शु.४), माघी चतुर्थी (माघ शु.४) या पाच दिवशी अशी वर्षातून सतरा वेळा श्रींची पालखी मिरवणूक काढली जाते.
गणपतीपुळेची प्रसिद्ध आरती
आरती सुंदर वदनाची । गिरिजा शशिघर तनयाची ।
स्वयंभू पश्चिम दिग्विसी । प्रकटला भक्त रक्षणासी ।
सन्मुख सागर समदृष्टी । शोभतो हरित गिरिपृष्टी ।
विराजे सिंदुर सर्वांगा । वाहते सव्य नाभीगंगा ।
वर्णु काय तीर्थ महिमा ऽऽऽ ।
स्थान हे पुलिन, असे जरी विजन, निवासे परम कृपेने पावन ते जाणिले ।
त्रिभूवनी क्षेत्र धन्य झाले । देखता मूर्ती गणेशाची । होईना तृप्ती नयनांची ।