महाराष्ट्रात आघाडीचे पानिपत

शनिवार, 17 मे 2014 (09:34 IST)
महाराष्ट्रात मोदी लाटेचे रूपांतर त्सुनामीत झाल्यामुळे अनेक दिग्गज मंत्री पराभूत झाले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीला अनेक ठिकाणी पराभवाचे जोरदार धक्के बसले. शिवसेनेमधून आजतागात जे-जे बाहेर पडलेत त्या सर्वाना पराभवाचा कडू घोट गिळावा लागला. रत्नागिरी-सिंधुदुर्गच मतदारांनी दहशतवादाचा समूळ बीमकोड करताना नीलेश राणे यांना पराभवाची धूळ चारली. हा पराभव वर्मी लागलमुळे मुख्यमंत्रिपदाच्या रेसमध्ये असणारे नारायण राणे यांनी मंत्रिपदाचाच राजीनामाच पाठवून दिला आहे. त्याचप्रमाणे दुसरे मंत्री डॉ. नितीन राऊत यांनीही राजीनामा दिल्यामुळे राज्यातील आघाडी सरकार अडचणीत आले आहे. पराभवाची नैतिक जबादारी स्वीकारून सगळेच नेते राजीनामा देण्याची भाषा बोलू लागल्यामुळे मुख्यमंत्री चांगलेच अडचणीत आले आहेत. भाजपशासित राज्यांमध्ये कमळ उमलले यामध्ये आश्चर्य वाटण्यासारखे काहीच नाही. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असलेल्या महाराष्ट्रातही कमळ सर्वदूर उमलले कसे याचा विचार सत्ताधारी आघाडीने करण्याची गरज आहे. राज्यामध्ये आगामी सहा महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होत असताना गांगरून न जाता ‘मोदी त्सुनामी’ शांत होण्याची वाट आघाडीच्या नेत्यांना पाहावी लागणार आहे.

केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे दीड लाखांपेक्षा अधिक मतांनी पराभूत झाल्यामुळे आणि राज्यात काँग्रेसचे एका हाताच्या बोटांइतकेही संख्याबळ न झाल्याने चिंतेचे वातावरण निर्माण होणे स्वाभाविक होते. मात्र भाजप-शिवसेनेने मिळविलेले यश निश्चितच कौतुकास्पद आहे. लाखांच्या जाहीर सभा गाजविणार्‍या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे इंजिन थेट यार्डात गेल्यामुळे अनेकांना धक्का बसणे स्वाभाविक असलेतरी मतदार राजा अतिशय विचारी असल्याचे हे द्योतक म्हणावे लागेल. सुप्रिया सुळे विजयी झालेल्या असल्या तरी त्यांची दमछाक महादेव जानकर यांनी केली आहे. राज्यातील जनता केवळ मोदी लाटेमुळे नव्हे तर महागाई आणि आघाडीचे राजकारण पाहून कंटाळली आहे, हा संदेश या निवडणुकीत मिळाला आहे. आघाडी सरकारने आता उर्वरित कालावधीत कितीही जंग-जंग पछाडले तरी राज्यात सत्तापालट होणार हे आता निश्चित झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा