गणेश स्थापना संपूर्ण विधी मराठीत Ganesha Chaturthi 2023 Puja Vidhi Marathi
सोमवार, 18 सप्टेंबर 2023 (12:24 IST)
Ganesha Sthapana Puja Vidhi Marathi भाद्रपद महिन्याच्या गणेश चतुर्थीला गणपतीची स्थापना केली जाते. या दिवशी घरी गणपतीची मूर्ती आणून मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात. आपल्या परंपरेनुसार दीड दिवस, पाच दिवस, सात दिवस अथवा अनंत चतुर्दशीपर्यंत गणपती घरी बसवले जातात. दररोज सकाळ- संध्याकाळी गणपतीची आरती केली जाते. दररोज एकवीस दुर्वांची जुडी वाहिली जाते, लाल फुलं अर्पित केलं जातं. गणपतीला नैवेद्य दाखवतात.
गणपती बाप्पा मोरयाचा गजर करत या दिवशी गणपती घरी आणावा. घरी दारात आल्यावर सुहासिणीने भाकर तुकडा ओवाळून टाकावा आणि गणपती आणणार्याच्या पायावर पाणी घालावे. गणपती आसनासमोर खाली ठेवून शास्त्रोक्त पूजा करावी. तर चला जाणून घेऊया संपर्ण पूजन विधी मंत्रोच्चारासह.
आचमन
ॐ केशवाय नमः । ॐ नारायणाय नमः । ॐ माधवाय नमः ।
या नावांनी दोनदा आचमने करावी.
ॐ गोविंदाय नमः ।
या नावाने पाणी सोडावे. पुढील नावे हात जोडून म्हणावीत. नंतर प्राणायाम करावा.
( भारतीय संस्कृतीत कलश हे मांगल्याचे प्रतीक शुभकार्यात कलशाची पूजा करण्याची प्रथा आहे. कलशपूजा म्हणजे अखिल ब्रह्मांडाची पूजा. कलशात सारे ब्रह्मांड सामावलेले आहे. कलशाच्या मुखी विष्णू, कंठामध्ये शंकर, तळाशी ब्रह्मा, मध्याभागी देवमाता म्हणजे मातृगण स्थित आहेत. कलशात सर्व सागरांचे पवित्र जल व सप्तखंडात्मक पृथ्वी समाविष्ट आहे. ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अथर्ववेद या चारही वेदांचे यात वास्तव्य मानले असून, आपल्या सहा अंगासह सर्व वेद या कलशात आहेत. गायत्री, सावित्री नित्य शांती, पुष्टी देणार्या देवतांचे अधिष्ठान या कलशात आहे. गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सात नद्यांचे जल असून, 'तूच शिव, तूच विष्णू, तूच ब्रह्मा यांचे प्रतीक असणार्या कलशरूपी ब्रह्मांडदेवते, तुझ्यात सारी पंचमहाभूते व प्राणशक्तीचे वास्तव्य आहे' अशी ही प्रार्थना आहे. कलशपूजा ही सर्व ब्रह्मांडसमावेशक आहे. कलशाशिवाय कोणतीही पूजा होत नाही; म्हणून हे सर्व सांगितले आहे. )
शंखपूजा
( शंखाला स्नान घालून गंध, पुष्प घालावे. शंखमुद्रा दाखवून नमस्कार करावा.)
ॐ ॐ असा प्रणवाचा पंधरा वेळा उच्चार करावा. नंतर दोन दूर्वांकुर तुपात बुडवून गणपतीच्या उजव्या डोळ्याला, नंतर डाव्या डोळ्याला त्या दूर्वेने तूप लावावे आणि म्हणावे-
देवी बालर्कवार्णा भवतु सुखकरी प्राणशक्तिः परा नः ॥
( गणपतीच्या चरणांवर गंध, अक्षता, फूल वाहावे. गूळ, केळे आदीचा नैवेद्य दाखवावा. नमस्कार करावा. )
वंदन
वक्रतुंड महाकाय सूर्यकोटिसमप्रभ ।
निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ॥
( अक्षता वाहाव्यात. नमस्कार करावा. )
ध्यान
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि ।
तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥
एकदन्तं शूर्पकर्णं गजवक्त्रं चतुर्भुजम् ।
पाशांकुशधरं देवं ध्यायेत् सिद्धिविनायकम् ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । ध्यायामि ।
ध्यानं समर्पयामि ॥
( फूल, दूर्वाकुर वाहावे. नमस्कार करावा. )
आवाहन
आगच्छ देवदेवेश तेजोराशे जगत्पते ।
क्रियामाणां मया पूजां गृहाण गणनायक ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
आवाहनार्थे दूर्वांकुरान् पुष्पांजलि समर्पयामि ॥
( आवाहनार्थ दूर्वाकुर, फुले वाहावीत. नमस्कार करावा. )
आसन
नानारत्नसमायुक्तं कार्तस्वरविभूषितम् ।
आसनं देवदेवेश प्रीत्यर्थ प्रतिगृह्यताम् ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
आसनार्थे दूर्वांकुरान् अक्षतान् समर्पयामि ॥
( दूर्वांकुर, अक्षता गणपतीच्या चरणावर वाहाव्यात.)
पाद्य
सर्वतीर्थसमानीतं पाद्य गन्धादिसंयुतम् ।
विघ्नराज गृहाणेदं भगवन् भक्तवत्सल ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
पाद्यो पाद्यं समर्पयामि ।
( गणपतीच्या चरणावर दूर्वांकुराने पाणी शिंपडावे.)
अर्ध्ये
अर्ध्ये च फलसंयुक्तं गंधपुष्पाक्षतैर्युतम् ।
गणाध्यक्ष नमस्तेऽस्तु गृहण करुणानिधे ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
हस्तयोः अर्ध्येः समर्पयामि ॥
तदर्थे गंधाक्षतपुष्पजलं समर्पयामि ॥
( गणपतीवर गंधाक्षतापुष्प वाहावे. पळीत पाणी घेऊन त्यात गंध, अक्षता, फूल, दूर्वांकुर व सुपारी घालून गणपतीच्या हातावर अर्घ्य द्यावे. अर्घ्य ताम्हनात सोडावे. )
आचमन
विनायक नमस्तुभ्यं त्रिदशैरभिवंदित ।
शुद्धोदकेन तोयेन शीघ्रमाचमनं कुरु ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
आचमनीयं समर्पयामि ॥
( पळीभर पाणी ताम्हनात सोडावे )
स्नान
गंगादिसर्वतीर्थेभ्य आनीतं तोयमुत्तमम् ।
भक्त्या समर्पितं तुभ्यं स्नानायाभीष्टदायक ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । स्नानं समर्पयामि ॥
( फुलाने गणपतीवर किंचित शुद्धोदक शिंपडावे.)
पंचामृत स्नान
पंचामृत एकत्र करून किंवा दूध, दही, तुप, मध, साखर या क्रमाने निरनिराळी अर्पण करावी. एकत्र केलेली असल्यास म्हणावे-
पयो दधि घृतं चैव मधुशर्करया युतम् ।
पंचामृतेन स्नपनं क्रियतां परमेश्वर ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
पंचामृतस्नानं समर्पयामि ॥
पंचामृत स्नानांतरेण शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि ।
( दूध, दही, तूप, मध व साखर वाहणे. मध्ये शुद्धोदक देणे. )
दूध
कामधेनो समुदभूतं देवर्षिपितृतृप्तिदम् ।
पयो ददामि देवेश स्नानार्थ प्रतिगृह्यताम् ।
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
पयःस्नानं समर्पयामि ।
शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
दही
चंद्रमंडलसंकाशं सर्वदेवाप्रियं दधि ।
स्नानार्थ ते मया दत्तं प्रीत्यर्थ प्रतिगृह्यताम् ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
