जागरूकता

ND
समर्थ रामदासांच्या दासबोधातून आणि त्यांच्या चरित्रातून सर्व मानवजातीला अखंड सावधानतेचा संदेश प्राप्त होतो. रामदासांनी विवाहवेदीवर उभे असतांना पुरोहिताच्या मुखातला 'सावधान' शब्द ऐकला आणि तत्क्षणी ते अंतर्बाह्य सावध झाले, जागरूक झाले. त्यांनी हातातील वर माला तेथेच ठेवली आणि 'प्रपंच करितो विश्वाचा, या ध्योयाने प्रेरीत विश्वाचा, या ध्येयाने प्रेरीत होऊन सर्वदूर भ्रंमतीकरून विश्वकल्याणाचामार्ग अवलंबिला. 'रात्रंदिन अम्हा युद्धाचा प्रसंग' हे संतवचनही सर्वश्रुत आहे.

जीवनचक्रात मनुष्य हाच असा जीव आहे की ज्यास सुखदु:खाच्या संवेदनांबरोबरच आत्मभानही आहे. नीर-क्षीर विवेक आहे. योग्य काय अयोग्य काय हे ठरवून त्यानुसार कृती करण्याचे उत्तरदायित्व आहे. त्याचमुळे त्याची जबाबदारी इतर प्राणिमात्रांपेक्षा शतपटीने वाढलेली आहे. प्रत्येक कृती केल्यानंतर त्या कृतीसोबत एक प्रकारची मूल्यनिर्मितीही त्याच्याकडून होत असते. एका अर्थाने कृती पूर्वीचा त्याचा प्रत्येक निर्णय म्हणजे एक निकराची लढाईच असते. तोंडातून शब्द निघून गेल्यानंतर ज्याप्रमाणे तो मागे घेता येत नाही, हातातला बाण सुटल्यानंतर ज्याप्रमाणे तो परत फिरविता येत नाही, त्याचप्रमाणे एकदा निर्णय घेऊन कृती केल्यानंतर ती परत पूर्वस्थितीत आणता येत नाही. चुकीची कृती घडून गेल्यानंतर त्याचे तात्कालिक आणि दूरगामी परिणाम जेव्हा माणसाला आणि इतरांना त्यांच्या पुढच्या आयुष्यात भोगावे लागतात, तेव्हा मन कितीही पश्चातापदग्ध झाले तरी उपयोग होत नाही. या सर्व वैयक्तिक / सामाजिक क्लेशातून मुक्त व्हावयाचे असेल तर प्रतिक्षण अखंड जागरूक राहून उक्ती आणि कृती केली पाहिजे.

सुप्रसिद्ध तत्त्वज्ञ जे. कृष्णमूर्ती एकाग्रता आणि जागरूकता यात फरक करतात. आणि एकाग्रतेपेक्षा जागरूकतेला अधिक महत्त्व देतात. एकाग्रतेत इतर सर्व घडामोडींपासून अलिप्त होऊन फक्त एकाच विषयावर लक्ष केंद्रीत करावे लागते. यामध्ये मनाला बलपूर्वक महत्प्रयासाने इतर विषयांना मनाबाहेर ठेवून इच्छित ठिकाणी अवधान द्यावे लागते. ही खटपट करतांना पुष्कळदा मनुष्य थकून जातो, जेरीस येतो, चैतन्याच्या मूळ स्त्रोतापासून ढळून जडतेकडे झुकू लागतो. कारण एकाग्रतेत एक प्रकारची यांत्रिकता अनूस्यूत असते. सतत सजग, सतर्क आणि जागरूक असणे म्हणजे जीवंतपणाच्या, चैतन्याच्या, सृजनतेच्या पाऊलखुणावरून चालणे होय.

सामान्य माणसाला, विद्यार्थ्याला मन एकाग्र करतांना खूप त्रास होतो. कितीही प्रयत्न केला तरी मन विचलित होते. अशी त्याची तक्रार असते. त्यासाठीच मनाला एकाच विषयाच्या दावणीला न बांधता मन इतके सजग, जागरूक असले पाहिजे की आजूबाजूला घडणार्‍या सर्व घटनांची नोंद घेऊनही विशिष्ट विषयाचे त्याचे आकलनही स्वच्छ, स्पष्ट होईल. सर्व ओलावा शोषूनही एखाद्या टीपकागदाप्रमाणे कोरडा राहण्याचा गुण मनाच्या ठिकाणी बाणणे म्हणजेच अखंड जागरूक राहण्याचा वसा घेणे होय.

वेबदुनिया वर वाचा