Char Dham Yatra: चार धामच्या प्रवासात कोणत्या ठिकाणांचा समावेश होतो, जाणून घ्या तीर्थयात्रेचे महत्त्व

मंगळवार, 13 डिसेंबर 2022 (11:00 IST)
Char Dham Yatra:चार धाम यात्रा हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानली जाते. चार धाम यात्रेला गेल्याने पापमुक्ती होऊन मोक्ष प्राप्त होतो असे म्हणतात. त्यामुळे दरवर्षी मोठ्या संख्येने लोक चार धाम यात्रेला जातात. चार धाम यात्रेत भारतातील प्रसिद्ध धार्मिक स्थळांचा समावेश होतो. परंतु, चार धाम यात्रेत कोणती ठिकाणे समाविष्ट आहेत हे अनेकांना माहिती नाही.  जाणून घेऊया चार धाम यात्रेत कोणती देवस्थळे समाविष्ट आहेत.
बद्रीनाथ
उत्तराखंडला देवभूमी म्हणतात आणि बद्रीनाथ हे चार तीर्थक्षेत्रांपैकी एक आहे. असे मानले जाते की उत्तराखंडच्या चमोली जिल्ह्यात स्थित असलेल्या बद्रीनाथची स्थापना भगवान श्रीरामांनी केली होती. बद्रीनाथचे दरवाजे दिवाळीच्या दुसऱ्या दिवशी बंद होतात आणि उन्हाळ्यात उघडतात. दरवर्षी मोठ्या संख्येने भाविक येथे पोहोचतात आणि धार्मिक यात्रेत सहभागी होतात. बद्रीनाथसोबतच केदारनाथ, गंगोत्री आणि यमुनोत्री यात्रेलाही मोठे महत्त्व आहे. या प्रवासाने माणूस जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होतो, असे म्हणतात.
द्वारका
चार धामच्या प्रवासात द्वारका धामचा समावेश होतो. गुजरातमध्ये स्थित द्वारका हे मोक्षाचे द्वार मानले जाते. हे श्री कृष्णाचे शहर मानले जाते, जेथे भगवान श्रीकृष्णाची चांदीच्या रूपात स्थापना केली जाते. या मंदिराला दोन दरवाजे असून पहिल्या दरवाजाला मोक्षद्वार आणि दुसऱ्या दरवाजाला स्वर्गद्वार असे म्हणतात. जीवनातील पापांपासून मुक्ती मिळवण्यासाठी आणि मोक्षप्राप्तीसाठी द्वारकेला जावे असे म्हणतात.
जगन्नाथ मंदिर
चार धामच्या प्रवासात ओडिशातील जगन्नाथ मंदिराचाही समावेश आहे. जगन्नाथ मंदिर श्रीकृष्णाने बांधले. या मंदिरात भगवान कृष्णाशिवाय बलराम आणि बहीण सुभद्रा यांची पूजा केली जाते. आषाढ महिन्यात शुक्ल पक्षात जगन्नाथ पुरीची रथयात्रा काढली जाते आणि मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येथे पोहोचतात.
रामेश्वरम
रामेश्वरम धाम तामिळनाडूच्या रामनाथपुरम जिल्ह्यात स्थित आहे, जे चार धाम पैकी एक आहे. असे मानले जाते की भगवान श्रीरामांनी रामेश्वरममध्ये भगवान शंकराची मूर्ती स्थापित केली होती, जी स्वतः श्रीरामांनी स्वतःच्या हातांनी बनविली होती. भगवान रामाने शिवलिंगाचे नाव रामेश्वरम ठेवले. रामेश्वरमच्या यात्रेसाठी येथे मोठ्या संख्येने भाविक येतात.
Edited by : Smita Joshi 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती