शिवसेनेच्या गटनेतेपदी खासदार अनंत गिते

सोमवार, 19 मे 2014 (10:21 IST)
सलग सहाव्यांदा खासदारकी भूषवणारे शिवसेनेचे विजयी खासदार अनंत गिते यांची शिवसेनेच्या संसदीय गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत राज्यात महायुतीला घवघवीत यश मिळाले आहे. त्यामुळे भाजपसह शिवसैनिकांमध्येही उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजय साजरा करण्यासाठी रविवारी 'मातोश्री'वर चांगलीच लगबग दिसली. खासदार अनंत गिते, राहुल शेवाळे, गजानन किर्तीकर, आनंदराव अडसूळ यांनी मातोश्रीवर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंची भेट घेतली.

दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न पूर्ण झाल्याची भावना सगळ्यांनी व्यक्त केली. यावेळी शिवसेनेचे विजयी उमेदवार अनंत गिते यांची शिवसेनेच्या संसदीय गटनेतेपदी नियुक्ती करण्यात आली. अनंत गिते यांची संसदीय गटनेतेपदी निवड झाल्यामुळे त्यांना कॅबिनेटपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे गितेंना कोणते मंत्रिपद मिळते याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. 

वेबदुनिया वर वाचा