दधिस्नानं समर्पयामि ।
शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
तूप
आज्यं सुराणामाहार आज्यं यज्ञे प्रतिष्ठितम् ।
आज्यं पवित्रं परमं स्नानार्थ प्रतिगृह्यताम् ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
घृतस्नानं समर्पयामि ।
शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
मध
सर्वविधिसमुत्पन्नं पीयूषसदृशं मधु ।
स्नानार्थ ते प्रयच्छामि गृहाण परमेश्वर ॥
श्रीसिद्धिविनायकाय नमः ।
मधुस्नानं समर्पयामि ।
शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
साखर
इक्षुदण्डसमुद्भूतं दिव्यशर्करया शुभम् ।
स्नापयामि सदा भक्त्या प्रीतो भव सुरेश्वर ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
शर्करास्नानं समर्पयामि ।
शुद्धोदकस्नानं समर्पयामि ॥
गंधोदकस्नान
( पळीत पाणी घेऊन गंध घालावे व ते पाणी वाहावे. )
कर्पूरैलासमायुक्त सुगंधिद्रव्यसंयुतम् ।
गंधोदकं मया दत्तं स्नानार्थ प्रतिगृह्यताम् ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । गंधोदकस्नानं समर्पयामि ।
गंधोदकस्नानंतरे शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि ।
मांगलिक स्नान
( अत्तर, सुगंधी द्रव्ये देवाच्या अंगाला लावून स्नान घालावे. )
अंगोद्वर्तनकं देव कस्तुर्यादिविमिश्रितम् ।
स्नानार्थ ते प्रयच्छामि स्वीकुरुष्व दयानिधे ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
मांगलिक स्नानं समर्पयामि ।
शुद्धोदकस्नानं समर्पयामि ।
सकलपूजार्थे अक्षतान् समर्पयामि ।
पूर्वपूजा
( गणपतीला नाममंत्रानी पंचोपचार करावे. ही पूर्वपूजा होय. )
( गणपतीला गूळ, खोबरे, मोदक इत्यादी जो पदार्थ नैवेद्यासाठी अर्पन करावयाचा असेल तो पात्रात ठेवून त्यावर तुलसीपत्र घालून पात्राखाली पाण्याने चौकोनी मंडल करून वरील मंत्रांनी तो अर्पण करावा. जो परार्थ असेल त्याचे नाम उच्चारावे. जसे गुडखाद्यनैवेद्यं, मोदकनैवेद्यम्.
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा ।
ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा ।
ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
( एक पळी पाणी ताम्हनात सोडावे. )
ॐ प्राणाय स्वाहा । ॐ अपानाय स्वाहा ।
ॐ व्यानाय स्वाहा । ॐ उदानाय स्वाहा ।
ॐ समानाय स्वाहा । ॐ ब्रह्मणे स्वाहा ।
उत्तरापोशनं समर्पयामि । मुखप्रक्षालनं समर्पयामि ।
हस्तप्रक्षालनं समर्पयामि । आचमनं समर्पयामि ।
( तीन पळ्या पाणी ताम्हनात सोडावे. )
करोद्वर्तनार्थे चंदनं समर्पयामि ।
( फुलाला गंधाक्षता लावून त गणपतीला अर्पण करावे.)
तांबूल
( गणपतीपुढे विडा व सुपारी ठेवून उजव्या हातावरून एक पळी पाणी त्यावर सोडावे.)
पूगीफलं महद्दिव्यं नागवल्लीदलैर्युतम् ।
कर्पूरैलासमायुक्तं तांबुल प्रतिगृह्यताम् ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः ।
पूगीफल - तांबूलं समर्पयामि ।
फळे
( गणपतीपुढे यथाप्राप्त फळे ठेवून एक पळी पाणी सोडावे. )
फलेन फलितं सर्वं त्रैलोक्यं सचराचरम् ।
तस्मात् फलप्रदानेन सफलाश्च मनोरथाः ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । विविध-फलानि समर्पयामि ।
महादक्षिणा
( गणपतीसमोर महादक्षिणा यथाशक्ती ठेवून त्यावर पाणी सोडावे. )
हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः ।
अनंतपुण्यफलदमतः शांतिं प्रयच्छ मे ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । महादक्षिणां समर्पयामि ।
नीरांजन
( गणपतीला नीरांजनाने ओवाळावे.)
चंद्रादित्यौ च धरणिर्विद्युदग्निस्तथैव च ।
त्वमेव सर्वज्योतीषि आर्तिक्यं प्रतिगृह्यताम् ॥
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारम् ।
सदा वसन्तं हृदयारविंद भवं भवानीसहितं नमामि ।
श्री सिद्धिविनायकाय नमः । महानीरांजनदीपं समर्पयामि ।
कापुरारती
( कापूर प्रदीप्त करून ओवाळावा.)
कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदरसंस्थितेन ।
प्रदिप्तभासा सह संगतेन नीरांजन ते जगदीश कुर्वे ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । कर्पूरार्तिक्यदीपं समर्पयामि ।
( नमस्कार करावा )
प्रदक्षिणा
( स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे फिरावे. हात जोडावेत. )
यानि कानि च पापनि जन्मांतरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ।
साष्टांग नमस्कार
नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे ।
सांष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्नेन मया कृतः ।
श्री सिद्धिविनायकाय नमः । नमस्कारान् समर्पयामि ।
( साष्टांग नमस्कार करावा )
पुष्पांजली
नमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद ।
नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । मंत्रपुष्पं समर्पयामि ।
( गणपतीच्या चरणावर गंध, अक्षतांसह फुले घेऊन वाहावीत. )
अर्ध्यप्रदान
पूजाफलाप्राप्त्यर्थ अर्घ्यप्रदानं करिष्ये ।
( असे म्हणून उजव्या हातावर काही नाणी, सुपारी, दोन दूर्वा, गंध, अक्षता व फुले घेऊन त्यावर पाणी घालावे. सर्व अर्घ्य खाली सोडावे. असे तीन वेळा करावे. )
नमस्ते देवदेवेश नमस्ते विघ्ननाशक ।
नमो भक्तानुकं देव गृहाणार्घ्यं नमोस्तु ते ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । इदमर्घ्य दत्तं न मम ।
गणेशाय नमस्तुभ्यं सर्वकामफलप्रद ।
वाञ्छितं देहि मे नित्यं गृहाणार्घ्यं नमोस्तु ते ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । इदमर्घ्यं दत्तं न मम ।
व्रतमुद्दिश्य देवेश गन्धपुष्पाक्षतैर्युतम् ।
अर्ध्य गृहाण देवेश मम सौख्यं विवर्धय ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । इदमर्घ्यं दत्तं न मम ।
प्रार्थना
विनायक गणेशाय सर्वदेव नमस्कृत ।
पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नविनाशय ॥
नमो नमो विघ्नविनाशनाय नमो नमस्त्राहि कृपाकराय ।
नमोस्तुतऽभीष्टवरप्रदाय तस्मै गणेशाय नमो नमस्ते ॥
मंगलमूर्ति मोरया । श्री सिद्धिविनायकाय नमः ।
प्रार्थना समर्पयामि । यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजाक्रियादिषु ।
न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतम् ॥
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ॥
रूपं देही जयं देहि यशो देहि द्विषो जहि ।
पुत्रान्देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥
( नमस्कार करावा. )
अनेन यथाज्ञानेन यथामीलितोपचारद्रव्यैः ।
कृतपूजनेन श्री भगवान गणपतिः प्रीयताम् ।
( पूजासमाप्तीचे उदक सोडावे. )
ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥
नमस्कार करावा. नंतर आरत्या म्हणाव्या. मंत्रपुष्पांजलीनंतर गणेश गायत्री मंत्र म्हणावा.
गणेशचतुर्थीच्या दिवशी आपला गणपती आपणच बसवला असला तरीसुद्धा ब्राह्मणाच्या नावाने विडा , नारळ महादक्षिणा काढून ठेवावी. त्यावर गंध, अक्षता, फूल वाहावे, म्हणावे-
पूजा सांगण्यासाठी ब्राह्मण आला असल्यास त्याची सन्मानाने पूजा करावी. त्याच्या हातावर गंध, अक्षता, फूल, विडा व महादक्षिणा देऊन उदक सोडावे. त्याच्या मस्तकावर अक्षता अर्पण कराव्या व त्याचा आशीर्वाद घ्यावा. ब्राह्मण आपणाला आशीर्वाद देईल तो असा....दिर्घमायुः श्रेयः शांतिः पुष्टिस्तुष्टिश्वास्तु । शुभं भवतु ॥