'अशोक चव्हाण यांच्यावर कायद्याने बंदी नाही'

गुरूवार, 27 मार्च 2014 (11:39 IST)
महाराष्‍ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यावर कायद्याने बंदी नाही. त्यामुळे त्यांना उमेदवारी देण्यास काहीच हरकत नसल्याचे कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी स्पष्‍ट केले आहे. सोनियांनी असे सांगून अशोक चव्हाण यांची पाठराखण केल्याची चर्चा रंगली आहे. 
 
दरम्यान,काँग्रेसने लोकसभेसाठी अखेर माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांना नांदेडमधून उमेदवारी जाहीर केली आहे. आदर्श घोटाळ्यानंतर अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपद सोडावे  लागले होते. मात्र अशोक चव्हाण यांना लोकसभेचे तिकीट दिल्यानंतर, काँग्रेस आदर्श प्रकरण विसरले की काय?, असा सवाल विचारला जातोय.
 
आदर्श प्रकरणात अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सोडावी लागली होती, यानंतर चव्हाण राजकीय विजनवासात गेले होते. मात्र औरंगाबादच्या राहुल गांधींच्या सभेत अचानक व्यासपीठावर अशोक चव्हाण चमकले होते. अशोक चव्हाण राहुल गांधी यांच्या व्यासपिठावर दिसल्यानंतर, अशोक चव्हाण यांना लोकसभेचे तिकीट मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.

वेबदुनिया वर वाचा