तीन दिवस साधारण थंडीबरोबर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यता

गुरूवार, 1 डिसेंबर 2022 (21:13 IST)
राज्यात काही ठिकाणी ढगाळ वातावरण तयार झाले असून, विविध भागात थंडीचा जोरदेखील वाढला आहे. तापमानाचा पारादेखील सरासरीपेक्षा एक ते दोन सेल्सिअसने खाली उतरला आहे. त्यामुळे कोकणासह मुंबईत ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आहे. पुढील तीन दिवस साधारण थंडीबरोबर तुरळक ठिकाणी किरकोळ पावसाची शक्यताही असल्याची माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. तसेच पुढच्या दोन दिवसानंतर डिसेंबरचे पहिले दहा दिवस कोकणात थंडीचा जोर वाढणार असल्याचे सांगितले जात आहे.
 
उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगांव, धुळे आणि नाशिक या चार जिल्ह्यात थंडीचा जोर वाढणार असून या ठिकाणी तापमानाचा पारा घसरला असल्याने नागरिकांमध्ये हुडहुडी भरली आहे. दुसरीकडे संपूर्ण विदर्भात थंडीचा पारा वाढला आहे. विदर्भात थंडीचा कडाका वाढल्यानं ठिकठिकाणी शेकोट्या पेटवल्या आहेत. थंडीचा परा आणखी वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तर दक्षिण मध्य महाराष्ट्रातील अहमदनगर, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या सहा जिल्ह्यात तापमान सरासरीपेक्षा वाढले असून दोन ते चार अंश तापमान वर गेले आहे. त्यामुळे या जिल्ह्यांमध्ये विशेष थंडी जाणवणार नसल्याची माहिती माणिकराव खुळे यांनी दिली आहे. मात्र, तीन डिसेंबरनंतर दक्षिण मध्य महाराष्ट्रात हळूहळू थंडीचा जोर वाढणार आहे.
 
तर, मराठवाड्यातही तापमानाचा पारा घसरला आहे. येथील सर्वच जिल्ह्यात थंडीचा जोर वाढला आहे. मराठवाड्यात तापमानाचा पारा दोन ते चार अंश सेल्सिअसने घसरला आहे. सध्या मराठवाड्यात ८ ते १० अंश सेल्सिअस तापमान आहे. सात डिसेंबरपर्यंत थंडीचा जोर कायम राहणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती