एनडीऐ स्वबळावर सरकार स्थापन करणार- भाजप

बुधवार, 14 मे 2014 (10:30 IST)
16 लोकसभा निवडणुकीचे निकाल 16 मे रोजी जाहीर होणार आहेत. निकालानंतर एनडीएची केंद्रात स्वबळावर सरकार स्थापन करणार असल्याचा विश्वास भाजपच्या सूत्रांन‍ी व्यक्त केला आहे. एनडीएला 290 ते 305 जागा मिळतील, असे अमित शहा यांनी म्हटले आहे.

उत्तर प्रदेशमध्ये 50 ते 55 जागा मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे एनडीएला केंद्रात सरकार स्थापन करण्यात कोणतीही अडचण येणार नसल्याचे भाजपने म्हटले आहे. बसपा उत्तर प्रदेशात दोन नंबरचा पक्ष असेल असंही भाजपचा अंदाज आहे. महाराष्ट्रात महायुतीला किमान 35 जागा मिळण्याची शक्यता पक्षातल्या सूत्रांनी वर्तवलीये. बिहारमध्ये एक्झिट पोलच्या अंदाजापेक्षाही जास्त जागा मिळतील, असेही भाजपने म्हटले आहे.

देशात सोमवारी शेवटच्या टप्प्याचं मतदान संपल्यानंतर वेगवेगळ्या संस्थांनी केलेल्या एक्झिट पोलच्या निष्कर्षांनंतर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार, असंच चित्र दिसत आहे. मात्र मोदी पंतप्रधान झाल्यानंतर गुजरात राज्याचे मुख्यमंत्री कोण असा प्रश्न उपस्थित होतो. या शर्यतीत भाजपच्या ज्येष्ठ नेत्या आणि गुजरातच्या मंत्रिमंडळातील महसूल मंत्री आनंदीबेन पटेल यांचं नाव आघाडीवर आहे. गुजरात भाजपच्या सर्व आमदारांची काल बैठक पार पडली. 16 मे नंतरच म्हणजेच लोकसभा निवडणूकांच्या निकालानंतरच याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे  या बैठकीत स्पष्ट करण्यात आले. 

वेबदुनिया वर वाचा