नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्ग मतदार संघात राज्यातील काँग्रेसचे नेते व उद्योग मंत्री नारायण राणे यांचे चिरंजिव निलेश राणेंच्या पराभव झाला. या पराभवामुळे मी संपलो असल्याचे समजू नका; असा इशारा नारायण राणे यांनी दिला आहे. नवी जिद्दीने उभे राहून पुन्हा विजय मिळवू, असेही राणे म्हणाले. विरोधक, पत्रकार, मित्रपक्ष व पोलिस यांनी युती करुन आमचा पराभव केल्याचा आरोप राणेंनी केला आहे.
लोकसभा निवडणुकीत भाजप नेते नरेंद्र मोदींच्या लाटेने कॉग्रेसच्या अनेक दिग्गज नेत्यांचे गड हलले आहे. यापार्श्वभूमीवर नारायण राणेंनी एका मराठी वृत्तपत्रात लेख लिहीला आहे. या लेखात त्यांनी पराभवावर मत व्यक्त केले आहे. कोकण ही माझी जन्मभूमी असून या भागाच्या विकासासाठी गेली 25 वर्ष मी अथक मेहनत घेतली. मात्र, यंदा कोकणच्याच मतदारांनी आम्हाला नाकारले. जन्मभूमीतच पराभव झाला, ही बाब मनाला चटका लावणारी असल्याचे नारायण राणेंनी म्हटले आहे.