राज यांची टीका : शिवसेना मोदींच्या सलाइनवर

शनिवार, 19 एप्रिल 2014 (09:36 IST)
‘नरेंद्र मोदी यांच्यासारख्या नेतृत्वाची देशाला गरज आहे, असे मी 2011 मध्ये गुजरातचा दौरा केला तेव्हापासून म्हणत आहे. सध्या ‘जे’ मोदी नावाच्या सलाइनवर फिरत आहेत, ते त्यावेळी सुषमा स्वराज आणि लालकृष्ण अडवाणी यांना पंतप्रधानपदासाठी पाठिंबा देत होते,’ अशी टीका मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शिवसेनेचे नाव न घेता केली.

मनसेचे ठाण्यातील उमेदवार अभिजित पानसे यांच्या प्रचारासाठी राज ठाकरे यांची गुरुवारी सेंट्रल मैदानात जाहीर सभा झाली. या सभेत राज यांनी भाजपचे अध्यक्ष राजनाथसिंह यांच्यावरही आसूड ओढला. मनसे भाजपमध्ये विलीन करण्यासाठी हा बिहार किंवा उत्तर प्रदेशातील पक्ष नाही, असे त्यांनी यावेळी सुनावले. आपण दिलेला पाठिंबा मोदी यांना आहे, ते त्याबाबत काहीही बोलत नाहीत. मग ज्यांना पाठिंबाच नाही ते राजनाथ का बोलतात, असा सवाल राज यांनी सभेत केला.

ठाणे जिल्ह्यातील डोंगर पालकमंत्री गणेश नाईक यांनी पोखरून पर्यावरणाची वाट लावल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला. महापौर, आमदार, खासदार आणि मंत्रिपदे आपल्याच घरात राहावी, असा नाईक यांचा प्रयत्न असल्याचे सांगत ही घराणेशाही आपण खपवून घेणार नाही, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला.

वेबदुनिया वर वाचा