वाणीचे हे प्रकार आपल्याला माहीत आहे का?

गुरूवार, 9 जानेवारी 2020 (11:15 IST)
आज आपण वाणीचे 4 प्रकार जाणून घेऊ या. आपण तोंडाने जे बोलतो तीच वाणी आहे, असे समजतो पण तसे नाही. या व्यतिरिक्त इतर प्रकारेही बोलता येतं. बाकी कशात नाही पण नामस्मरणात या वाणींना खूप महत्त्व आहे. नामस्मरण कोणत्या वाणीतून होत आहे, हे लक्षात घेत राहावे लागते. त्यानुसार साधकाची प्रगती कळते.
 
वैखरी 
आपण तोंडाने जे काही बोलतो त्याला वैखरी वाणी असे म्हणतात. सर्वांना हीच वाणी माहीत आहे. आपण दुसर्‍यांशी बोलतो, भाषा शिकतो, हे सर्व वैखरी वाणीने होते. नामस्मरणाचा पहिला टप्पा सुरू होतो तेव्हा वैखरी वाणीद्वारे नाम घेतले जाते. तोंडातल्या तोंडात नाम घेणे म्हणजे वैखरी होय. नामजप हा वैखरीनेच घ्यावा लागतो.
 
मध्यमा 
नामजप जेव्हा गळ्यात येतो तेव्हा तो मध्यमा वाणीत आला आहे असे समजावे. आपण मनातल्या मनात जप करतो असे म्हणतो तेव्हा तो मध्यमा वाणीतून येत असतो. झोपेतही गळ्यातल्या गळ्यात जप चालू राहतो ती मध्यमा वाणी होय. नामस्मरणात. मनात विचार न आणता मध्यमाने जप करता येतो.
 
परा
हृदयातून येणारी ती परा वाणी होय. नामाची जितकी संख्या असेल तेवढ्या कोटी जपसंख्या झाली की तो सिद्ध होतो आणि हृदयातून नामजप सुरू होतो. तो फक्त साधकालाच ऐकू येतो. परा ही सखोल वाणी आहे. या अवस्थेत वाचासिद्धी येते. आपण जे बोलू ते खरे होते.
 
पश्यन्ति 
नाभिमंडळापासून येणारी ती पश्यन्ति वाणी होय. एखादी व्यक्ती खूप हाका मारत असेल तेव्हा आपण त्याला सहज म्हणतो, काय रे! बेंबीच्या देठापासून ओरडतोस?? तेव्हा त्याला पश्यन्ति वाणी अभिप्रेत असते. कधीकधी भांडणात खूप तळतळाटाने वाक्ये उच्चारली जातात, तेव्हा ते तळतळाट लागतातच. उच्चार वैखरीतून झाले तरी ते नाभिमंडळातून आलेले असतात. पश्यन्ति मध्ये साधक जप करत नसला तरी तो आपोआप चालू राहतो. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती